Wednesday, October 8, 2008

मृत्यूसमयीची अनुभूती

माणूस मरतो म्हणजे नेमके काय होते?मरणाऱ्याचा मरतानाचा नेमका अनुभव काय असतो? सनातन काळापासून माणसाच्या बुद्धीला हा प्रश्‍न छळत आला आहे. ऋषी मुनींनी, योग्यांनी, ज्ञानवंतानी, संतांनी, तत्त्वज्ञांनी या प्रश्‍नाचा सतत शोध घेतला आहे. आजही शोध आणि संशोधन सुरू आहे. प्रश्‍नाचे नेमके उत्तर मात्र मानवाच्या बुद्धीला हुलकावणी देत आहे.

माझ्या मनात हा विषय ताजा होण्याला गेल्या आठवड्यातील एका बातमीचे निमित्त घडले आहे. जगातील निरनिराळ्या 25 इस्पितळांत मृत्यूसमयीच्या, मृत्यूसमीपच्या अनुभवांबाबत संशोधनाचा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काही अनुभवांचे उल्लेख आहेत. तशा तऱ्हेचे काही उल्लेख मी याआधीही ऐकले आहेत. अनेकांनी ऐकले असतील, वाचले असतील.

शेवटच्या क्षणाला आपले सारे आयुष्य क्षणार्धात मनचक्षूसमोरून सरकून जाणे...अतिशय तेजस्वी, पवित्र आणि अनंत प्रकाशात आपण प्रवेशतो आहोत, अशी अनुभूती होणे....कुणातरी दिव्य विभूतीची आकृती डोळ्यांसमोर तरळणे... आपल्या अतिशय लाडक्‍या, आवडत्या व्यक्तीची प्रतिमा मनात उमटणे... अनंत अवकाशात, निर्वात पोकळीत आपण तरंगत असल्यासारखे वाटणे... वगैरे ...वगैरे...

अशा अनेक कथनाच्या, माहितीच्या आधारेही मृत्यूच्या अनुभूतीचा शोध आणि चिकित्सा होत आली आहे. शरीर निष्प्राण होते म्हणजे काय? शरीरातून आत्मा निघून जातो म्हणजे काय होते?

सामान्य माणसालासुद्धा आयुष्यात किमान एकदा तरी हा प्रश्‍न पडतोच? सगळेच, सामान्य वा असामान्य, काही त्याच्या उत्तराचा पाठपुरावा करीत नाहीत. सगळ्यांनाच काही तो तितक्‍या निकडीचा वाटत नाही. कदाचित, नकळत उठलेल्या एखाद्या ओरखड्यासारखाही कधी हा प्रश्‍न मनाला स्पर्शून गेलेला असतो. तशा ओरखड्याइतकीच त्याचीही दखल घेतली जाते, असेही घडते.

मला हा प्रश्‍न अनेकदा पडला आहे. कुटुंबीयांचे, नातलगांचे, परिचितांचे मृत्यू पाहताना आणि कधी कधी काही देणेघेणे नसलेल्या,अपरिचिताच्या मृत्यूविषयी माहिती, बातमी वाचतानाही. आणि कधी यापैकी ताजे काहीही घडलेले नसतानाही?जिज्ञासा म्हणूनही.

प्रश्‍न आणखीनही आहेत.

प्राण आणि आत्मा एकच आहेत का? प्राण आधी जातो की आत्मा आधी शरीर सोडतो? माणूस बेशुद्धावस्थेत (कोमा) जातो तेव्हा नेमके काय झालेले असते? शरीरात प्राण असतात, आत्मा नसतो,की आत्मा असतो आणि प्राण नसतात? रुग्णाला कृत्रिम श्‍वसनयंत्रणेवर ठेवले जाते, तेव्हा त्या शरीरात प्राण असतात, आत्मा नसतो की आत्मा असतो आणि प्राण नसतो?शरीरात प्राण असतील तर आत्मा राहतो, की आत्मा असेल तर प्राण असतो?

खूप वर्षांआधी वाचले होते, "प्राण आणि आत्मा हे दोन स्वतंत्र घटक आहेत.जसे एखादे यंत्र विजेवर चालते.पण केवळ वीज असली म्हणून ते चालत नाही, वीजपुरवठा सुरू-बंद करणारे बटण कुणी तरी हाताळावे लागते.यंत्र म्हणजे शरीर, वीज म्हणजे प्राण आणि बटण हाताळणारा आत्मा.'

यंत्राच्या बाबतीत तीनही घटक एकाच वेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी पाहिले जाऊ शकतात. शरीररूपी यंत्रात हे तिन्ही स्वतंत्र तरी एका ठिकाणी असतात. ते वेगळे होतात, तेव्हा यंत्र (शरीर ) कायमचे निकामी होऊन पडते.

या घटकाचे परस्परसंबंध,परस्परनिगडित प्रक्रिया पद्धती हे एक गूढ आहे.त्या गुढात बहुधा मृत्यूचे, मृत्यूसमयीच्या नेमक्‍या अनुभूतीचे रहस्य दडले असावे.

1 comment:

bharatipawaskar said...

Mritu ha mazha atyant avadata vishay. Aapan sopya shabdant mandlele prashn vicharat takun gele. Ya vishayavar ekhade charcha satr ghadvun anata yenar nahi ka?
Baryach jananna he kode ulgadayche asel.