Thursday, August 21, 2008

सवय वाचण्याची

ओरिएंट लॉंगमन ही प्रकाशन संस्था सर्वांच्या परिचयाची आहे. वेगवेगळ्या विषयावरील शेकडो पुस्तकांच्या माध्यमातून ती असंख्य लोकांपर्यंत पोचलेली आहे. प्रकाशन व्यवसायात साठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या संस्थेने पणजीत पुस्तक प्रदर्शन लावले आहे. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप देवबागकर यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले. छोटासा, साधासाच कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या साधेपणामुळे विद्वान व्यक्ती आपल्याला जे सांगायचे असते त्यात हात आखडता न घेता सांगून टाकतात,याचा प्रत्यय यावेळीही आला.देवबागकर व्यासंगी व्यक्ती. हातचे राखून न ठेवता ज्ञानदानात संतोष पावणारे. चांगले वक्ते. टाळ्या घेणारे नव्हेत, विचार देणारे,त्यांना दाद घेणारे. अस्स्खलित इंग्रजीत उत्तम बोलले. याचा उल्लेख मुद्दाम करतो. त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही, इंग्रजीत पारंगत झाल्याशिवाय प्रगती साधणे अशक्‍य आहे, असे सिद्धांत उराशी कवटाळणाऱ्यांनी आणि इंग्रजी उत्तम अवगत होण्यासाठी पहिलीपासून ती भाषा शिकविण्याचा अट्टहास धरणाऱ्यांनी देवबागकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांसारख्या मातब्बरांचे इंग्रजी वक्तृत्व ऐकायला हवे. त्या भाषेवरचे त्यांचे प्रावीण्य अनुभवायला हवे. म्हणजे इंग्रजीमध्ये प्रावीण्य मिळविण्याचा मार्ग कुठून जातो हे त्यांच्या लक्षात येईल.

देवबागकर यांनी पुस्तक वाचनाचे महत्त्व आणि त्याची आवश्‍यकता अधोरेखित केली.आताचे शिकणे आणि विद्यार्जन करणे यातला फरक त्यांनी समजावून सांगितला.

नवी पिढी, आताची मुले वाचत नाही ही नेहमीचीच तक्रार झाली आहे. त्यासाठी टीव्ही,इंटरनेट, मोबाईल यांसारख्या माध्यमांना जबाबदार धरले जाते. एकूणच नव्या तंत्रज्ञानावर त्याचे खापर फोडले जाते. आपल्यामध्ये ही एक सहज वृत्ती निर्माण झाली आहे. दुसऱ्यावर खापर फोडले की आपली जबाबदारी संपली,आपण दोषमुक्त झालो, असा आपला थाट आणि समज झालेला आहे. समस्या सुटत नाही, त्याचे हे एक कारण आहे. सबबीची एक खुंटी आपण सतत शोधत असतो. समस्येचे निराकरण या शोधातून करू पाहतो.तो समस्येवरचा उतारा नव्हे, हे आपण मानत नाही आणि समस्या तशीच राहते.

नवे तंत्रज्ञान, नवी जीवनपद्धती या आता वस्तीलाच आल्या आहेत.त्याचा विस्तार, उंची,खोली वाढतच जाणार आहे. त्याची चाल, गती थांबवता येणार नाही.उलट तसा प्रयत्न करणारे बाजूला पडतील. आपल्याला जी मूल्ये नव्या पिढीमध्ये दिसत नाहीत,जी रुजलेली हवी आहेत, त्याबाबत केवळ नकारघंटा वाजवीत राहिल्याने,ती रुजणार नाहीत.तंत्रज्ञान आणि आधुनिक जीवनशैलीवर त्याचा पसरणारा पगडा नाकारूनही ती रुजणार नाहीत.ती रुजविण्यासाठी, वाचनाचे मूल्य मुलांमध्ये रुजविण्यासाठी देवबागकर यांनी छान मार्ग आपल्या भाषणात सांगितला...

तंत्रज्ञानाने लपेटलेल्या जीवनशैलीत गुरफटलेल्या समाजात, मुलांच्या विश्‍वात आपण सामावून घेतले पाहिजे. जे तंत्रज्ञान या सर्वांपासून मुलांना दूर नेते आहे, असे वाटते,त्याच तंत्रज्ञानाच्या माध्यमांतून त्यांच्यापुढे आपले, या मूल्याचे प्रकटीकरण व्हायला हवे.जिथे ही मुले पाहतात, तिथे वाचण्याचे आकर्षण अवतरू लागले,तर तीही त्याकडे वळू लागतील. देबवागकर यांचे हे म्हणणे खरे आहे, सोपेही आहे.

प्रश्‍न आहे, या लयीत लीन होण्याची आपली तयारी आहे का?

Wednesday, August 20, 2008

ओम मृत्तिकायै नमः

कुठल्याही कार्याचा आरंभ करताना श्री गणेशाला वंदन करण्याची आमची संस्कृती आणि प्रथा आहे. श्री गणेश अर्थात गणपती ही बुद्दिदेवता असल्याचे आपण मानतो. सर्व देवतांनी मिळून त्यांना अग्रपूजेचा मान बहाल केल्याची आख्यायिका प्रचलित आहे.विघ्नहर्ता असल्याने कार्याचे शुभ फल देण्यासाठी श्री गणेशाची प्रार्थना करावी असा परिपाठ रूढ झालेला आहे. त्याला माझा विरोध नाही. मतभेद नाही,तरी मी माझ्या या ब्लॉगचा आरंभ मातीला नमन करून करीत आहे.

माझे नाते आणि तिच्याबद्दलची ओढ मला कळू लागण्याच्या आधीपासून आहे. "माती' या शब्दात "माता' हा शब्दही कोरून काढता येतो.त्यामुळेही असेल. मातीही माणूस जन्माला येण्याच्या आधीपासून आहे.माणूस मेल्यावरही ती राहते. आयुष्यभर ज्या शरीराचे हवे नको ते सर्व लाड, चोचले पुरवितो, ते शरीर जाते कुठे? चिमूटभर राख होऊन मातीतच मिसळते.

कबीर सांगूनच गेलाय,
माटी कहे कुम्हारसे, तू क्‍या रोंदे मोंहे
एक दिन ऐसा आयेगा, मै रों दू तोंहे

आयुष्य आणि जीवन दोन्ही व्यापून, दशांगुळेच काय, त्याहीपलीकडे उरते ती मातीच! ती सर्वव्यापी आहे आणि सर्वजायाही आहे.तिची महती गाणारे माझे शब्दही कदाचित एक दिवस या मातीतच मिसळून जायचे. माती मला नेहमी भौतिक नजरेच्या आणि ज्ञानचक्षुच्या पलीकडे गेलेली, अनंतापर्यत पसरलेली वाटते. तिचा विस्तार, पसारा दिङमूढ करतो.तिच्यासमोर मस्तकच नव्हे सारे अस्तित्व नत होते, झुकते. तिला नमनाचे वंदन नको करायला?
आणि, गणपतीसुद्धा पार्वतीच्या अंगावरील मळातून म्हणजे मातीतूनच नाही का जन्मला !