Wednesday, December 24, 2008

अंतुले यांचीच चौकशी हवी

महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या मृत्यूसंदर्भात बेताल विधान करून निष्कारण वाद निर्माण करणाऱ्या अ. र. अंतुले यांना कॉंग्रेस पक्षाने एक प्रकारे अभय दिले आहे. अंतुले यांचे विधान खेदजनक असल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यांची चूक सौम्यपणाने त्यांच्या पदरात टाकली. त्याचवेळी मालेगाव बॉंम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित करण्याची भाजपची कृतीही योग्य नसल्याचे सांगून अंतुले यांच्याबाबतीतल्या त्यांच्या आक्रमक भूमिकेतील धार काढून घेतली. दोन्ही बाबी केवळ खेदजनक म्हणून मागे सोडून देण्याइतक्‍या साध्या नाहीत. त्यांची कठोरपणे निर्भर्त्सना व्हायला हवी होती. दोन्ही बाबी एका पारड्यात ठेवण्याइतपत गंभीर होत्या,तर त्याची दखल तशाच गंभीरपणाने घेऊन सर्व घटकांना सज्जड दम देणे आवश्‍यक होते.परंतु, अंतुले यांच्या बचावासाठी कॉंग्रेसने दोन गोष्टींची सांगड घातली. चिदंबरम यांचे संसदेतील याविषयीचे निवेदन हे याच राजकीय चतुराईचा भाग होता. अंतुले यांनीही आपली खुर्ची सांभाळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निवेदनाने समाधान झाल्याची भूमिका मोठ्या कौशल्याने वठविली.

करकरे यांचा मृत्यू ज्या परिस्थितीत झाला, त्याविषयीचे सविस्तर निवेदन चिदंबरम यांनी केले. तो सारा घटनाक्रम आणि माहिती या निवेदनाआधीच जगजाहीर झाली होती. अंतुले यांनी शंका उपस्थित केली, तेव्हाही तो तपशील प्रसारमाध्यमांतून उपलब्ध होता. त्यासंबंधीचे पुरावेही उघड झाले होते.तरीही अंतुले यांनी दहशतवादी आणि पाकिस्तानला हत्यार करता येईल, अशी विधाने केली. त्याविषयी त्यांना अजिबात खेद नव्हता. त्यांच्या विधानावर इतका गदारोळ माजूनही अतिशय उद्दामपणे ते आपल्या बोलण्याचे समर्थन करीत होते. उलटपक्षी गदारोळ माजण्याला माध्यमांना जबाबदार धरीत होते. त्यांच्या बेजबाबदारपणाच्या विधानाशी सुरवातीला फारकत घेणाऱ्या कॉंग्रेसने अधिकृतपणेही अंतुले यांनी मांडलेला "कटकारस्थाना'चा सिद्धांत फेटाळून लावला आहे. पण, याच कॉंग्रेस आघाडी सरकारात असूनही जाहीरपणे शंका उपस्थित करून सामूहिक जबाबदारीच्या तत्त्वाला हरताळ फासल्याबद्दल त्यांना शिक्षा देण्याचे टाळले गेले आहे. देश ज्या मानसिकतेतून जात आहे, ज्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकजुटीने उभा राहत आहे, त्यालाच अपशकून करण्याचा प्रयत्न अंतुले यांनी केला.त्याविषयी त्यांच्यावर कारवाई झाली नाही. काही न घडल्यासारखे अंतुले सहीसलामत बाहेर पडले, ही बाब कॉंग्रेससाठी लाजीरवाणी आहे.

करकरे आणि त्यांच्यासोबतच्या दोन अधिकाऱ्यांच्या मृत्यूसंदर्भात चिदंबरम यांच्या निवेदनाने समाधान झाल्याचे सांगून अंतुले यांनी वेगळ्या चौकशीची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. करकरे पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हातून ठार झाला नाही, असे कोणता भारतीय म्हणू शकेल, असा उलट सवालही त्यांनी केला; तो त्याच्या आधीच्या विधानाच्या पार्श्‍वभूमीवर निलाजरेपणाचा आहे. सरकारने त्यांना वाचविले असले, तरी काही प्रश्‍न उरतातच. करकरे यांना कामा इस्पितळाकडे कुणी पाठविले, कोणाच्या आदेशाने ते तिथे गेले, असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते. अतिशय जबाबदार पदावर असलेल्या, सरकारचा घटक असलेल्या एका व्यक्तीने असे प्रश्‍न उपस्थित करणे अतिशय गंभीर आहे. करकरे यांना तिथे जायला कुणी सांगितले याची, आणि तिथे जायला सांगणाऱ्याच्या त्यामागील हेतूची कल्पना असल्याशिवाय किंवा आपल्या काही वैयक्तिक स्वार्थासाठी कुणाला तरी लक्ष्य करण्याचा हेतू असल्याशिवाय असे प्रश्‍न उपस्थित होऊ शकत नाहीत.ते प्रश्‍न का उपस्थित केले,याविषयी अंतुले यांनी कोणतेच स्पष्टीकरण केलेले नाही. कटकारस्थानाचा संशय व्यक्त करून आकांडतांडव करणाऱ्या अंतुले यांनी त्या प्रश्‍नांची उत्तरे देणे आवश्‍यक आहे. किमानपक्षी कॉंग्रेसने त्यांच्याकडून ती उत्तरे घ्यायला हवीत. त्यासाठी अंतुले यांचीच चौकशी केली जायला हवी.त्याची त्यांना शिक्षाही द्यायला हवी.अन्यथा, राष्ट्रीय पेचप्रसंगाच्या वेळी वातावरण गढूळ करून देशाच्या मनोधैर्यावर ओरखडे काढणाऱ्या प्रवृत्तीचे फावेल,त्या फोफावतील.

No comments: