आमच्या गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे मासिक "काव्यसंध्या' कार्यक्रम काल, शनिवारी पार पडला. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी कविमित्रांची ही मैफल जमते. गेली चार वर्षे. प्रत्येक वेळी त्याच उत्साहाने, तेवढ्याच दमदारपणे. सर्व प्रकारच्या कविता तिथे सादर केल्या जातात. हसविणाऱ्या, काळजात रुतणाऱ्या,कुणाला प्रीतीत न्हालेल्या मुग्ध क्षणाचे आठव रोमरोमी हुळहुळवणाऱ्या, कुणाचे विसरू म्हणणारे सल जागविणाऱ्या, अवखळ बाल्याचे आल्हाद फुलविणाऱ्या, तर कधी समाजातल्या दाहक वास्तवाची आच पेलणाऱ्या, कारुण्याचे आर्त प्रकटवणाऱ्या. ही संध्याकाळ काव्याच्या असीम सामर्थ्यानिशी भेटते. कधी खूप आनंद देऊन जाते, कधी अस्वस्थतेचे बीज उरात पेरून जाते. तिच्या सर्व रंग -भावानिशी मैफलीत सहभागी होणाऱ्या, रमाणाऱ्या सर्वांना मात्र ती नेहमी हवीहवीशीच वाटते.
काल सादर झालेली एक कविता अशीच अस्वस्थ करून गेली. दोन दिवसांपूर्वीच गांधीजयंती होती. त्या पार्श्वभूमावर गांधीजींचा संदर्भ असलेली एखादी कविता सादर होईल, अशी अटकळ होती. दोन कविता सादर झाल्या. त्यातील पुढील कविता क्षणात मनात रुतली.
गांधीजींच्या आचरणातील, सांगण्यातील चैतन्य लोकांनी कधीच सोयीस्करपणे अडगळीत टाकून दिले आहे. त्यांच्या नावाच्या माहात्म्याचा बाजार मात्र तेवढ्याच सोयीस्करपणे, मानभावीपणे सुरू आहे. हा अनुभव आता खूपच सार्वत्रिक झाला आहे. संवेदनाशील माणूस त्यामुळे खंतावत चालला आहे. ती खंत, ती व्यथा वेगवेगळ्या माध्यमांतून सारखी व्यक्त होत आहे.ही कविता त्या साखळीतील एक दुवा आहे.
व्यवहारी आणि बाजारू बनत चाललेल्या जगात सत्य बोलणे, सत्य आचरणे हा गुन्हा ठरावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.असत्य आणि हिंसा, दमन, ढोंगीपणा, खुशामतखोरी यांची कास धरणाऱ्यांची चलती झालेली दिसते.संवेदनाशील असणे हा चेष्टेचा विषय केला जात आहे.या मूल्यांची घसरण असा थराला पोचली आहे, की खुद्द गांधीजी पुन्हा अवतरले, तरी त्यांना ती थोपवणे शक्य होणार नाही, अशा नैराश्यायुक्त भावनेचे सावट विचारी मनांवर पडले आहे. किंबहुना गांधीजीही या लोकांपुढे गांधीजी बनू शकणार नाही, असा तिमिर दाटल्याची घायाळ भावना अनेकांच्या मनांत घर करून राहिली आहे.ती भावना या कवितेत व्यक्त झालेली आहे.
सत्य बोलणे पार संपले आहे, सत्याचरण पूर्ण लोपले आहे, कुठे आशेचा किरणच राहिलेला नाही, असा पार कडेलोट झालेला नाही, अशी आशा तरीही माझ्या मनात आहे.या मूल्यांचे श्रेष्ठत्व वादातीत आहे. त्यांच्या श्रेष्ठत्वाबद्दल कुणाही संवेदनाशील मनाला शंका नाही. त्याचा सातत्याने होणारा आविष्कारच त्याची ग्वाही देत आहे.त्यातच आशेचा अवकाश दडला आहे.खंत या क्षणांची आहे. या मूल्यांना त्याला घेरून राहिलेला अंधार खूप दूरवर पसरलेला आहे. त्याच्या उरात दडलेले दुःखाचे आसूड यातना देणारे आहे.म्हणूनच मनांवरही निराशेचे मळभ दाटलेले आहे.
सौ.कविता बोरकर यांची ही कविता. मुळातून वाचण्यासारखी.
आउटडेटेड
गांधीजी, तुम्ही आउटडेटेड झालायत.
गांधीजी, तुम्ही खरंच आता आउटडेटेड झालायत.
आता तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकात परिक्षेपुरतंच वाचायचं,
बस्स्,
फार तर,
ंमनोरंजन म्हणून तीन तास "मुन्नाभाई'बरोबर भेटायचं,
तेव्हा,
"मुन्नाभाई'ला त्याच्या भाबड्या कल्पनांकरता गोंजारायचं,
म्हणायचं,
"वेडा रे वेडा"
हे बापू तेव्हाचे,
त्या काळातले,
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचे !
आताच्या वास्तवात, सत्य बोलणंच गुन्हा होऊन बसलाय
शहाणा असलास तर खोटं बोलायला शिक.
सुरवातीला जड जाईल ते,
तेव्हा, खाटीक आठव,
तो नाही का सरावलाय?
तो नाही का अलिप्त राहायला शिकलाय?
तूही "संवेदनाच' मारायला शिक,
हळूहळू,
बेमालूमपणे,
म्हणजे,
तुला पण जमेल एखाद्या रोबोसारखं जगणं.
यंत्र युगात हेच तंत्र वापर,
हाच मंत्र जप.
अरे, गांधीजींची तीन माकडं कधीच डार्विनच्या सिद्धांतानुसार
मानवाच्या दिशेने वाटचाल करू लागलीयत,
म्हणून तर,
सगळेच डोळ्यांवर, तोंडावर, कानांवर हात ठेवून
तोंड असून मुके,
कान असून बहिरे,
अन् डोळे असून आंधळे झाले आहेत.
ह्यांना जागं कसं करायचं?
एका नवीन सिद्धांताची आता गरज आहे.
असहकार, अहिंसाचार ही शस्त्रे बोथट झालीयत.
त्यांना धार काढायला हवी.
गांधीजी, ते काम तुम्हाला जमणार आहे का?
नाही ना ?
तुमच्या हातातल्या काठीचा आधार घेऊन चालताना,
जास्तच ठेचकाळणारा रस्ता लक्षात येतोय ना?
जाऊ दे,
म्हणून म्हटलं,
गांधीजी, तुम्ही आऊटडेटेड झालायत.
गांधीजी, तुम्ही खरंच आता आउटडेटेड झालायत.
No comments:
Post a Comment