Tuesday, December 2, 2008

चोर्लाची सफर

जवळ जवळ तीनेक वर्षांनी मोटरसायकलवरून बेळगावला जाणे झाले. बसच्या गतीने अपेक्षित वेळेत पोचणे शक्‍य नव्हते. पट्‌कन ठरवून टाकले आणि निघालो.

मोटारसायकलने बेळगावला जाणे येणे मला नवे नाही. काही वर्षापूर्वी नोकरीनिमित्त बेळगावात होतो, तेव्हा महिना-दोन महिन्यांतून एकदा अशी रपेट करायचो. चोर्ला घाटातील मार्ग माझ्या आवडीचा बनला होता. एक तर तुलनेने अंतर कमी आहे, घाटातून आणि पुढे कणकुंबी, जांबोटीच्या भागातून जाताना, गारवा भरून राहिलेली आल्हादक हवा अंगाला झोंबण्यातला अनुभव विलक्षण सुखावणारा,चैतन्यदायी असतो.अगदी सकाळच्या प्रहरापासून संध्याकाळी सूर्य मावळतीला गेल्यानंतर अंधारून येणाऱ्या प्रहरी या मार्गावरून मी अनेकदा प्रवास केला आहे. प्रत्येक प्रवासाच्या शेवटी थकव्याच्या जागी उरात भरभरून आलेल्या चैतन्याचा, तजेलदारपणाचा अनुभव मी घेतला आहे.

चोर्ला घाटात प्रवेशताच आधीच्या अनेक वेळच्या प्रवासाचे आठव मनात पिंगा घालू लागले. त्यात आदल्या रात्री पडलेल्या पावसामुळे झाडे-वेली आणि रस्ताही ओलेता झालेला होता. त्या आर्द्रतेचा शीतल स्पर्श शरीराला आलिंगत होता. डोळ्यांनाही गारवा थंडावत होता. परिसरात भरून राहिलेला वनस्पती-मातीचा ओलीत अवगुंठित झालेला गंध आत्म्याला डोलावणारा होता. खूप दिवसांनी, अपरिहार्यपणे का असेना, या सफरीवर निघालो याचा मनस्वी आनंद उचंबळून आला.

घाटातील वळणे पार करताना आपण कुठल्या तरी अनामिक आनंदप्रदेशात विहरत असल्यासारखे वाटत होते. घाट संपताच एका बाजूला पार त्या टोकापर्यंत खुलणारे आसमंत, डोंगरकड्यावरून एकदम तुटून विलग झाल्यासारखा दिसणारा खालचा वनराजीचा भाग, त्या सर्वांवर पसरून राहिलेली आत्ममग्न निळाई-- चोर्लाचे ते मनभावन रूप तसेच डोळ्यासमोर उलगडून राहिले. चोर्ला तसाच आहे. स्वागतशील. निमंत्रणाचे बाहू पसरून आनंद वाटू पाहणारा.त्या रमणीय प्रदेशात रमायला लागलो इतक्‍यात जोरदार गचका बसला.पायाखालच्या वास्तवाचे भान आणून देण्यास तो पुरेसा होता.गोव्याची हद्द संपून कर्नाटकाचे राज्य सुरू झाले होते.आता बेळगावला पोचेपर्यंत खड्ड्यांचे दणके खात, अनेक ठिकाणी रस्त्याचा शोध घेत जावे लागणार होते.

चोर्लाचा परिसर जितका गोंजारणारा,डोळ्यांना तृप्त करणारा आहे, त्याच्या नेमके विरुद्ध इथल्या रस्त्याचे चरित्र आहे.चोर्ला वर्षानुवर्षे आहे तसा आहे आणि रस्ताही तसाच, खड्ड्यात आणि मातीत रुतलेला, वाहन चालविणाऱ्यांची हाडे खिळखिळी करण्याचे आव्हान देणारा,नस्‌ न नस पिळवटून टाकणारा. त्याची सुरवात झाली होती.

मध्ये मध्ये खड्डे पडलेला, डांबर उखडलेला रस्ता पार करून कणकुंबीच्या टप्प्यात पोचलो. कणकुंबीचा रस्ता कायम खड्ड्यात हरवलेला असतो. आताही तसाच तो होता. त्यात नावीन्य नव्हते.या मार्गावर उतरलो, की कणकुंबीच्या तेवढ्या टप्प्यात खड्ड्याशी मुकाबला अपरिहार्य असतो.पण, जांबोटी काढून खानापूर फाट्याकडून बेळगाव फाट्यावर गाडी वळवली आणि रस्त्याचे जे रौद्र रूप सामोरे आले त्याने मी पार हबकून गेलो. खूप मागे पावसाळ्यात काही वेळा या रस्त्याने प्रवास केला होता. खंदकासारखे खड्डे आणि एकाच चाकोरीतून सतत वाहने हाकली गेल्याने चिखलाचे कधी ओले, कधी वाळलेले फत्तरासारखे उंचवटे अनुभवले होते.चिखलातून चाक पुढे सरकेनासे झाल्याने पायाने रेटा देऊन गाडी ढकलत इंच इंच रस्ता सर करण्याचा अनुभव माझ्या गाठीशी आहे.एकदा माझे मित्र डॉ. विठ्ठल ठाकूर यांच्या स्कूटरने आम्ही या मार्गाने गेलो होतो.तेव्हा संपूर्ण रस्त्याचीच खड्डे पडून चाळणी झाली होती.डांबरी असलेला हातभर तुकडा दिसला,की आम्ही "हा बघ, बघ, रस्ता चांगला आहे,' असे ओरडत, स्थितीची खिल्ली उडवीत,उपहास करीत तो प्रवास पूर्ण केला होता.तोवरचा तो सर्वांत वाईट अनुभव होता. यावेळचा अनुभव या सर्वांच्या वरताण ठरला.

खानापूर फाट्याकडून वळताच रस्त्याऐवजी चिखलाने स्वागत केले. पुढे चाललेल्या ट्रकने घातलेल्या चाकोरीतून सरकत राहिलो. ती निसरडी बनली होती.उतरणीवर दोनदा घसरून पडता पडता सावरलो. पुढच्या दहा किलोमीटरच्या टप्प्यात कधी घसरून पडेल ही भीती डोक्‍यात वागवीतच मार्गक्रमण करावे लागले. खरे तर मार्ग नव्हताच.चार पदरी वगैरे रस्ता करण्याचे काम काढल्याच्या खुणा दिसल्या. भारी यंत्रेही दिसली. रस्ता गायब होता. मोठा रस्ता करण्यासाठी आखलेल्या ट्रॅकमध्ये रोजच्या आणि नैमित्तिक वाहनांच्या वर्दळीने चाकोऱ्या निर्माण झाल्या आहेत. एखाद्या माळावर वाहनाच्या वर्दळीने मार्ग बनावा तशी स्थिती होती.त्यात पाऊस पडल्याने चिखल आणि निसरड झाली होती. बहुतेक चढाचा रस्ता असल्याने चाके जमिनीवर ठरत नव्हती.पाय टेकवावे तर चिखलात बरबटणे अटळ होते. तिथे चारेक वेळा निसरून पडताना वाचलो.इतका भयानक अनुभव या रस्त्याचा कधीही आला नव्हता.मला त्याची इतकी धास्ती वाटली, की त्या मार्गाने परतीच्या प्रवासाची कल्पनाला क्षणभरही मनात टिकली नाही.

या रस्त्याची स्थिती बेवारशी पडून सडलेल्या मृतदेहासारखी झाली आहे. गोवा आणि कर्नाटकाला जोडणारा हा महत्त्वाचा, जवळचा रस्ता आहे.वाहन रहदारीसाठी सोयीचा आणि इंधनाची मोठी बचत साधणारा आहे.पर्यायाने राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय टाळण्याचे तो माध्यम ठरू शकतो. कर्नाटकाच्या राज्यकर्त्यांनी सीमाभागातील मराठी भाषकांच्या तिरस्कारापोटी कायमच या रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्याची उपेक्षा केली आहे. गोव्याने स्वखर्चाने तो रस्ता बांधण्याचा आणि त्याची देखभाल करण्याचा दिलेला प्रस्तावही कर्नाटकी राज्यकर्त्यांना मानवला नाही. इतका पराकोटीचा द्वेष त्यांच्या ठायी सीमाभागाबद्दल धगधगतो आहे. त्यांचा विकासाचा कोरडा ठणाणा चाललेला असतो.सामान्य माणसांच्या किमान सोयी- समाधानाची पर्वाच त्यांना राहिलेली नाही. चोर्ला रस्त्याची परवड ही त्यांच्या असंवेदनशीलतेची, असहिष्णुतेचे आणि सडक्‍या मनाची कहाणी आहे.

रस्त्याची दुरवस्था माहीत असूनही मी अनेकदा तेथून प्रवास केला आहे. त्या निसर्गाने कधीच कद्रूपणा दाखवला नाही. तो नेहमीच मोहवतो. आपुलकीची साद घालतो.चोर्लातून जाताना निसर्गाच्या दातृत्वाने मन भारून जाते. रस्ता माणसाच्या दुष्टाव्याची कागाळी करीत व्यथित करीत जातो. निसर्गाच्या पवित्र गाथेत हा दुष्टावा कधी विराम पावतो, त्याची प्रतीक्षा आहे.

No comments: