Tuesday, October 28, 2008

शुभ दीपावली !

दिवाळीचा उत्साह ओसंडून आला आहे.
महागाई,मंदी, हिंसाचार, भ्रष्टाचार, अनाचार ... आदींच्या काळ्या सावल्यांचे थैमान सुरू आहेच. त्याने शरीर-मन थोडे बिचकल्यासारखे झाले आहे, थबकलेले नाही. दिवाळीसारख्या सणांमध्ये असे बळ असते, की काय नकळे!

शुभेच्छांची देवाणघेवाण जोरात आहे.मोबाईलसारख्या सेवांमुळे त्यांची माध्यमे वाढली आहेत. त्या प्रमाणात ही देवघेवही वाढली आहे.

आकाशदिवे, नक्षत्रे, लुकलुकणाऱ्या बल्बांच्या माळा यांच्या माध्यमातून प्रकाशाची आरास सुरू आहे. विश्‍वामित्राने चिडून जाऊन म्हणे एकदा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रण केला होता. तो तडीस गेला नाही. दिवस मावळताच आता विद्युत्‌दीपांच्या आराशींमुळे नक्षत्रलोकच धरतीवर उतरल्याचा भास होऊ लागतो आहे! तेवढ्यापुरती एक प्रतिसृष्टी सध्या भासमान होत आहे.

शुभेच्छांची देवघेव, प्रकाशदीपांची आरास मन खुलविते आहे. हे बाह्योपचार आहेत.त्याने दर वर्षी जाळले जाणारे नरकासुर एकदाचे भस्मीभूत होऊन जातील, उजळणाऱ्या आसंमताखाली माणसांच्या वाटा निर्विघ्न होऊन कायम प्रकाशमान होतील, असे नाही. त्यांच्या पावलापुढचा काळोख संपून जाईल किंवा नव्याने त्या पावलांना काळोख घेरणार नाही, असेही नाही. निर्माण केलेली नरकासुराची प्रतिमा जाळता येते, नेमानेच ती जाळलीही जाईल, ज्यांच्या मनांतच नरकासुर वसतीला आला आहे, त्याला तिथून कोण आणि कसे हाकलून लावणार आहे? ते जिवंत "नरकासुर' जाळले जाणार नाहीत. त्यातल्या एखाद दुसऱ्या "नरकासुरा'चा बंदोबस्त झाला किंवा त्याची सद्दी संपली, तरी त्याची जागा घ्यायला नवे नवे "नरकासुर' समाजात तयारच आहेत. ती स्थिती सहजी बदलणारी नाही. बदलू नये, अशा तजविजीत कायम गुंतलेले "मोठे नरकासुर'ही आहेतच. हे सर्वच जण सामान्य जनांचे जगणे असह्य,अडचणीचे करीत आहेत. त्यांची चलती असेतोवर सामान्यांच्या जीवनात विपदा आणि दुःख हे राहणारच आहे. सद्‌गुणांची आणि त्याची कास धरणाऱ्यांची उपेक्षा, अवहेलना होत राहणार आहे. दुराचाराची त्यावर वरताण सहन करावी लागणार आहे.त्याचा ताप आणि वेदना सोसावी लागणार आहे. निराश करणारी, मनोधैर्य खच्ची करणारी ही परिस्थिती आहे. ही स्थिती टाळून जाता येणार नाही.तिला सामोरे जातच जीवनाची लढाई पुढे नेणे अपरिहार्य आहे. दिवाळी म्हणूनही साजरी करणे अगत्याचे आहे. बाह्योपचारांनी लगेच स्थिती पालटणार नाही. ते मनापासून केलेले जातात.ते मनोरम आहेत. म्हणून त्यांचा आदर आणि स्वीकार करण्याचे अगत्यही राहते.

दिवाळीची एक ज्योत मी माझ्या मनात लावतो. तिचा प्रकाश बाहेर फाकणार नाही. कुणाला तो दिसणार नाही. सभोवती सगळे निराश करणारे आहे. त्याचे प्रतिबिंब माझ्या मनात पडून माझे अंतर काळवंडून जाण्याचा जाण्याचा धोका आहे. त्याच्या प्रतिक्रियेपोटी ते नैराश्‍याच्या काळोखात हरवून जाण्याची भीती आहे. त्याचा सामना करण्यासाठी तिथला प्रकाश प्रखर,तेजोमय राहायला हवा. विपरित स्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रतिकाराचे बळ आणि मांगल्यावरील विश्‍वास दृढ राहायला हवा.मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी ही ज्योत आहे.तशी ज्योत आपल्या प्रत्येकाच्या मनात उजळावी, तेवत राहावी, हीच माझी शुभेच्छा !

Tuesday, October 21, 2008

नरकासुर

दिवाळी आठवड्यावर आली आहे. ती साजरी करण्याची तयारी सुरू आहे. "तयारी'चे प्रकारही आता वाढले आहेत. दिवाळसणाची चाहूल लागली, की लहान थोरांचा उत्साह ओसंडून वाहू लागायचा. पोहे करायची तयारी सर्वांत मोठी असायची. भात उबविण्यापासून घरोघरी जमून पोहे बनविण्यासाठी ते कांडायचाही मोठा उत्सव असायचा. जिथे असे कांडणे होत नसे किंवा शक्‍य नसे तिथे "लाठी'वर पोहे कांडणाऱ्याचा शोध सुरू व्हायचा. त्याच्याकडे "नंबर' लावायचाही उत्साहाचा कार्यक्रम व्हायचा. सगळ्यांना सांगत, गाजावाजा करीतच तो पार पडला जायचा. नंतर भातकांडपाच्या गिरणीवर पोहे कांडपाची मशिने लागली. तरी, उत्सवाचे आणि उत्साहाचे मशिनीकरण झाले नाही. श्रम, पोहे कांडपाच्या निमित्ताने एकत्र जमणे, त्यानिमित्ताने सुखदुःखाच्या चार गोष्टी करणे, प्रपंचासंबंधी हितगुज साधणे हे कमी झाले. पण पोहे कांडायला जाण्याचा उत्सव संपला नाही. नंतर बाजारात तयार पोहे मिळू लागले आणि तयारीचा हा एक उत्सव लुप्तच होऊन गेला. पोह्याच्या जोडीने घराघरांत तयार केल्या जाणाऱ्या तिखट गोड पदार्थांचा प्रपंचही आवरला गेले. ते सारेच पदार्थही बाजारात तयार मिळू लागले.

उत्सवाचा आणि उत्साहाचा दुसरा मोठा घटक होता, तो आकाश कंदील तयार करण्याचा. त्याच्यासाठी रंगीत कागद आणण्यापासून घरात "खळ' करून प्रत्यक्षात तो साकारेपर्यंत अनेक दिवस आबालवृद्धांची मोठी धांदल चाललेली असायची. आता हव्या त्या प्रकारचे, हव्या त्या रंगसंगतीचे, वेगवेगळ्या किमतीचे आकाश कंदील, नक्षत्रे सारेच तयार मिळू लागले आहे. दिवाळसणाचे वातावरण भारून टाकणाऱ्या तयारीचे हे दोन घटक आता दिवाळसणाच्या एकूण कार्यक्रमातून हद्दपार झाले आहेत.ज्यांनी या जुन्या वातावरणातील खुमारी अनुभवली असेल, त्यांच्या मनात निश्‍चितच ते लुप्त झाल्याची रुखरुख घर करून राहिली असणार.

आता असा उत्साहाचा नवा घटक अवतरला आहे. त्याने दिवाळसणाच्या वातावरणाचा बराच मोठा अवकाश व्यापलेला आहे. तो आहे नरकासुराच्या प्रतिमा बनविण्याचा, त्या मिरविण्याचा, त्यांच्या स्पर्धा घेण्याचा. कधी कधी या नरकासुरांनीच दिवाळी व्यापली आहे, असे वाटावे, इतके या कार्यक्रमाचे आणि तद्‌नुषंगिक "उप-कार्यक्रमां'चे प्रस्थ वाढले आहे.

ठिकठिकाणी नरकासुर उभे करण्याचे काम सुरू झाले आहे. व्यक्ती, मंडळे, संस्था त्यात व्यस्त झाल्या आहेत. दरवर्षीचे हे दृष्य नव्याने, दमदारपणे गावोगावी, गल्लोगल्ली दिसू लागले आहे.

नरकासुर वध हा सत्याचा असत्यावरील विजय, दुर्गुणांवरील सद्‌गुणांचा,अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचा विजय मानला जातो. दिवाळी या विजयाचा सण आहे. दर वर्षी आपणच नरकासुर तयार करतो, त्याचा वध करतो, विजयोत्सव साजरा करतो. हे सारे प्रतीकात्मक आहे, हे खरे आहे. परंतु समाजाची एकंदर दशा पाहिली, त्याच्या वाटचालीची दिशा पाहिली,तर मन शंकाकुल होते. दरवर्षी मारूनही पुनःपुन्हा नरकासुर उभा राहतो आहेच. तो मरत नाही किंवा विजय मिरविण्यासाठी त्याला पुरते मारले जात नसावे! अवशिष्टातून पुन्हा तो आपला आकार धारण करवतो. भरपूर मिरवून घेतो.दिवाळीतल्या विजयाचे प्रतीक मागे पडले आहे, निस्तेज झाले आहे, नरकासुर आपल्यावर भारी पडतो आहे, असे वाटण्याजोगी स्थिती जागोजागी आढळते आहे. तशा घटना घडत आहेत. त्यातून नरकासुर आपल्या मानगुटीवर आरूढ होत आहे. त्यावर आपले नियंत्रण येत नाही तोवर नरकासुर वध अधुराच राहणार आहे. म्हणूनच जागोजागी नरकासुर उभे राहताना पाहून वाटते, आपण प्रकाशपूजेऐवजी अपप्रवृत्तीच्या नरकासुराचीच पूजा बांधण्यात तर गुंतलेलो नाही ना ?

Sunday, October 12, 2008

गांगुलीचे दुःख

सौरव गागुंलीने परवा क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे जाहीर केले.ज्या वर्तमानपत्रात त्याची याविषयीची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, तिथे मुलाखत दिली नसल्याचा त्याचा खुलासाही छापून आला आहे.अनौपचारिक वार्तालापाच्या वेळी बोलताना ते ऐकणाऱ्या उत्साही पत्रकाराने आपल्या पत्रात त्याला प्रसिद्धी देऊन टाकली. त्या पत्रकाराने याबाबतीत व्यावसायिक संकेत पाळले नाहीत, हे जेवढे खरे, तेवढेच अनौपचारिकपणे का असेना, गांगुली ते बोलला आणि जे बोलला ते मनातले खरे खरे बोलला, हेही तेवढेच खरे. त्या बोलण्यातून त्याच्या मनातला सल व्यक्त झाला आहे.

गांगुलीने निवृत्तीचा निर्णय सांगितला, तो त्याच्यातील क्रिकेट संपले, चांगला खेळ करण्याची त्याची क्षमता आटली म्हणून नव्हे, तर सततच्या अवहेलनेला वैतागून, ती असह्य होऊन त्याने हा निर्णय केला आहे. त्याने तो करावा अशी अगतिकता त्याच्या वाट्याला उभी केली गेली आहे. खेळाडू म्हणून गांगुली आणि अशा स्थितीत येणारा अन्यही कुणाबाबत आणि खेळाबाबतही ही वाईटच बाब आहे.

वयोमानपरत्वे खेळावर परिणाम झालेला असला, तरी अन्य अनेक खेळाडूंपेक्षा गेल्या दोनेक वर्षातला गांगुलीचा खेळ उजवा आहे. सर्वप्रिय असलेल्या सचिन तेंडुलकरपेक्षाही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. अनेकांना हे आवडणार नाही, पण ते खरे आहे. सचिन दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला.गांगुलीला मात्र वगळण्यात आले. त्यांच्या काही विधानांमुळे, काही कृतीमुळे अनेकदा तो वादात सापडला. खेळाच्या बाबतीत चढउतार झाले. तुलनेने तो चांगलाच खेळला. साहजिक संघातून वगळले जाणे त्याच्या जिव्हारी लागणारच. त्याच्या स्वभावातील स्वाभिमानाचा कंगोरा थोडा अधिकच तीव्र असल्याने, संघातून वगळण्याचे निर्णय अधिकच घायाळ करून गेले असतील, यात मला तरी शंका नाही. क्रिकेट मंडळातील पदाधिकारी, अन्य खेळाडू, तथाकथित खेळ समीक्षक यांनी गांगुलीसह "फॅब फोर'मधील खेळाडूंच्या निवृत्तीबाबत व्यक्त केलेली मते, सन्मानाने निवृत्त होण्याच्या जाहीरपणे केलेल्या सूचना गांगुलीला आपल्या जखमांवर मीठ चोळल्यासारख्या वाटल्या असतील. सन्मानाने निवृत्त होणे ही खरेच गांगुलीसारख्याचा गौरव वाढविणारी बाब आहे.ते सांगणाऱ्यांना तोवर त्यांचा सन्मान करायला विसरू नये. गांगुलीच्या बाबतीत त्याचा बऱ्याच जणांना विसर पडला आहे. अवहेलनेला त्रासून, असन्मानाने अगतिक होऊन त्याला निवृत्तीचा निर्णय करावा लागला. एकप्रकारे त्याने संघात स्थान मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याच घाईत निर्णय करून टाकला आहे. खेळ संस्कृतीला ही फारशी स्पृहणीय गोष्ट नाही.

एकूणच बाजारूपणाचा सर्व क्षेत्रांमध्ये फैलाव होत चालला आहे, त्याचे यातही एक उदाहरण दिसते. माणसाकडे केवळ गुणवत्ता असून चालत नाही, ती दिसावी लागते; ही पायरी मागे पडून , ती दिसूनही भागत नाही, ती आहे, आहे म्हणून गाजावाजा करणारे आणि कधी कधी तसा कांगावा करणारे गॉडफादरही असणे आवश्‍यक झाले आहे. टी. पी. सिंग कुठे गेला, या गांगुलीच्या प्रश्‍नाचे उत्तर यात दडलेले आहे. समाजामध्ये नव्याने रुजत चाललेल्या "व्यवहारा'चा हा अविभिन्न पैलू बनू लागला आहे.

Wednesday, October 8, 2008

मृत्यूसमयीची अनुभूती

माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते?मरणाऱ्याचा मरतानाचा नेमका अनुभव काय असतो? सनातन काळापासून माणसाच्या बुद्धीला हा प्रश्‍न छळत आला आहे. ऋषी मुनींनी, योग्यांनी, ज्ञानवंतानी, संतांनी, तत्त्वज्ञांनी या प्रश्‍नाचा सतत शोध घेतला आहे. आजही शोध आणि संशोधन सुरू आहे. प्रश्‍नाचे नेमके उत्तर मात्र मानवाच्या बुद्धीला हुलकावणी देत आहे.

माझ्या मनात हा विषय ताजा होण्याला गेल्या आठवड्यातील एका बातमीचे निमित्त घडले आहे. जगातील निरनिराळ्या 25 इस्पितळांत मृत्यूसमयीच्या, मृत्यूसमीपच्या अनुभवांबाबत संशोधनाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काही अनुभवांचे उल्लेख आहेत. तशा तऱ्हेचे काही उल्लेख मी याआधीही ऐकले आहेत. अनेकांनी ऐकले असतील, वाचले असतील.

शेवटच्या क्षणाला आपले सारे आयुष्य क्षणार्धात मनचक्षूसमोरून सरकून जाणे...अतिशय तेजस्वी, पवित्र आणि अनंत प्रकाशात आपण प्रवेशतो आहोत, अशी अनुभूती होणे....कुणातरी दिव्य विभूतीची आकृती डोळ्यांसमोर तरळणे... आपल्या अतिशय लाडक्‍या, आवडत्या व्यक्तीची प्रतिमा मनात उमटणे... अनंत अवकाशात, निर्वात पोकळीत आपण तरंगत असल्यासारखे वाटणे... वगैरे ...वगैरे...

अशा अनेक कथनाच्या, माहितीच्या आधारेही मृत्यूच्या अनुभूतीचा शोध आणि चिकित्सा होत आली आहे. शरीर निष्प्राण होते म्हणजे काय? शरीरातून आत्मा निघून जातो म्हणजे काय होते?

सामान्य माणसालासुद्धा आयुष्यात किमान एकदा तरी हा प्रश्‍न पडतोच? सगळेच, सामान्य वा असामान्य, काही त्याच्या उत्तराचा पाठपुरावा करीत नाहीत. सगळ्यांनाच काही तो तितक्‍या निकडीचा वाटत नाही. कदाचित, नकळत उठलेल्या एखाद्या ओरखड्यासारखाही कधी हा प्रश्‍न मनाला स्पर्शून गेलेला असतो. तशा ओरखड्याइतकीच त्याचीही दखल घेतली जाते, असेही घडते.

मला हा प्रश्‍न अनेकदा पडला आहे. कुटुंबीयांचे, नातलगांचे, परिचितांचे मृत्यू पाहताना आणि कधी कधी काही देणेघेणे नसलेल्या,अपरिचिताच्या मृत्यूविषयी माहिती, बातमी वाचतानाही. आणि कधी यापैकी ताजे काहीही घडलेले नसतानाही?जिज्ञासा म्हणूनही.

प्रश्‍न आणखीनही आहेत.

प्राण आणि आत्मा एकच आहेत का? प्राण आधी जातो की आत्मा आधी शरीर सोडतो? माणूस बेशुद्धावस्थेत (कोमा) जातो तेव्हा नेमके काय झालेले असते? शरीरात प्राण असतात, आत्मा नसतो,की आत्मा असतो आणि प्राण नसतात? रुग्णाला कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर ठेवले जाते, तेव्हा त्या शरीरात प्राण असतात, आत्मा नसतो की आत्मा असतो आणि प्राण नसतो?शरीरात प्राण असतील तर आत्मा राहतो, की आत्मा असेल तर प्राण असतो?

खूप वर्षांआधी वाचले होते, "प्राण आणि आत्मा हे दोन स्वतंत्र घटक आहेत.जसे एखादे यंत्र विजेवर चालते.पण केवळ वीज असली म्हणून ते चालत नाही, वीजपुरवठा सुरू-बंद करणारे बटण कुणी तरी हाताळावे लागते.यंत्र म्हणजे शरीर, वीज म्हणजे प्राण आणि बटण हाताळणारा आत्मा.'

यंत्राच्या बाबतीत तीनही घटक एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले जाऊ शकतात. शरीररूपी यंत्रात हे तिन्ही स्वतंत्र तरी एका ठिकाणी असतात. ते वेगळे होतात, तेव्हा यंत्र (शरीर ) कायमचे निकामी होऊन पडते.

या घटकाचे परस्परसंबंध,परस्परनिगडित प्रक्रिया पद्धती हे एक गूढ आहे.त्या गुढात बहुधा मृत्यूचे, मृत्यूसमयीच्या नेमक्‍या अनुभूतीचे रहस्य दडले असावे.

Monday, October 6, 2008

गांधीजी ः आउटडेटेड ?

आमच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे मासिक "काव्यसंध्या' कार्यक्रम काल, शनिवारी पार पडला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कविमित्रांची ही मैफल जमते. गेली चार वर्षे. प्रत्येक वेळी त्याच उत्साहाने, तेवढ्याच दमदारपणे. सर्व प्रकारच्या कविता तिथे सादर केल्या जातात. हसविणाऱ्या, काळजात रुतणाऱ्या,कुणाला प्रीतीत न्हालेल्या मुग्ध क्षणाचे आठव रोमरोमी हुळहुळवणाऱ्या, कुणाचे विसरू म्हणणारे सल जागविणाऱ्या, अवखळ बाल्याचे आल्हाद फुलविणाऱ्या, तर कधी समाजातल्या दाहक वास्तवाची आच पेलणाऱ्या, कारुण्याचे आर्त प्रकटवणाऱ्या. ही संध्याकाळ काव्याच्या असीम सामर्थ्यानिशी भेटते. कधी खूप आनंद देऊन जाते, कधी अस्वस्थतेचे बीज उरात पेरून जाते. तिच्या सर्व रंग -भावानिशी मैफलीत सहभागी होणाऱ्या, रमाणाऱ्या सर्वांना मात्र ती नेहमी हवीहवीशीच वाटते.

काल सादर झालेली एक कविता अशीच अस्वस्थ करून गेली. दोन दिवसांपूर्वीच गांधीजयंती होती. त्या पार्श्‍वभूमावर गांधीजींचा संदर्भ असलेली एखादी कविता सादर होईल, अशी अटकळ होती. दोन कविता सादर झाल्या. त्यातील पुढील कविता क्षणात मनात रुतली.

गांधीजींच्या आचरणातील, सांगण्यातील चैतन्य लोकांनी कधीच सोयीस्करपणे अडगळीत टाकून दिले आहे. त्यांच्या नावाच्या माहात्म्याचा बाजार मात्र तेवढ्याच सोयीस्करपणे, मानभावीपणे सुरू आहे. हा अनुभव आता खूपच सार्वत्रिक झाला आहे. संवेदनाशील माणूस त्यामुळे खंतावत चालला आहे. ती खंत, ती व्यथा वेगवेगळ्या माध्यमांतून सारखी व्यक्त होत आहे.ही कविता त्या साखळीतील एक दुवा आहे.

व्यवहारी आणि बाजारू बनत चाललेल्या जगात सत्य बोलणे, सत्य आचरणे हा गुन्हा ठरावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.असत्य आणि हिंसा, दमन, ढोंगीपणा, खुशामतखोरी यांची कास धरणाऱ्यांची चलती झालेली दिसते.संवेदनाशील असणे हा चेष्टेचा विषय केला जात आहे.या मूल्यांची घसरण असा थराला पोचली आहे, की खुद्द गांधीजी पुन्हा अवतरले, तरी त्यांना ती थोपवणे शक्‍य होणार नाही, अशा नैराश्‍यायुक्त भावनेचे सावट विचारी मनांवर पडले आहे. किंबहुना गांधीजीही या लोकांपुढे गांधीजी बनू शकणार नाही, असा तिमिर दाटल्याची घायाळ भावना अनेकांच्या मनांत घर करून राहिली आहे.ती भावना या कवितेत व्यक्त झालेली आहे.

सत्य बोलणे पार संपले आहे, सत्याचरण पूर्ण लोपले आहे, कुठे आशेचा किरणच राहिलेला नाही, असा पार कडेलोट झालेला नाही, अशी आशा तरीही माझ्या मनात आहे.या मूल्यांचे श्रेष्ठत्व वादातीत आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कुणाही संवेदनाशील मनाला शंका नाही. त्याचा सातत्याने होणारा आविष्कारच त्याची ग्वाही देत आहे.त्यातच आशेचा अवकाश दडला आहे.खंत या क्षणांची आहे. या मूल्यांना त्याला घेरून राहिलेला अंधार खूप दूरवर पसरलेला आहे. त्याच्या उरात दडलेले दुःखाचे आसूड यातना देणारे आहे.म्हणूनच मनांवरही निराशेचे मळभ दाटलेले आहे.

सौ.कविता बोरकर यांची ही कविता. मुळातून वाचण्यासारखी.

आउटडेटेड

गांधीजी, तुम्ही आउटडेटेड झालायत.

गांधीजी, तुम्ही खरंच आता आउटडेटेड झालायत.

आता तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात परिक्षेपुरतंच वाचायचं,

बस्स्‌,

फार तर,

ंमनोरंजन म्हणून तीन तास "मुन्नाभाई'बरोबर भेटायचं,

तेव्हा,

"मुन्नाभाई'ला त्याच्या भाबड्या कल्पनांकरता गोंजारायचं,

म्हणायचं,

"वेडा रे वेडा"

हे बापू तेव्हाचे,

त्या काळातले,

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे !

आताच्या वास्तवात, सत्य बोलणंच गुन्हा होऊन बसलाय

शहाणा असलास तर खोटं बोलायला शिक.

सुरवातीला जड जाईल ते,

तेव्हा, खाटीक आठव,

तो नाही का सरावलाय?

तो नाही का अलिप्त राहायला शिकलाय?

तूही "संवेदनाच' मारायला शिक,

हळूहळू,

बेमालूमपणे,

म्हणजे,

तुला पण जमेल एखाद्या रोबोसारखं जगणं.

यंत्र युगात हेच तंत्र वापर,

हाच मंत्र जप.

अरे, गांधीजींची तीन माकडं कधीच डार्विनच्या सिद्धांतानुसार

मानवाच्या दिशेने वाटचाल करू लागलीयत,

म्हणून तर,

सगळेच डोळ्यांवर, तोंडावर, कानांवर हात ठेवून

तोंड असून मुके,

कान असून बहिरे,

अन्‌ डोळे असून आंधळे झाले आहेत.

ह्यांना जागं कसं करायचं?

एका नवीन सिद्धांताची आता गरज आहे.

असहकार, अहिंसाचार ही शस्त्रे बोथट झालीयत.

त्यांना धार काढायला हवी.

गांधीजी, ते काम तुम्हाला जमणार आहे का?

नाही ना ?

तुमच्या हातातल्या काठीचा आधार घेऊन चालताना,

जास्तच ठेचकाळणारा रस्ता लक्षात येतोय ना?

जाऊ दे,

म्हणून म्हटलं,

गांधीजी, तुम्ही आऊटडेटेड झालायत.

गांधीजी, तुम्ही खरंच आता आउटडेटेड झालायत.

Thursday, October 2, 2008

सत्य आणि अहिंसा...

"महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावरून आपण वाटचाल करूया..'

सकाळी माझ्या मोबाईलवर या आशयाचा संदेश आला. माझ्याप्रमाणे आपल्याही मोबाईलवर असा संदेश आला असेल.

आज गांधीजयंती. त्यानिमित्ताने कुणाला तरी गांधीजी आठवणे आणि आपल्याला तो आठवला हे इतरांना कळविण्याचा प्रयत्न करणे हे काही नवीन नाही. हा प्रयत्न प्रामाणिकही असेल. पण गांधीजी जे जगले, ते तत्त्वज्ञान आणि सिद्धांत लोकांना गांधीजयंतीदिनीच का आठवतात? त्यांची सुभाषिते इतरांना सांगण्यासाठी गांधीजयंतीच का उजाडावी लागते? हे प्रश्‍न माझ्या मनाला कुरतडतातच.

आपण सत्य आणि अहिंसेच्या मार्गानेच जाऊया.. जाऊयाच!

कधीपासून?

आधीपासून तुम्ही (प्रेषक) हा मार्ग स्वीकारलेला आहे, की यापुढे स्वीकारायचा आहे?आधीपासून तुमची वाटचाल या मार्गावरून होत असेल, तर मला या सत्यमार्गानुसरणाचा तुमचा अनुभव जाणून घ्यायची इच्छा आहे. नसेल, तर तुम्हाला हा साक्षात्कार एकदम कसा काय झाला? काय त्यामागची भूमिका आहे? पार्श्‍वभूमी काय आहे? ते समजून घ्यायला मला आवडेल.

सत्याचरण, अहिंसाचरण हे गांधीजींचे प्रत्यक्षातले जगणे होते.त्याला जागायचे असेल, तर वरील सुभाषित आपल्या रोजच्या जीवनाचे अविभिन्न अंग बनले पाहिजे.असा संदेश गांधीजयंती नसताना माझ्यापर्यंत, किंवा अशाच अन्य लोकांपर्यंत पोचायला हवा. त्याविषयीच्या अनुभवासह.अन्यथा,हे सुभाषित म्हणजे नुसत्या शाब्दिक जंजाळात स्वतःला गुंतवून घेण्यासारखे होईल. त्याला काय अर्थ आहे?

आजवर मी नेहमी सत्यच अनुसरत आलो. अहिंसेचे तत्त्व मानले.सत्य बोललो, सत्याने वागलो.काही ढोंगी आणि दांभिक लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन माझी कोंडी केली. खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. अजून करीत आहेत.तरी, सत्य आणि अहिंसेवरची माझी निष्ठा ढळलेली नाही.पण, सत्याचरण म्हणजे कमकुवतपणा,अहिंसेचे अनुसरण म्हणजे दुबळेपणा समजला जातो की काय, अशी मला कधी कधी शंका येते. सत्याचरण हा अपराध आहे काय, असा प्रश्‍न परिस्थिती मनापुढे उभा करते. त्याच्या उत्तराचा मी शोध घेतो आहे.

गांधीजींनी दाखविलेल्या मार्गाविषयी अविश्‍वास असायचेही कारण नाही. पण, शोधाचा निष्कर्ष हाती लागेपर्यंत सोसाव्या लागणाऱ्या यातना, मनस्ताप, अवहेलना,उपेक्षा घायाळ करतात, व्यथित करतात.आपण अहिंसेचे पूजक असलो,तरी ही एक प्रकारची हिंसा चाललेली आहे, त्याचे आपण बळी ठरतो आहोत, ही भावना सारखी टोचत राहते.का सारे सहन करावे,अपराध नसताना?

असे अनेक प्रश्‍न मनाच येतातच. ते रक्तबंबाळ करतात. सारेच असहनीय होते, कारण मी काही महात्मा नाही...