Friday, November 28, 2008

बाबूजींचे निधन

रवींद्र भट यांचे निधन झाल्याचे थोडे उशिराने कळले. या वृत्तावर विश्‍वास ठेवणे काही क्षण फार जड गेले. वर्षभरापूर्वी भेटले होते. आजार, वाढते वय याचे शरीरावर परिणाम दिसत होते, मनाचा तजेला तसाच कायम होता. चालताना, हवेहून हलके असल्यासारखे तरंगत जात असल्यासारखे वाटायचे. त्या दिवशी त्यांना कुठे तरी जायचे होते. गप्पांना वेळ नव्हता. "त्या तिथे मी राहायला आलो,' असे सांगत निघून गेले. तेव्हाही ते तरंगत चालल्यासारखेच वाटले. ते गेल्याचे कळले,तेव्हा ती तरंगत चाललेली पाठमोरी मूर्ती डोळ्यांसमोरून तरळत गेली !

1994 मध्ये पणजीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले. त्यावेळी रवींद्र भट पहिल्यांदा भेटले. वयाने, अनुभवाने, कर्तृत्वाने खूपच मोठे, तरी आमच्याशी क्षणात अंतरंग मैत्री जुळवली.मनींची रहस्ये आमच्याकडे मोकळेपणाने उघडी केली, जसे युगानयगीचे मैत्र असावे. त्या क्षणी ते आमचेही "बाबूजी' झाले. ते नाते शेवटपर्यत त्यांनी जपले. ते असे अवचित निघून गेले; खरेच वाटत नाही !

वात्सल्यमूर्ती राम शेवाळकर पणजीच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले. गोव्यात आले, की हायफाय व्यवस्था सोडून आम्हा "पोरांत' रमणारे, मायाळू नारायण सुर्वे त्यानंतरच्या परभणी संमेलनाचे अध्यक्ष झाले. बाबूजीनाही अध्यक्ष झालेले पाहायची इच्छा होती. ती फलद्रूप झाली नाही. आता तर तो विषयच संपला.

बाबूजींनाही अध्यक्ष व्हावेसे खूप वाटत होते.अहमदनगरच्या संमेलनात आपण अध्यक्ष होऊ, असे ते म्हणाले होते. तो योग जुळून आला नाही. अध्यक्ष होण्याचा मार्ग तसा सरळ नसतो. वाटेत काटे पेरणारे अनेकजण असतात. अनेकदा ते अगदी जवळचेच निघतात. बाबूजींना असाच काही अनुभव आला. त्यातला काही भाग त्यांनी सांगितला होता. काही बाबतीत त्यांनी मौन पाळले. त्यांना आलेला अनुभव त्यांना नाउमेद करून गेला, मन घायाळ करून केला; इतका,की नंतर त्यांना त्या विषयात स्वारस्य राहिले नाही. पुढे जेव्हा कधी भेटले, तेव्हा एक दोनदा हा विषय त्यांच्याकडे काढला होता. त्यांनी काही बोलणेच टाळले.

बाबूजींनी संमेलनाचे अध्यक्ष होणे काही पुणेकरांना नको होते. पुण्यातील माझ्या एका मित्राला मी विचारले होते, " साहित्याच्या दृष्टीने अध्यक्ष होण्याची पुरेशी साधना त्यांच्यापाशी असताना त्यांना विरोध का? त्यांच्याविषयी मला अनेक ठिकाणी लोकांमध्ये खूप आदराची भावना दिसते आहे. त्यांना मानणारे लोक मी पाहिले आहेत.'

त्याने इतकेच सांगितले, " पुण्याबाहेर त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. मानही आहे. पुण्यात त्यांना विरोध आहे.'

त्या विरोधाचे कारण काही त्याने सांगितले नाही. त्या न सांगण्यात काही दडले असावे.

अर्थात संमेलनाचे अध्यक्ष होता न आल्याने बाबूजींना किंवा त्यांच्या साहित्य साधनेला काही उणेपणा आलेला नाही. अशा प्रकारच्या सन्मानाच्या निवडी या नेहमीच केवळ गुणवत्तेला कौल देणाऱ्या असतात, असे नाही.अशा प्रक्रियांत काही फटी असतात. त्यांच्या वापराच्या शक्‍यतांचा कधी कधी एखाद्याच्या आवडी-नावडीनुसार अवलंब होतो.त्यातूनही एखादा बाबूजी असा सन्मानाला वंचित राहून जातो.

संतांचे चरित्र, वाङ्‌मय हाच व्यासंगाचा विषय करून वाङ्‌मयनिर्मिती करणारे बाबूजी हे मराठीतले एकमेव साहित्यिक असावेत, असे मला वाटते. संतांनी आपणाला जीवनादर्श दिले.समाजाचे आध्यात्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनही समृद्ध केले. त्यांच्या काळात नव्हे,तर आजही. वर्तमानकाळातही त्यांच्या जीवन-साहित्याची संबद्धता ठायी ठायी जाणवते.नव्याने परिशीलन करून तो अमूल्य ठेवा बाबूंजीनी समाजापुढे प्रस्तुत केला.पांडुरंगाला घास घेण्यासाठी नाम्याने केलेल्या आर्जवाच्या आंतरिक तळमळीने बाबूजींनी हे नवसर्जन केले. इंद्रायणी काठीचे ते आर्त आता कायमचे अंतरले !

No comments: