Monday, February 14, 2011

गुलाब नही, कॉंटेही सही !

हॅपी व्हॅलेंटाइन डे !

शुभेच्छा देण्याचा आणि थोडाफार सणासारखा साजरा करण्याचा आजचा आणखी एक दिवस.

या दिवसाची धूम अनेक दिवस आधीपासून सुरू झालेली असते.यंदा कुणा अपरिचिताने मला एक मेल पाठविला.त्यात व्हॅलेंटाइन डेच्या आधीची "सप्तपदी' सांगितलेली आहे. व्हॅलेंटाइन डेचे वेध सात फेब्रुवारीला सुरू होतात.रोझ डे, प्रपोझ डे,चॉकलेट डे,टेडी डे,प्रॉमिस डे, किस डे, हग डे अशा सात दिवसांच्या प्रवासानंतर आठव्या दिवशी उगवतो तो व्हॅलेंटाइन डे. आम्ही अशा वाटेने कधी गेलेलो नसल्याने या साऱ्या उपचारांची माहिती कधी झाली नाही. खूप आधी कधी तरी कुणी एकदा सांगितले होते, बड्या हॉटेलात म्हणे मुख्य जेवण यायच्या आधी चिटूकमिटूक खाण्यापिण्याच्या काही पायऱ्या असतात.त्याला कसलासा "कोर्स' म्हणतात. ब्रिटिश एटिकेटस्‌मध्ये त्याचे फार महत्त्व असते.त्या पायऱ्यांवरही कधी जाणे झालेले नसल्याने या अशा सगळ्या वातावरणापासून आम्ही तसे अलिप्त आणि म्हणून अनभिज्ञही राहिलो. या मेलने व्हॅलेंटाइन डेचे नवे "दर्शन' घडविल्याने पहिल्यांदा त्याची माहिती झाली. (त्याच्या वापराच्या काही टिप्स सोबत दिल्या असत्या, तर ..... )

काही वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेसारख्या परदेशी "फॅड'ना फार विरोध झाला होता.आताही तो तसा संपलेला नाही.कदाचित त्याची धार व तीव्रता कमी झालेली असावी.व्हॅलेंटाइन डेवरून गदारोळ चालू असताना आणि आताही या दिवसाच्या निमित्ताने मला हटकून आठवते ते आपल्या पुराणकाळातील गांधर्व विवाह, पाणिग्रहण वगैरेसंबंधीच्या कथा.संकटात सापडलेल्या स्त्रीला वाचविण्यासाठी तिचा हात धरला तरी तो पाणिग्रहणाचा प्रकार झाल्याच्या किंवा तेवढ्याने झालेल्या परपुरुषाच्या स्पर्शाने तो पुरुष स्त्रीने मनाने वरल्याच्या अथवा वरावा लागल्याच्या कथा पुराणात सापडतात.कारण त्या स्पर्शाने तो परपुरुष स्वपुरुष ठरे आणि त्याशिवाय अन्य पुरुषाचा स्पर्श सोडाच, विचारही परपुरुषाचा विचार ठरे, अशी काही नीतिमत्ता,संस्कृती-परंपरा त्याकाळी समाजात रूढ होती.त्यामुळे व्हॅलेंटाइन हा विदेशी प्रकार आहे, असे कुणी म्हटले,तरी त्याचे मूळ भारतात असावे असे मला सारखे वाटते. केवळ मूळच नव्हे, आपल्याकडे व्हॅलेंटाइनचा प्रकार फारच प्रगत होता, असे म्हणावे लागते. गांधर्व विवाहाच्या, पाणिग्रहणाच्या कथा हे त्याचे पुरावे आहेत.त्यात पुन्हा असे एक दिवस रोझसाठी, एक दिवस टेडीसाठी, एक दिवस चुंबनासाठी, एक दिवस आलिंगनासाठी असा काही राखीव कार्यक्रम आखून ताटकळत राहायचे झंझट नाही. धरला हात, की प्रकार साजराच ! नाही तरी आपली संस्कृती प्राचीन काळीही फारच प्रगत होती.विज्ञान,खगोलशास्त्रासारख्या अनेक क्षेत्रात पुढारलेली होती.ती एवढ्या बाबतीत मागे कशी पडली असती !

अनेकांना मात्र हे व्हॅलेंटाइनचे प्रकरण जमत नाही.आम्हीही त्यातलेच.ते जमणारही नाही.मेड फॉर इचअदरच्या धर्तीवर सांगायचे तर वी आर नॉट मेड फॉर दॅट ! त्याचा मोठा पुरावा म्हणजे आजचा प्रसंग.

सकाळी ऑफिसच्या पार्किंगमध्ये गाडी लावून खाली उतरलो.इमारतीच्या भिंतीला लागून काही फुलझाडे, फुलझाडांच्या कुंड्या आहेत. दरवाजा बंद करून मागे वळताना खांद्यावर शर्टात एका फुलझाडाची फांदी अडकली.माझ्या वळण्याच्या वेगामुळे तिचे काटे शर्टात रुतून तो थोडासा फाटला.फांदी अलगद सोडवून घेतली. पाहिले तर गुलाबाची फांदी होती. या ठिकाणी अनेकदा गाडी पार्क करतो.कधीही ही फांदी अंगचटीला आली नव्हती.नेमकी आजच ती भिडली. गंमत म्हणजे त्या फांदीवर एकही गुलाब नव्हता.कुणी खुडून नेला नव्हता, तर मुळातच उमललेला नव्हता.काहीशी वठलेली ती फांदी होती.

लोक व्हॅलेंटाइन डेला गुलाब देतात.मला भेटले गुलाबाचे काटे,तेही दस्तुरखुद्द झाडाकडून !

No comments: