Sunday, February 27, 2011

आनंदाचा स्त्रोत

पुस्तके वाचण्यासंदर्भात साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी काल रात्री एका कार्यक्रमात मस्त टिप्स दिल्या.या पद्धतीने कुणी पुस्तक वाचत असतील किंवा नाही.पण त्या टिप्स नक्कीच उपयुक्त आहेत. वाचनाचा आनंद वाढविणाऱ्या आणि त्यातले माधुर्य अधिक काळ टिकविणाऱ्या आहेत.

"पुस्तक मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचावे.पुस्तकाच्या प्रत्येक अंगावर कुणीतरी प्रचंड मेहनत घेतलेली असते.त्याला त्यातून काही तरी सांगायचे असते. मुखपृष्ठावर असलेल्या चित्रात त्या पुस्तकात सांगितलेले साररूपाने किंवा प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेले असते. मलपृष्ठावरील ब्लर्ब ही त्या पुस्तकात डोकावण्याची खिडकी असते.पुस्तकाचा विषय,आशय यांचा अंदाज त्या मजकुरावरून येतो. विशेषतः पुस्तक खरेदी करण्याचा निर्णय करताना हा ब्लर्ब मार्गदर्शक ठरतो. पुस्तकातील अर्पणपत्रिकाही महत्त्वाची असते. भालचंद्र नेमाडे यांनी "कोसला'च्या अर्पणपत्रिकेत "शंभरातील नव्व्याण्णवांना' ती कादंबरी अर्पण केली आहे. अवघेच शब्द, परंतु ते केवढा मोठा आशय सांगून जातात. पुस्तकाची प्रस्तावनाही वाचावी.त्यात काही तारतम्य मात्र पाळायला हवे. वैचारिक पुस्तकाची प्रस्तावना पुस्तक वाचण्याआधी वाचावी, मात्र कथाकादंबऱ्यांची प्रस्तावना आधी वाचू नये . कारण ती आधी वाचली तर पुस्तकासंबंधी काही पूर्वग्रह घेऊन आपण पुढील मजकूर वाचण्याची शक्‍यता असते.आपण जे वाचतो, त्याविषयी एक टिपण मुद्दाम लिहून ठेवावे.आपल्याला त्या पुस्तकात नेमके काय आढळले, किंवा एखादे पुस्तक वाचल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया झाली हे लिहून ठेवावे. एक पुस्तक जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला वेगवेगळे अर्थ सांगत असते.एक पुस्तक अनेकदा वाचल्यानंतर प्रत्येक वेळी काही तरी नव्या अर्थाचा उलगडा होतो. अनेक साहित्यकृतीमध्ये अशा अनेक मिती,अर्थ दडलेले असतात.आपणच आधीचे टिपण काढून वाचल्यावर आपल्यालाही वेगवेगळ्या क्षणी कसा वेगवेगळा अर्थ प्रतीत झाला याची प्रचिती येते. ती आनंददायक असते.वाचल्यानंतर आपला अभिप्राय लेखकाला जरूर कळवा. लेखकही आपल्या या लेखनासंबंधी वाचकाच्या भावना समजून घ्यायला आतुर असतो. अशा संवादातूनआनंदाची पखरण होत असते.'

संजय जोशी बोलले,त्यातील एखाद्या गोष्टीचा एकदा तरी प्रयोग करून पाहावाच.कुणी तसा केलेलाही असेल. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टीत आनंदाचा प्रचंड खजिना दडला आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सातत्याने या गोष्टी स्वतः केलेल्या नाहीत.मात्र, या सर्व गोष्टी कधी ना कधी केलेल्या आहेत. कुणाचे पुस्तक वा लेख, कविता आवडली तर त्याला तसे सांगितले आहे.त्याचा त्यांना होणार आनंद पाहिलेला आहे.माझ्या लिखाणाविषयी कुणी कधी अभिप्राय देते,तेव्हाचा आनंद मीही अनुभवला आहे.काही पुस्तकेंविषयी टिपणे काढून ठेवली आहेत.ती वाचताना कधी ते पुस्तक पुन्हा अंतःचक्षूपुढून तरळून गेले आहे.कधी ते पुन्हा वाचावेसे वाटून त्यात पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला आहे.संजय जोशी म्हणाले ते खरेच आहे, आनंद आपल्यापाशी असतो. आपण तो इतरत्र धुंडाळत असतो आणि तो गवसत नाही म्हणून दुःखीकष्टी होत असतो. पुस्तकासारख्या रोज हाताशी येणाऱ्या वस्तूतही अनेक अंगांनी उपभोगता येणाऱ्या आनंदाचा प्रचंड स्त्रोत दडलेला आहे.कुणीही त्याला भिडून त्याची अनुभूती घ्यायला हरकत नाही.

No comments: