Tuesday, October 28, 2008

शुभ दीपावली !

दिवाळीचा उत्साह ओसंडून आला आहे.
महागाई,मंदी, हिंसाचार, भ्रष्टाचार, अनाचार ... आदींच्या काळ्या सावल्यांचे थैमान सुरू आहेच. त्याने शरीर-मन थोडे बिचकल्यासारखे झाले आहे, थबकलेले नाही. दिवाळीसारख्या सणांमध्ये असे बळ असते, की काय नकळे!

शुभेच्छांची देवाणघेवाण जोरात आहे.मोबाईलसारख्या सेवांमुळे त्यांची माध्यमे वाढली आहेत. त्या प्रमाणात ही देवघेवही वाढली आहे.

आकाशदिवे, नक्षत्रे, लुकलुकणाऱ्या बल्बांच्या माळा यांच्या माध्यमातून प्रकाशाची आरास सुरू आहे. विश्‍वामित्राने चिडून जाऊन म्हणे एकदा प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रण केला होता. तो तडीस गेला नाही. दिवस मावळताच आता विद्युत्‌दीपांच्या आराशींमुळे नक्षत्रलोकच धरतीवर उतरल्याचा भास होऊ लागतो आहे! तेवढ्यापुरती एक प्रतिसृष्टी सध्या भासमान होत आहे.

शुभेच्छांची देवघेव, प्रकाशदीपांची आरास मन खुलविते आहे. हे बाह्योपचार आहेत.त्याने दर वर्षी जाळले जाणारे नरकासुर एकदाचे भस्मीभूत होऊन जातील, उजळणाऱ्या आसंमताखाली माणसांच्या वाटा निर्विघ्न होऊन कायम प्रकाशमान होतील, असे नाही. त्यांच्या पावलापुढचा काळोख संपून जाईल किंवा नव्याने त्या पावलांना काळोख घेरणार नाही, असेही नाही. निर्माण केलेली नरकासुराची प्रतिमा जाळता येते, नेमानेच ती जाळलीही जाईल, ज्यांच्या मनांतच नरकासुर वसतीला आला आहे, त्याला तिथून कोण आणि कसे हाकलून लावणार आहे? ते जिवंत "नरकासुर' जाळले जाणार नाहीत. त्यातल्या एखाद दुसऱ्या "नरकासुरा'चा बंदोबस्त झाला किंवा त्याची सद्दी संपली, तरी त्याची जागा घ्यायला नवे नवे "नरकासुर' समाजात तयारच आहेत. ती स्थिती सहजी बदलणारी नाही. बदलू नये, अशा तजविजीत कायम गुंतलेले "मोठे नरकासुर'ही आहेतच. हे सर्वच जण सामान्य जनांचे जगणे असह्य,अडचणीचे करीत आहेत. त्यांची चलती असेतोवर सामान्यांच्या जीवनात विपदा आणि दुःख हे राहणारच आहे. सद्‌गुणांची आणि त्याची कास धरणाऱ्यांची उपेक्षा, अवहेलना होत राहणार आहे. दुराचाराची त्यावर वरताण सहन करावी लागणार आहे.त्याचा ताप आणि वेदना सोसावी लागणार आहे. निराश करणारी, मनोधैर्य खच्ची करणारी ही परिस्थिती आहे. ही स्थिती टाळून जाता येणार नाही.तिला सामोरे जातच जीवनाची लढाई पुढे नेणे अपरिहार्य आहे. दिवाळी म्हणूनही साजरी करणे अगत्याचे आहे. बाह्योपचारांनी लगेच स्थिती पालटणार नाही. ते मनापासून केलेले जातात.ते मनोरम आहेत. म्हणून त्यांचा आदर आणि स्वीकार करण्याचे अगत्यही राहते.

दिवाळीची एक ज्योत मी माझ्या मनात लावतो. तिचा प्रकाश बाहेर फाकणार नाही. कुणाला तो दिसणार नाही. सभोवती सगळे निराश करणारे आहे. त्याचे प्रतिबिंब माझ्या मनात पडून माझे अंतर काळवंडून जाण्याचा जाण्याचा धोका आहे. त्याच्या प्रतिक्रियेपोटी ते नैराश्‍याच्या काळोखात हरवून जाण्याची भीती आहे. त्याचा सामना करण्यासाठी तिथला प्रकाश प्रखर,तेजोमय राहायला हवा. विपरित स्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रतिकाराचे बळ आणि मांगल्यावरील विश्‍वास दृढ राहायला हवा.मनाचे सामर्थ्य वाढविण्यासाठी ही ज्योत आहे.तशी ज्योत आपल्या प्रत्येकाच्या मनात उजळावी, तेवत राहावी, हीच माझी शुभेच्छा !

No comments: