Thursday, December 11, 2008

कारवाई की संरक्षण ?

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानी गुंतल्याचे भारत सांगत असताना पाकिस्तान आणि त्या देशातील प्रसारमाध्यमे त्याचा नेहमीप्रमाणे इन्कार करीत होती. पाक प्रसारमाध्यमांनी तर भारताच्या दाव्याची खिल्ली चालविली होती. विशेषतः इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांतून त्याविषयी जहाल प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. भारतात फटाका फुटला तरी पाककडे बोट दाखविले जाते, अशी टिप्पणीही करण्यात आली होती. भारताने ठोस पुरावे दाखविल्यानंतर हे नाटक थांबले.

पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान युसुफ रजा गिलानी हे हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाकारत होते. नंतर झरदारी यांनी ते लोक "बाहेरचे' असल्याचे सांगायला सुरवात केली. ते बाहेरचे असले तरी पाकिस्तानच्या भूमीतून दहशतवादी कारवाया केल्या जात असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल, असे अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडोलिसा राईस यांनी खडसावून सांगताच पाकिस्तानने कारवाईची तयारी दाखविली. दहशतवादी पाकिस्तानी असल्याचेही त्यांना मान्य करावे लागले.पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये कारवाई करून लष्करे तोयबाचा कमांडर झाकीउर रहमान लाखवी आणि जैशे महम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांना अटक केली आहे. मात्र,त्यांना भारताच्या ताब्यात देण्यास नकार दिलेला आहे. त्याहीपुढे जाऊन त्यांची भारताकडून चौकशी केली जाण्यासही नकार दिला आहे आणि ठोस पुरावे असल्याशिवाय स्वतःही त्यांच्याबाबत तपास करणार नसल्याची पाकिस्तानची भूमिका आहे.

भारताने अमेरिकेच्या साह्याने पाकिस्तानला त्याच्या भूमीतून दहशतवाद फैलावणाऱ्यांविरुद्ध काही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. अमेरिकेनेही पाकिस्तानला खडसावून दहशतवादविरोधी लढाईत एक पाऊल पुढे टाकायला लावले आहे. आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी, 9/11 नंतर अमेरिकेने केली, तशी कारवाई करण्याचा भारताला पूर्ण अधिकार असल्याचे अमेरिकेने निःसंदिग्ध शब्दात सांगितले आहे. मुंबईतील हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या ताठर भूमिकेला,जागतिक स्तरावर निर्माण केलेल्या दबावाला आलेले हे यश म्हणायला हवे. अर्थात ते पुरेसे नाही. भारताच्या पवित्र्याचा दाब थोडाही सैलावला, तरी पाकिस्तानचे सत्ताधारी पुन्हा सैलावतील. थोड्या कालाने पुन्हा विद्‌ध्वंसाचे तांडव रचतील. त्याचा कशाही स्थितीत भरवसा बाळगता येणार नाही. भारताने आपला दबाव आणि अपेक्षित कारवाईचा रेटा अधिकाधिक तीव्र करणे आवश्‍यक आहे. अमेरिकेत 9/11 नंतर पुन्हा दहशतवादी हल्ला झालेला नाही, याचे इंगित समजून घेतले पाहिजे.दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी आणि मुंबईतल्या हल्ल्यासारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रतिबंध आणि सुरक्षेच्या कवचाला अभेद्यता आणण्याचे उद्दिष्ट साध्य करायला हवे. ते साध्य होण्याचे स्पष्ट संकेत दिसेपर्यंत कारवाईसाठीचा रेटा वाढवीत नेणे गरजेचे आहे.

पाकिस्तानने कारवाई केलेली असली,तरी त्याबाबतच्या त्याच्या प्रामाणिकपणाविषी आणि हेतूविषयीही शंका घेण्यास वाव आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी कारवाईनंतर केलेल्या वक्तव्यात या शंकेसाठी भरपूर जागा दिसते. लाखवी आणि अझहर या दहशतवाद्यांविरुद्ध पाकने केलेली कारवाई ही त्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण देण्याची कृती आहे. पाकने त्यांना ताब्यात घेऊन भारताच्या थेट कारवाईपासून वाचविले आहे. भारताला त्यांची चौकशी करण्याचेही दरवाजे सध्या तरी बंद केलेले आहेत. भारताला आता राजनैतिक दबाव वाढवून आणि जागतिक स्तरावर त्यांच्याविरुद्ध कारवाईचे मानस तयार करूनच त्यांना हात घालता येईल. मात्र, पाकिस्तानच्या छत्रछायेखाली राहून आपली दहशतवादी कारस्थाने पुढे नेण्याच्या शक्‍यता या दहशतवाद्यांना उपलब्ध असणार. पाकिस्तान दहशतवादविरोधी कारवाई करीत असल्याचे नाटक बेमालूमपणे वठवीत राहणार. त्या पडद्याआड दडून दहशतवादी नरसंहाराचे खेळ मांडत राहणार,ही शक्‍यता पुसणे अवघड आहे. त्यामुळेच पाकिस्तानची कारवाई हे दहशतवाद्यांना मिळालेले छत्र,संरक्षण असल्याची शंका वाटते.

No comments: