Monday, November 24, 2008

केळेकरांना ज्ञानपीठ

रवींद्र केळेकर यांना प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.त्यांनी मराठी, हिंदी आणि कोकणीत लेखन केले असले,तरी ज्ञानपीठाचा मान त्यांना त्यांच्या कोकणी साहित्यासाठी मिळालेला आहे. संस्कृत साहित्यिक सत्यव्रत शास्त्री हेही या पुरस्काराचे संयुक्त मानकरी ठरले आहेत. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा हा पुरस्कार केळेकर यांच्या रूपाने गोव्याला प्रथमच लाभत आहे. सर्व गोमंतकीयांना आनंद देणारी ही घटना ठरायला हवी. गोव्याचा गौरव झाल्याची भावना सर्वत्रच उचंबळून यायला हवी. प्रत्यक्षात तसे घडलेले नाही. त्याचे कारण गोव्यातील भाषावाद आणि त्यात केळेकर यांची पक्षपाती भूमिका. भाषावादाने आणि केळेकर यांच्यासारख्या गांधीवादी विचारवंत म्हणवणाऱ्याने मराठीबाबत घेतलेली दुराग्रही,नकाराची भूमिका, यांमुळे गोमंतकीय मानस दुभंगले आहे.गोमंतकीयांची दोन गटात विभागणी झाली आहे.त्यामुळेच केळेकर यांच्या सन्मानाबद्दल सार्वत्रिक आत्मीयतेची भावना दृग्गोचर होत नाही.

अगदी अलीकडे केळेकर यांना भारत सरकारचा पद्‌मभूषण सन्मान जाहीर झाला.तेव्हा माझा एक मित्र मला म्हणाला,"जे लोक कोकणीला भाषा म्हणून मान्यता मिळवू शकतात, ते काहीही करू शकतात!

'नकाराची आणि विरोधाची भूमिका घेऊन कोकणीवाद्यांनी समाजात जो दुरावा आणि कडवटपणा निर्माण केला आहे, त्याची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया होय.जोवर या भूमिकेत बदल होत नाही,तोवर हा दुरावा आणि कडवटपणाही दूर होणार नाही, याचेही सूचन त्या प्रतिक्रियेत आहे.केळेकर यांच्या सन्मानाने कोकणीवाद्यांच्या गोटात आनंदाचे उधाण आले आहे. पण हा गोव्याचाच सन्मान आहे, या भावनेने सारे मतभेद विसरून आनंदाचे सार्वत्रिक भरते आल्याचे दिसत नाही, हे याच दुभंग स्थितीचे निदर्शक आहे.

केळेकर यांनी भरपूर साहित्य निर्मिती केली. आचार्य काकासाहेब कालेलकर यांचे सान्निध्य आणि वर्ध्याच्या आश्रमातील संस्कार यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडले, असे सांगितले जाते. महात्मा गांधींचे विचार त्यांना प्राणभूत, असेही मानले जाते. गांधीविचारांचे दर्शन, आजच्या युगातही असलेली त्यांची यथार्थता सांगणारे लिखाण त्यांनी केले. गांधीविचारावर भाष्य करणारी अधिकारी व्यक्ती असा लौकिक त्यांनी प्राप्त केला. कोकणीला भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी या भाषेतील साहित्य समृद्ध करण्याचे ध्येय त्यांनी उराशी जपले. आपल्या कोकणीतील स्वतंत्र लेखनाने, महाभारताच्या कोकणीत केलेल्या अनुसर्जनाने, सर्जकाच्या प्रेरणा -ऊर्मीविषयीच्या चिंतनशील लेखनाने त्यांनी कोकणीचे साहित्य समृद्ध करण्यात आपला मोठा सहभाग दिला.कोकणीच्या संदर्भात त्याचे भाषाविषयक कार्य दुर्लक्षिण्याजोगे निश्‍चित नाही.या सर्वांचाच विचार करून त्यांना ज्ञानपीठ दिले गेले असेल. पुरस्कारासाठी निवड करणाऱ्यांनी तेवढ्यापुरताच विचार केलेला असावा. परंतु गोव्यातील भाषावादाचे संदर्भ वगळून त्यांच्या साहित्याची चिकित्सा करणे गोमंतकीयांना शक्‍य नाही. विशेषतः ते गांधीविचारांचा पुरस्कार करणारे आणि त्याविषयी प्रचंड आत्मगौरव बाळगणारे असल्याने त्यांच्या मानाचे मूल्यांकन निखळ साहित्याच्या अनुषंगाने करता येणार नाही. कारण त्यांच्या लेखनातही त्यांनी गांधीविचारांशी प्रतारणा केलेली आहे.

गांधींनी सत्य, अहिंसा, सहिष्णुतेचा विचार सांगितला आणि आचरलाही. मानवजातीवर प्रेम करायला सांगितले, तिरस्कार नव्हे. केळेकर यांनी मराठीचा द्वेष केला. गोव्यात मराठी हवी म्हणणांना चाबकाने फोडले पाहिजे ,अशा शब्दांत मराठीविषयी, इथल्या मराठी भाषकांविषयी गरळ ओकली. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाशी ही प्रतारणा नव्हे काय? ज्या भाषेने इथली संस्कृती जपली आणि जिच्या स्तन्यावरच केळेकर आणि त्यांच्यासारखे कोकणीतले अनेक म्होरके आणि पुढारी मोठे झाले, नामवंत बनले, त्यांनी मराठीविषयी गोमंतकीयांच्या मनात तिरस्कार पेरण्याचे, रुजविण्याचे काम केले. गांधीविचारांची झूल पांघरून तिरस्काराने अनेकांचे हृदये कलुषित केली. इतकी, की पुढची अनेक वर्षेही गोमंतकातील एका समुदायाच्या मनांतून तिरस्काराची बिजे निघता निघणार नाहीत. मांसाला चिकटलेल्या निखाऱ्यासारखी ही पेरणी झालेली आहे.

ज्ञानपीठ मिळाल्याने आता तरी तिला भाषा मानावी, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातल्या काही विद्वानांनीही असेच मत प्रकट केले आहे. वर्षभरापूर्वी गोवा कला अकादमीच्या बैठकीत चर्चेच्या ओघात कोकणीचा विषय निघाला होता. रोमन कोकणीचे पुरस्कर्ते, त्रियात्रिस्ट आणि माजी सभापती तोमाझिन कार्दोज तिथे उपस्थित होते. कोकणीला साहित्य अकादमीची मान्यता फसवणुकीने मिळविण्यात आल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले होते.कोकणीचे एक महान नेते उदय भेंब्रे यांनी त्यांना उत्तर देण्याचा निःशक्त प्रयत्न केला.तेव्हा, कोकणीची साहित्य परंपरा सांगताना रोमन कोकणी लेखक आणि त्यांच्या लेखनाचे संदर्भ दिल्याचे ठासून सांगत तोमाझिन यांनी त्यांना निरुत्तर केले होते.1985 ते 1987 या काळात झालेल्या भाषिक आंदोलनात, ज्या ख्रिश्‍चन समाजाच्या पाठबळावर कोकणीवादी जिंकले, त्यांचीही अशीच दिशाभूल करण्यात आली होती. तीही फसवणूक त्या समुदायाला आता कळून चुकली आहे. कोकणी चळवळ अशी मोठ्या असत्यावर आणि फसवणुकीवर आधारलेली आहे.कोकणी चळवळीतले अध्वर्यू असलेल्या केळेकर या असत्याच्या पापात वाटेकरी आहेत. हे सारे असत्य गांधींनी सांगितलेल्या सत्याच्या विचारात बसत नाही. केळेकर यांना ते चालले, तेव्हा त्याही तत्त्वाचा त्यांनी पाडावच केला.

काही महिन्यांपूर्वी उदय भेंब्रे यांनीच कोकणीचे प्रमाणीकरण होण्यासाठी आणखी पन्नास वर्षे जावी लागतील, असे विधान केले होते. त्यासाठी आणखी तीन पिढ्या बरबाद झाल्या, तरी त्याला इलाज नाही, असे उत्तरही त्यांनी दिले होते. जी भाषा प्रमाणरूपात येण्यासाठी पाच दशकांचा काळ जावा लागणार आहे, ती एका पुरस्काराने एका रात्रीत जागतिक दर्जाची भाषा कशी बनू शकते? गांधीविचारांत याचे काही उत्तर असल्यास, त्याचा शोध घ्यावा लागेल; मात्र केळेकरी विचारधारेत त्याचे उत्तर सापडते.

पंचवीसेक वर्षांपूर्वी केळेकर यांनी"नवप्रभा' दैनिकातील आपल्या स्तंभात असे लिहिले होते,"मराठी गोव्याची भाषा आहे,तर बा. भ. बोरकर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार का मिळाला नाही?'

एका भाषातज्ज्ञांने मांडलेला हा तर्क आहे.एखादी भाषा ही भाषा आहे की नाही हे भाषिक निकषवार नव्हे, तर पुरस्कारांच्या निकषावर ठरते. आणि पुरस्कार कसे मिळतात, याची अनेक उत्तरे अनेकांना ठाऊक असतात ! केळेकर यांना लागोपाठ, लगबगीने दिल्या गेलेल्या पुरस्कारांमागे, सन्मानांमागे असे काही रहस्य नसावे, अशी आमची,गांधीविचारांना स्मरून, समजूत आहे.
-------पणजी----

No comments: