Sunday, February 27, 2011

आनंदाचा स्त्रोत

पुस्तके वाचण्यासंदर्भात साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी काल रात्री एका कार्यक्रमात मस्त टिप्स दिल्या.या पद्धतीने कुणी पुस्तक वाचत असतील किंवा नाही.पण त्या टिप्स नक्कीच उपयुक्त आहेत. वाचनाचा आनंद वाढविणाऱ्या आणि त्यातले माधुर्य अधिक काळ टिकविणाऱ्या आहेत.

"पुस्तक मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचावे.पुस्तकाच्या प्रत्येक अंगावर कुणीतरी प्रचंड मेहनत घेतलेली असते.त्याला त्यातून काही तरी सांगायचे असते. मुखपृष्ठावर असलेल्या चित्रात त्या पुस्तकात सांगितलेले साररूपाने किंवा प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेले असते. मलपृष्ठावरील ब्लर्ब ही त्या पुस्तकात डोकावण्याची खिडकी असते.पुस्तकाचा विषय,आशय यांचा अंदाज त्या मजकुरावरून येतो. विशेषतः पुस्तक खरेदी करण्याचा निर्णय करताना हा ब्लर्ब मार्गदर्शक ठरतो. पुस्तकातील अर्पणपत्रिकाही महत्त्वाची असते. भालचंद्र नेमाडे यांनी "कोसला'च्या अर्पणपत्रिकेत "शंभरातील नव्व्याण्णवांना' ती कादंबरी अर्पण केली आहे. अवघेच शब्द, परंतु ते केवढा मोठा आशय सांगून जातात. पुस्तकाची प्रस्तावनाही वाचावी.त्यात काही तारतम्य मात्र पाळायला हवे. वैचारिक पुस्तकाची प्रस्तावना पुस्तक वाचण्याआधी वाचावी, मात्र कथाकादंबऱ्यांची प्रस्तावना आधी वाचू नये . कारण ती आधी वाचली तर पुस्तकासंबंधी काही पूर्वग्रह घेऊन आपण पुढील मजकूर वाचण्याची शक्‍यता असते.आपण जे वाचतो, त्याविषयी एक टिपण मुद्दाम लिहून ठेवावे.आपल्याला त्या पुस्तकात नेमके काय आढळले, किंवा एखादे पुस्तक वाचल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया झाली हे लिहून ठेवावे. एक पुस्तक जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला वेगवेगळे अर्थ सांगत असते.एक पुस्तक अनेकदा वाचल्यानंतर प्रत्येक वेळी काही तरी नव्या अर्थाचा उलगडा होतो. अनेक साहित्यकृतीमध्ये अशा अनेक मिती,अर्थ दडलेले असतात.आपणच आधीचे टिपण काढून वाचल्यावर आपल्यालाही वेगवेगळ्या क्षणी कसा वेगवेगळा अर्थ प्रतीत झाला याची प्रचिती येते. ती आनंददायक असते.वाचल्यानंतर आपला अभिप्राय लेखकाला जरूर कळवा. लेखकही आपल्या या लेखनासंबंधी वाचकाच्या भावना समजून घ्यायला आतुर असतो. अशा संवादातूनआनंदाची पखरण होत असते.'

संजय जोशी बोलले,त्यातील एखाद्या गोष्टीचा एकदा तरी प्रयोग करून पाहावाच.कुणी तसा केलेलाही असेल. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टीत आनंदाचा प्रचंड खजिना दडला आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सातत्याने या गोष्टी स्वतः केलेल्या नाहीत.मात्र, या सर्व गोष्टी कधी ना कधी केलेल्या आहेत. कुणाचे पुस्तक वा लेख, कविता आवडली तर त्याला तसे सांगितले आहे.त्याचा त्यांना होणार आनंद पाहिलेला आहे.माझ्या लिखाणाविषयी कुणी कधी अभिप्राय देते,तेव्हाचा आनंद मीही अनुभवला आहे.काही पुस्तकेंविषयी टिपणे काढून ठेवली आहेत.ती वाचताना कधी ते पुस्तक पुन्हा अंतःचक्षूपुढून तरळून गेले आहे.कधी ते पुन्हा वाचावेसे वाटून त्यात पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला आहे.संजय जोशी म्हणाले ते खरेच आहे, आनंद आपल्यापाशी असतो. आपण तो इतरत्र धुंडाळत असतो आणि तो गवसत नाही म्हणून दुःखीकष्टी होत असतो. पुस्तकासारख्या रोज हाताशी येणाऱ्या वस्तूतही अनेक अंगांनी उपभोगता येणाऱ्या आनंदाचा प्रचंड स्त्रोत दडलेला आहे.कुणीही त्याला भिडून त्याची अनुभूती घ्यायला हरकत नाही.

Monday, February 14, 2011

गुलाब नही, कॉंटेही सही !

हॅपी व्हॅलेंटाइन डे !

शुभेच्छा देण्याचा आणि थोडाफार सणासारखा साजरा करण्याचा आजचा आणखी एक दिवस.

या दिवसाची धूम अनेक दिवस आधीपासून सुरू झालेली असते.यंदा कुणा अपरिचिताने मला एक मेल पाठविला.त्यात व्हॅलेंटाइन डेच्या आधीची "सप्तपदी' सांगितलेली आहे. व्हॅलेंटाइन डेचे वेध सात फेब्रुवारीला सुरू होतात.रोझ डे, प्रपोझ डे,चॉकलेट डे,टेडी डे,प्रॉमिस डे, किस डे, हग डे अशा सात दिवसांच्या प्रवासानंतर आठव्या दिवशी उगवतो तो व्हॅलेंटाइन डे. आम्ही अशा वाटेने कधी गेलेलो नसल्याने या साऱ्या उपचारांची माहिती कधी झाली नाही. खूप आधी कधी तरी कुणी एकदा सांगितले होते, बड्या हॉटेलात म्हणे मुख्य जेवण यायच्या आधी चिटूकमिटूक खाण्यापिण्याच्या काही पायऱ्या असतात.त्याला कसलासा "कोर्स' म्हणतात. ब्रिटिश एटिकेटस्‌मध्ये त्याचे फार महत्त्व असते.त्या पायऱ्यांवरही कधी जाणे झालेले नसल्याने या अशा सगळ्या वातावरणापासून आम्ही तसे अलिप्त आणि म्हणून अनभिज्ञही राहिलो. या मेलने व्हॅलेंटाइन डेचे नवे "दर्शन' घडविल्याने पहिल्यांदा त्याची माहिती झाली. (त्याच्या वापराच्या काही टिप्स सोबत दिल्या असत्या, तर ..... )

काही वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेसारख्या परदेशी "फॅड'ना फार विरोध झाला होता.आताही तो तसा संपलेला नाही.कदाचित त्याची धार व तीव्रता कमी झालेली असावी.व्हॅलेंटाइन डेवरून गदारोळ चालू असताना आणि आताही या दिवसाच्या निमित्ताने मला हटकून आठवते ते आपल्या पुराणकाळातील गांधर्व विवाह, पाणिग्रहण वगैरेसंबंधीच्या कथा.संकटात सापडलेल्या स्त्रीला वाचविण्यासाठी तिचा हात धरला तरी तो पाणिग्रहणाचा प्रकार झाल्याच्या किंवा तेवढ्याने झालेल्या परपुरुषाच्या स्पर्शाने तो पुरुष स्त्रीने मनाने वरल्याच्या अथवा वरावा लागल्याच्या कथा पुराणात सापडतात.कारण त्या स्पर्शाने तो परपुरुष स्वपुरुष ठरे आणि त्याशिवाय अन्य पुरुषाचा स्पर्श सोडाच, विचारही परपुरुषाचा विचार ठरे, अशी काही नीतिमत्ता,संस्कृती-परंपरा त्याकाळी समाजात रूढ होती.त्यामुळे व्हॅलेंटाइन हा विदेशी प्रकार आहे, असे कुणी म्हटले,तरी त्याचे मूळ भारतात असावे असे मला सारखे वाटते. केवळ मूळच नव्हे, आपल्याकडे व्हॅलेंटाइनचा प्रकार फारच प्रगत होता, असे म्हणावे लागते. गांधर्व विवाहाच्या, पाणिग्रहणाच्या कथा हे त्याचे पुरावे आहेत.त्यात पुन्हा असे एक दिवस रोझसाठी, एक दिवस टेडीसाठी, एक दिवस चुंबनासाठी, एक दिवस आलिंगनासाठी असा काही राखीव कार्यक्रम आखून ताटकळत राहायचे झंझट नाही. धरला हात, की प्रकार साजराच ! नाही तरी आपली संस्कृती प्राचीन काळीही फारच प्रगत होती.विज्ञान,खगोलशास्त्रासारख्या अनेक क्षेत्रात पुढारलेली होती.ती एवढ्या बाबतीत मागे कशी पडली असती !

अनेकांना मात्र हे व्हॅलेंटाइनचे प्रकरण जमत नाही.आम्हीही त्यातलेच.ते जमणारही नाही.मेड फॉर इचअदरच्या धर्तीवर सांगायचे तर वी आर नॉट मेड फॉर दॅट ! त्याचा मोठा पुरावा म्हणजे आजचा प्रसंग.

सकाळी ऑफिसच्या पार्किंगमध्ये गाडी लावून खाली उतरलो.इमारतीच्या भिंतीला लागून काही फुलझाडे, फुलझाडांच्या कुंड्या आहेत. दरवाजा बंद करून मागे वळताना खांद्यावर शर्टात एका फुलझाडाची फांदी अडकली.माझ्या वळण्याच्या वेगामुळे तिचे काटे शर्टात रुतून तो थोडासा फाटला.फांदी अलगद सोडवून घेतली. पाहिले तर गुलाबाची फांदी होती. या ठिकाणी अनेकदा गाडी पार्क करतो.कधीही ही फांदी अंगचटीला आली नव्हती.नेमकी आजच ती भिडली. गंमत म्हणजे त्या फांदीवर एकही गुलाब नव्हता.कुणी खुडून नेला नव्हता, तर मुळातच उमललेला नव्हता.काहीशी वठलेली ती फांदी होती.

लोक व्हॅलेंटाइन डेला गुलाब देतात.मला भेटले गुलाबाचे काटे,तेही दस्तुरखुद्द झाडाकडून !

Saturday, January 1, 2011

स्वागत नववर्षाचे !


आज आणखी एका नव्या वर्षाला सुरवात झाली.

आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा हाही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते. आता एक जानेवारीला सुरू झालेले वर्ष 31 डिसेंबरपर्यंत आहे.परंतु 31 डिसेंबर यायच्या आतच चैत्राच्या प्रारंभी गुढी पाडव्याला नवे वर्ष सुरू होणार आहे. त्याला अवघे तीनच महिने राहिलेले आहेत.अशी एका कॅलेंडर वर्षांत अनेकांची नववर्षे सुरू होतच असतात.त्याशिवाय व्यावहारिक नवी वर्षेही असतात.उदाहरणार्थ, येत्या एक एप्रिलला नवे वित्तीय वर्ष सुरू होत असते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असते.त्या त्या वर्षांचे संकल्प सोडण्याची प्रथा नाही. किंवा असली तरी त्याची फार चर्चा होत नाही.परंतु, ही नवी वर्षे खरी तोंडाला फेस आणणारी असतात.कारण या नव्या वर्षांच्या प्रारंभी केवळ संकल्प करून भागत नाही, त्या वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचे पक्के नियोजनच करावे लागते.अन्यथा वेगवेगळ्या खर्चाची भागवणूक करताना प्रचंड धावपळ,प्रसंगी उसनवारी करणे भाग पडते.ते सारे निभावून नेताना आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांचे बजेट आणि हिशेबठिशेब कोलमडून पडतात.त्याने कंबरडे मोडते आणि स्वास्थ्यही हरवते.तसे पाहिले तर एक जानेवारीला वर्ष सुरू होताच राहिलेल्या नव्वद दिवसात सध्याचे आर्थिक वर्ष संपणार असल्याची चाहूल लागते.ज्यांना कर वगैरे भरावे लागतात आणि आधीपासून काही तजवीज केलेली नसते, त्यांना तर ही चाहूल धडकीच भरवणारी असते.अनेकदा अशी आवश्‍यक तजवीज केलेली नसतेच.मग, राहिलेल्या थोडक्‍या अवधीत आवश्‍यक त्या साऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी,गुंतवणुकीसाठी, सगळे नीट मार्गी लावण्यासाठी जी धावपळ करावी लागते, ती अनेकदा झोप उडवणारी नाही तर प्रचंड ताण देणारी असते.इथून जे बजेट बिघडते, ते काही केल्या पुढच्या काळात सुरळीत होत नाही.देशाचे असतील किंवा आपण जिथे राहते त्या राज्याचे असतील, अर्थसंकल्प आणि अर्थमंत्रीही आपल्या विवंचना सोडवू शकत नाही.उलटपक्षी ते त्यात अनेकदा भरच घालतात.त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा जल्लोष मनात घोळवताना संकल्प करायचा तर काय करायचा याचा विचार करताना मनात आले,की आपण आपले आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन किमानपक्षी नीट केले पाहिजे.स्वतःसाठी म्हणून काही वेळ,उसंत काढण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांचे काही गणित मांडले पाहिजे आणि ते अमलातही आणले पाहिजे. एवढे करू शकलो,तर वर्षारंभाच्या पहिल्या दिवसाचा आनंद देऊ शकणारे अनेक दिवस वर्षभरात
आपल्याला भेटत राहतील !
तसे ते सगळ्यांना भेटावेत अशा सर्वांनाच शुभेच्छा!