Monday, December 22, 2008

ट्रायडंटचा पुनरारंभ

दहशतवादी हल्ल्याच्या घायाळ आणि कटू आठवणी मागे सोडून मुंबईतील हॉटेल ट्रायडंट रविवारी पुन्हा सुरू झाले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर तीनेक आठवड्यांतच पुन्हा हॉटेलचे व्यवस्थापन,कर्मचारी पाहुण्यांच्या स्वागतास सज्ज झाले. 26 नोव्हेंबरच्या त्या दुर्दैवी दिवशी रात्रपाळीत कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी हसतमुखाने पाहुण्यांचे स्वागत केले. दहशतवादाच्या हैदोसाला पुरून उरण्याइतकी जीवनाची ऊर्जा आणि जिगरबाजपणा या देशातील जनतेत आहे, हेच त्यांनी दाखवून दिले आहे. हॉटेलमध्ये नेहमी येणाऱ्यांपैकी काहींनी काल हजेरी लावून आणि यापुढेही आधीप्रमाणेच हॉटेलमध्ये मुक्कामाला येण्याचा इरादा व्यक्त करून अदम्य हिमतीचा पुरावा दिला आहे. हॉटेलच्या पुनरारंभाच्या प्रसंगी आठ धर्माच्या धर्मगुरुंनी आपापल्या धर्मग्रंथातील मंत्रांचे पठण करून देशात नांदणाऱ्या धार्मिक सलोख्याचे प्रतीकात्मकरीत्या दर्शन घडविले आहे.

मुंबईत हॉटेलमध्ये आणि रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळी हल्ला करून भारतीय मानस बिथरवून टाकण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला. विविध धर्माच्या अनुयायांमध्ये विद्वेष चेतविण्याचा हेतू त्यामागे होता. त्यातून हिंसाचाराची आग भडकावी, असेही त्यांचे मनसुबे होते. यातले काही घडले नाही. भारतीय जनमानस चिडले, संतप्त झाले. मृत्यूचे थैमान माजविणाऱ्या शक्ती आणि त्यांना आश्रय देणाऱ्यांवर निर्णायक प्रहार करण्याचा संदेश त्याने संतापातून या देशाच्या राज्यकर्त्यांसाठी व्यक्त केला. पण, संयम सोडला नाही.धीर गमावला नाही.अतिशय तणावाचे वातावरण असूनही भारतीय लोकशाहीच्या प्रगल्भतेचे दर्शन साऱ्या जगाला घडविले.दहशतवाद्यांच्या नृशंसतेचे घाव झेलूनही संयम न गमावण्याचा धीरोदात्तपणा दाखवला आणि जगणे विद्‌ध्वंसावर मात करूनही दशांगुले वरच राहते याचाही प्रत्यय दिला. ट्रायडंटचे पुन्हा सुरू होण्यात या साऱ्याचे सार आहे. म्हणूनच या प्रसंगाला विशेष महत्त्व आहे.

जनता अशी प्रगल्भपणे वागत असताना अंतुले आणि त्यांना पाठिंबा देणारे दिग्विजयसिंह यांच्यासारखे राजकारणी संकुचित मानसिकतेत अडकून उथळपणाचे दर्शन घडवीत आहेत. जनतेचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आपल्या शहाणपणाचा,बुद्धीचा वापर करण्याऐवजी संभ्रम निर्माण करणारी वक्तव्ये करीत आहे. आपल्या या वागण्याने एकप्रकारे दहशतवादी शक्तींना फूस मिळते आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानची भलावण होते,याचेही भान त्यांना राहिलेले नाही. देशाच्या अस्मितेला, सार्वभैमत्वाला घायाळ करणाऱ्या हल्ल्याचेही त्यांनी राजकारण चालविले आहे. राजकीय स्पर्धेत क्षुद्र लाभ मिळविण्यासाठी आपण कशाचे साधन करतो आहोत,याचा विवेक त्यांनी गमावलेला दिसतो. आपल्या वागण्या-बोलण्याची दिशा त्यांनी जनतेकडून समजून घ्यायला हवी.ट्रायडंटचा पुनरारंभ हा अशांसाठीही महत्त्वाचा आहे.

No comments: