Thursday, December 18, 2008

अंतुले यांचे विधान

मुंबईतील दहशतवाद्यांचा हल्ला हा केवळ त्या महानगरावरचा नव्हे, तर देशावरचा हल्ला होता. त्याची पाळेमुळे पाकिस्तानात असल्याचे अमेरिका, इंग्लंडसारखे देश तत्परतेने सांगत असताना, हल्ल्याचा विषय धसास लावून त्यात गुंतलेल्या दहशतवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्यास पाकिस्तानला भाग पाडण्याची आवश्‍यकता असताना आणि त्यासाठी भारतीयांनी सुरात सूर मिसळून, खांद्याला खांदा लावून एकजुटीने उभे राहणे अपरिहार्य असताना, अ. र. अंतुले यांच्यासारखे राजकारणी वेगळेच सूर छेडून मोठी हानी करीत आहेत. पाकिस्तानसारख्या लबाड आणि चलाख शत्रूच्या हाती आयते कोलीत देत आहेत.

महाराष्ट्राचे दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक कामटे आणि पोलिस निरीक्षक विजय साळसकर हे तिघेजण कामा इस्पितळ भागात दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. "जे डोळ्यांना दिसते, त्याहून अधिक काही घडले आहे,' असे सांगून अंतुले यांनी तीनही अधिकाऱ्यांच्या मृत्यूबाबत संशयाचे वातावरण आणि वादळ उठविले आहे. "तीनही अधिकारी एकाच गाडीतून का गेले , ताज, ओबेराय किंवा नरिमन हाऊसकडे न जाता कामा इस्पितळाकडे का गेले,' असे प्रश्‍न उपस्थित करून,मालेगावच्या बॉबस्फोटांचा थेट उल्लेख न करता, त्यांनी करकरे यांचा मृत्यू त्या तपासाशी जोडण्याचा प्रयत्न केला. "काही प्रकरणात "बिगर-मुस्लिम' लोक गुंतल्याचे तपासात उघड झाले होते. काहींना त्यांचा मृत्यू झालेला हवा होता. प्रामाणिक अधिकाऱ्याच्या विरोधात "बंद"चे आवाहनही करण्यात आले होते.' अशी विधाने करून त्यांनी करकरे आणि अन्य दोघा अधिकाऱ्यांच्या मृत्यूमागे काही राजकीय पक्षाचा संबंध दाखविण्याचा प्रयत्न केलाच. भाजप आणि शिवसेनेकडून त्याची तीव्र प्रतिक्रिया आली, ते स्वाभाविक होय. आपल्या विधानांनी वाद निर्माण होतो, असे लक्षात आल्यावर आपण केवळ "त्या तिघांना एकाच गाडीतून कामा इस्पितळाकडे जायला कुणी सांगितले,' एवढाच प्रश्‍न केल्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण, त्याआधी वादळ उठण्यासाठी पुरेशी पार्श्‍वभूमी तयार केलीच. कॉंग्रेसने लगोलग आपला त्या विधानाशी काही संबंध नसल्याचे सांगून हात झटकले. देशातील आताच्या एकूण नाजूक वातावरणात अशा तऱ्हेची विधाने करणे मुळात गैर आहे. त्यामुळे व्हायची ती हानी झालीच आहे. ती पुसून कशी काढणार ?

स्फोटाच्या तपासाच्या काळात त्यातील संशयितापर्यंत समझौता एक्‍सप्रेसमधील स्फोटाचे धागे पोचत असल्याची माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यावर केंद्र सरकारला लगोलग खुलासा करून "समझौता'मधील स्फोटांमागे पाकिस्तानी घटकांचा हात असल्याचे आधीच निष्पन्न झाले असल्याचे पुन्हा सांगावे लागले. मुंबईतील हल्ल्यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमे मात्र त्या बातमीचा उल्लेख वारंवार करून भारत विनाकारण आपल्या देशावर संशय घेत असल्याचा,आरोप करीत असल्याची टिप्पणी करीत होती. अंतुले यांच्या विधानांनी पाकिस्तानी प्रसारमाध्यमे आणि अन्य घटकांना आपल्याविरुद्ध प्रचारासाठी खाद्य पुरविले आहे. भारताच्या दाव्यांना तडे देण्यासाठी पाकिस्तान या सामग्रीचा उपयोग केल्यावाचून राहणार नाही. दहशतवादविरोधी लढ्यामध्ये बाह्य शत्रूंशी लढताना आपल्याकडच्या बहकणाऱ्या तोंडांनाही लगाम घालण्याची गरज आहे.

No comments: