Sunday, October 12, 2008

गांगुलीचे दुःख

सौरव गागुंलीने परवा क्रिकेटमधून निवृत्त होण्याचे जाहीर केले.ज्या वर्तमानपत्रात त्याची याविषयीची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे, तिथे मुलाखत दिली नसल्याचा त्याचा खुलासाही छापून आला आहे.अनौपचारिक वार्तालापाच्या वेळी बोलताना ते ऐकणाऱ्या उत्साही पत्रकाराने आपल्या पत्रात त्याला प्रसिद्धी देऊन टाकली. त्या पत्रकाराने याबाबतीत व्यावसायिक संकेत पाळले नाहीत, हे जेवढे खरे, तेवढेच अनौपचारिकपणे का असेना, गांगुली ते बोलला आणि जे बोलला ते मनातले खरे खरे बोलला, हेही तेवढेच खरे. त्या बोलण्यातून त्याच्या मनातला सल व्यक्त झाला आहे.

गांगुलीने निवृत्तीचा निर्णय सांगितला, तो त्याच्यातील क्रिकेट संपले, चांगला खेळ करण्याची त्याची क्षमता आटली म्हणून नव्हे, तर सततच्या अवहेलनेला वैतागून, ती असह्य होऊन त्याने हा निर्णय केला आहे. त्याने तो करावा अशी अगतिकता त्याच्या वाट्याला उभी केली गेली आहे. खेळाडू म्हणून गांगुली आणि अशा स्थितीत येणारा अन्यही कुणाबाबत आणि खेळाबाबतही ही वाईटच बाब आहे.

वयोमानपरत्वे खेळावर परिणाम झालेला असला, तरी अन्य अनेक खेळाडूंपेक्षा गेल्या दोनेक वर्षातला गांगुलीचा खेळ उजवा आहे. सर्वप्रिय असलेल्या सचिन तेंडुलकरपेक्षाही त्याची कामगिरी चांगली झाली आहे. अनेकांना हे आवडणार नाही, पण ते खरे आहे. सचिन दुखापतीमुळे संघाबाहेर राहिला.गांगुलीला मात्र वगळण्यात आले. त्यांच्या काही विधानांमुळे, काही कृतीमुळे अनेकदा तो वादात सापडला. खेळाच्या बाबतीत चढउतार झाले. तुलनेने तो चांगलाच खेळला. साहजिक संघातून वगळले जाणे त्याच्या जिव्हारी लागणारच. त्याच्या स्वभावातील स्वाभिमानाचा कंगोरा थोडा अधिकच तीव्र असल्याने, संघातून वगळण्याचे निर्णय अधिकच घायाळ करून गेले असतील, यात मला तरी शंका नाही. क्रिकेट मंडळातील पदाधिकारी, अन्य खेळाडू, तथाकथित खेळ समीक्षक यांनी गांगुलीसह "फॅब फोर'मधील खेळाडूंच्या निवृत्तीबाबत व्यक्त केलेली मते, सन्मानाने निवृत्त होण्याच्या जाहीरपणे केलेल्या सूचना गांगुलीला आपल्या जखमांवर मीठ चोळल्यासारख्या वाटल्या असतील. सन्मानाने निवृत्त होणे ही खरेच गांगुलीसारख्याचा गौरव वाढविणारी बाब आहे.ते सांगणाऱ्यांना तोवर त्यांचा सन्मान करायला विसरू नये. गांगुलीच्या बाबतीत त्याचा बऱ्याच जणांना विसर पडला आहे. अवहेलनेला त्रासून, असन्मानाने अगतिक होऊन त्याला निवृत्तीचा निर्णय करावा लागला. एकप्रकारे त्याने संघात स्थान मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन त्याच घाईत निर्णय करून टाकला आहे. खेळ संस्कृतीला ही फारशी स्पृहणीय गोष्ट नाही.

एकूणच बाजारूपणाचा सर्व क्षेत्रांमध्ये फैलाव होत चालला आहे, त्याचे यातही एक उदाहरण दिसते. माणसाकडे केवळ गुणवत्ता असून चालत नाही, ती दिसावी लागते; ही पायरी मागे पडून , ती दिसूनही भागत नाही, ती आहे, आहे म्हणून गाजावाजा करणारे आणि कधी कधी तसा कांगावा करणारे गॉडफादरही असणे आवश्‍यक झाले आहे. टी. पी. सिंग कुठे गेला, या गांगुलीच्या प्रश्‍नाचे उत्तर यात दडलेले आहे. समाजामध्ये नव्याने रुजत चाललेल्या "व्यवहारा'चा हा अविभिन्न पैलू बनू लागला आहे.

No comments: