पणजी ः दोन दिवसापूर्वी अकस्मात पाऊस झाला. त्या आदल्या संध्याकाळी काही टपोरे थेंब आकाशातून सांडले होते. वातावरणात उकाडा खूपच होता. रात्रीची झोपही आळसावून लांब थांबल्याचा अनुभव दोन रात्री आला. तो ताजा होता. अंगावर पडलेल्या त्या काही थेंबांनी पावसाच्या अवेळच्या फेरफटक्याची आपल्या परीने खरे तर कल्पना दिली होती. लक्षात किती जणांच्या आले कुणास ठाऊक ? रात्र सरताच तेही विस्मृतीत गेले. पुन्हा लक्षात राहिला तो हैराण करणारा उकाडाच.
आमच्या गोव्याला अशा उकाड्याची नवता नाही. अगदी कडाक्यांच्या थंडीच्या दिवसातही नको जीव करणारा उकाडा अनेकदा अनुभवावा लागलेला आहे. आता तर जागतिक तापमानच बदलते आहे. वातावरण बदलते आहे. त्यामुळे असे उकाड्याचे दिवस आणि मोसम आता नेहमीच असतील कदाचित !
पाऊस पडला आणि छान वाटले. खरे तर मराठी गीतांचा एक कार्यक्रम सुरू होता. त्याचवेळी बाहेर पावसाची सर लागली. आत "आंतर्बाह्य काव्यानंद' (कार्यक्रमाचे शीर्षक) आणि बाहेर जलधारा ! छानच सुयोग जुळून आला. शरीर-मनाला आतून बाहेरून सुखावणारा. त्या तेवढ्याशा पावसाने बाहेरच्या उकाड्याचा निचरा झालाच, घामेजून जाणाऱ्या शरीरालाही शीतळतेचा स्पर्श झाला. साहजिक मनालाही तजेला आला.
पाऊस अवचित कसा काय आला ?
या प्रश्नाची वैज्ञानिक उत्तरे अनेक असतील. दूर सागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे इथपासून ग्लोबल वॉर्मिंगच्या परिणामामुळे ऋतुचक्र विस्कळित झाले आहे, इथपर्यंत अनेक कारणांचा त्यात समावेश असू शकेल.
जीवन हे गुंतागुंतीचे असते. आता नव्या जागतिक व्यवस्थेत आणि नव्या जीवनशैलीमुळे हे गुंते वाढले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे ताणतणाव, अडचणी, व्यत्यय, बरीवाईट स्पर्धा यामुळे माणसाची मानसिक कोंडी होण्याचे प्रसंग, वेळ त्याची वारंवारता वाढलेली आहे. त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडेनासा होण्याची स्थिती अधिक घनदाटली आहे. अशा वेळी कोंदटलेपण आपले सारे मन आणि आपला अवकाश व्यापून राहते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मन मोकळे करणे अपरिहार्य बनते.त्याची निकड इतकी अटीतटीची असते, की आपल्या हक्काचे माणूस, मित्र नाही भेटला तर कधी कधी अनोळखी माणसापुढेही मनातले भडाभड ओकायला होते.त्याचा वेळ प्रसंगही कुठलाही आणि कसलाही असू शकतो. असे अनुभव आपण स्वतः अनुभवले असतील किंवा कुणाला तरी अशा तऱ्हेने मोकळे होताना बघितले असेल.मनातल्या कोंदटलेपणाचा निचरा झाला की मग माणूस शांत होते.ती शांतता मिळविणे अगत्याचे होते, तेव्हा एरव्हीचे शिष्टाचाराचे,आपल्या रुबाब, प्रतिष्ठेचे काही संकेतही डावलले जाऊ शकतात.
माणसाच्या हस्तक्षेपामुळे असेल किंवा नैसर्गिक स्त्रोतांच्या अनिर्बंध वापरामुळे असेल, आवश्यक पथ्ये पाळण्याचे टाळून केलेली निसर्ग संपत्तीची लूटमार यामुळे असेल विश्वाचे मन आणि अस्तित्व कोंदटून गेले आहे. त्याचे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यालाही निचरा करणे अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे कधी अवेळच्या पावसाच्या रूपाने कधी वादळ- सुनामीच्या रूपाने तोही कोंदटलेपणातून मोकळा होऊ पाहतो आहे ! त्याने तो शांत होणार की अधिक अशांत बनून मानवजीवनात कायमची अशांती पेरणार आहे ?
प्रश्न मोठा चिंताजनक आहे.
No comments:
Post a Comment