Wednesday, December 31, 2008

नवे वर्ष

आणखी एक वर्ष सरले.तसे, काही तास अजून शिल्लक आहेत. माणसाने कालगणनेसाठी निर्मिलेली एक अदृश्‍य रेषा कालपटलाच्या अथांग, अनंत छाताडावर आखली जाणार आहे.ती रेषा दिसणारी नसली तरी सर्वांना कळणारी आहे. त्यापलीकडे दुसऱ्या संवत्सराची पहाट उगवणार आहे.त्याची पावले नंतर येणाऱ्या दिवसागणिक आकार वाढवीत अवकाश व्यापत जातील, वामनाच्या पावलांसारखी; येणाऱ्या संवत्सराच्या मर्यादेच्या दुसऱ्या अदृश्‍य रेषेपर्यंत. त्यानंतर पुन्हा तसेच .. एक संध्याकाळ आणि त्यानंतर एक पहाट ... मध्ये एक विभाजक अदृश्‍य रेषा. ते वर्ष या वर्षापासून वेगळे करणारी. काळाची पावले अव्याहत पुढे पुढे पडतच राहणार आहेत. कुठवर ? अनाकलनीय आहे. कुणाला आजवर सांगता आलेले नाही, पुढे कुणी सांगू शकणार नाही.अव्याहत चालणाऱ्या काळाबरोबर जीवनही चालत राहणार आहे.मध्ये किती आयुष्ये उगवतील, खपतील; चालतील, थांबतील ! काळाच्या चालीला आणि जगण्याला अंत नसेलच. त्याचे गणित मांडणे मानवी मेंदूच्या आवाक्‍यापलीकडचे आहे. आकलनात येते, ते सुटे सुटे आयुष्य; आणि अशा अनेक आयुष्यांची भेंडोळी. तीही सगळीच्या सगळी नाहीच कळत. आपले आयुष्य तरी आपल्याला कुठे नीट कळते, आकळते? काही तुकडे तेवढेच नजरेच्या आणि बुद्धीच्या आवाक्‍यात येतात.तेही कधी एवढे स्वतंत्र निघतात, की त्यांचेही पूर्णांशाने आकलन होत नाही. तरी आयुष्य आणि जीवन कळले, अशा थाटात आपण वागत असतो.काळाच्या प्रवाहात काही पावले पुढे टाकत जातो. तेवढे थोडे दिसणारे वेगवेगळ्या परिमाणात मोजले जाते. तशी वहिवाट आपण स्वीकारलेली आहे. दिवसांची, महिन्यांची, वर्षाची गणती या वहिवाटाचा भाग आहे.म्हणून एक वर्ष संपले,की येणाऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देण्याचा प्रघात आपणच घातलेला आहे. त्याला स्मरून सरत्या वर्षाच्या आजच्या शेवटच्या दिवशी माझ्यासह सर्वांनाच नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

आजचा दिवस संपला, की उद्याचा दुसरा दिवस उजाडेल.. बुधवार ... नंतर गुरुवार ....नंतर शुक्रवार ... आणि आणखी सहा दिवसांनी पुन्हा बुधवार ... नंतर गुरुवार ....नंतर शुक्रवार ... हे चक्र सुरूच राहणार आहे. दर सहा दिवसांनी पुन्हा तोच दिवस येतो. पण उजाडणारा दिवस तोच असतो का ? आणखी सहा दिवसांनी पुन्हा बुधवार उजाडेल. तो बुधवार असेल, पण आजचा दिवस असेल का ? निश्‍चितच नाही. आपल्या सोयीसाठी काही मुखडे ठरवून घेतले आहेत. नियत काळाने येणाऱ्या दिवसाला आम्ही तो मुखडा घालतो. त्याचा आणि या मुखड्याचा काही संबंध नसतो. तो जोडतो. उजाडणारा प्रत्येक दिवस हा नवा असतो. त्याचा आत्मा आणि अंतरंगही नवे असतात. त्या नवेपणाने तो आपल्याला भेटतो. आपण मात्र जुन्या मुखड्यात त्याची ओळख धुंडाळत असतो.तीच त्याच्यावर थोपतो आणि निवांत होतो. नव्याचे नवेपण जाणायला जात नाही. कदाचित त्यामुळे त्याने आणलेले नवेही आपल्या भेटत नाही. नवेपण न कळल्याने कदाचित फसगतही होते. कधी अवचित लाभही होत असेल. लाभाचा आनंद मिळतो.त्यात गुरफटून जातो.तो कसा झाला ते जाणून घ्यायला जात नाही.ते समजून घेता आले तर लाभाची पुनरावृत्ती करता येऊ शकते. तसा विचार डोक्‍यातच येत नाही.फसगत झाली असेल तर काय गमावले किंवा काय कमावता आले असते,हे लक्षातच येत नाही. ती टाळायचा कशी हा विषय मग आपसूकच बाजूला पडतो.आपण जुन्या मुखड्याच्या परिचयात गुंतून पडतो. नेहमीचा परिपाठ चालू राहतो.त्यात खूष असतो. ही वंचनाच असते. तिच्या मुळाशी कोण जातो ? अज्ञानातही सुख असते, असे म्हणतात. सुख मिळाले, की ते अज्ञानामुळे आहे की कसे, याची चिकित्सा करायला कोण जाते. सुखाशी मतलब असतो. त्यात आत्मसंतुष्ट राहायचीही सवय जडलेली आहे.आयुष्याला लगडून राहिलेल्या या सवयीने आपले मन आणि बुद्धी व्यापली आहे. एका परिपाठात आपण भोवंडून स्थिरावतो आणि नवे वर्ष आले, की सवयीनेच ठोक शुभेच्छा देऊन टाकतो.

उगवणारा प्रत्येक दिवस नवा आहे. जगण्याच्या नव्या नव्या संदर्भाची तो आपल्यासमोर पखरण घालीत असतो. प्रत्येक दिवसाचे भागधेय वेगळे,स्वतंत्र आहे.सूताच्या गुंडाळीला भोवऱ्यासारखी गती देऊन उलटी दिशा दिली तर सूत मोकळे होत खुलत जाते. परिक्रमेत बांधलेले जीवन स्वतःभोवती पिंगा घालीत घालीत फिरत पुढे सरकताना आयुष्याच्या भागधेयाचा दोर मोकळा करीत जाते. तो प्रत्येक दिवस एक प्राक्तन घेऊन उजाडत असतो.दडलेल्या त्या प्राक्तनाला भेटण्यासाठी दिवसाच्या नावाच्या मुखड्याखाली डोकावावे लागेल. शोध घ्यावा लागेल.ते जाणणे आणि जगणे आयुष्याला अर्थ देणारे ठरेल. म्हणून उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी शुभेच्छा !

No comments: