Sunday, December 21, 2008

बंदीचे स्वागत

गोवा हे देशभरातील आणि जगभरातील पर्यटकांचे आवडते ठिकाण. देशी- विदेशी पर्यटकांची इथे बारमाही वर्दळ असते.वर्षअखेरीला आणि नववर्ष प्रारंभाला इथला माहोल अद्‌भुत बनलेला असतो. सामान्य पर्यटकांबरोबर बड्या सिलेब्रेटिजना, चित्रपट जगतापासून उद्योगजगतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील मातब्बरांनाही हे दिवस गोव्यात घालवायचे आकर्षण वाटते. गेल्या काही वर्षांत या काळात गोव्यात येणाऱ्या मातब्बरांची संख्याही वाढलेली दिसते. वेगळ्याच जल्लोषाने भारलेले हे दिवस असतात. यंदा मात्र या जल्लोषावर निर्बंधाचे विरजण पडले आहे, ते गोवा सरकारने बीच पार्ट्यांवर बंदी घातल्याने. जल्लोषाच्या केंद्रवर्ती ठरलेले आकर्षणाचे अंग त्यामुळे आक्रसून जाणार आहे. त्या प्रमाणात जल्लोषात रमणाऱ्यांच्याही उत्साहालाही ओहोटी लागणार आहे. देशातील एकूण वातावरण पाहता ही बंदी अपरिहार्यच म्हणावी लागेल.मात्र, बंदीचा अंतिम निर्णय होण्यापूर्वी त्याबाबत जो घोळ घातला गेला तो अपरिहार्य तर मुळी नव्हताच, आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांतून शहाणपणा शिकायच्या आणि स्वीकारायच्या बाबतीत आपल्या प्रशासनाची मानसिकता इंजिनातील बिघाडामुळे गचके खात चालणाऱ्या गाडीसारखी हेलकावत असल्याचा अनुभव देणारी होती.

तीन दिवसांपूर्वी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी जी. पी. नाईक यांनी दक्षिण गोव्यात 23 डिसेंबर ते 5 जानेवारीपर्यंत बीच पार्ट्यांवर बंदी घालण्यात आल्याचा आदेश जारी केला. दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने हा निर्णय करण्यात आला. संध्याकाळी तो आदेश मागे घेण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले. प्रत्यक्षात आदेश जारी झाला की नाही, याविषयी माजलेला गोंधळ कायम राहिला. मुख्यमंत्र्यांनी बंदी नसल्याचे सांगितले. गृहमंत्र्यांनीही भीतीचे कारण नसल्याचे सांगून टाकले. शनिवारी उच्चस्तरीय बैठकीत निर्णय होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. त्या बैठकीत संपूर्ण गोव्यात बीच पार्ट्यांवर बंदी घालण्याचा निर्णय करण्यात आला. तो जाहीर झाला. या सगळ्या गोंधळामुळे आपल्याकडची निर्णयप्रक्रिया नेमकी कशी चालते, याविषयी मनात शंका उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. पोलिसांकडे आलेल्या माहितीच्या आधारे एक जिल्हाधिकारी काही निर्णय घेऊन जाहीर करतो. मुख्यमंत्री, गृहमंत्री या निर्णयप्रक्रियेत असल्याचे दिसत नाही. उलटपक्षी त्यांच्या वक्तव्यांतून बंदीचा निर्णय करण्याइतपत गंभीर परिस्थिती नसल्याचे जाणवू लागते आणि दुसऱ्या दिवशी याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत बंदीचा निर्णय होऊन आदल्या दिवशी दिसणारे चित्र नेमके उलटे होते. हा प्रकार उद्वेगजनक आहे.

दहशतवादाचा धोका असेल, तर तो संपूर्ण गोव्याला आहे. त्यासाठी निर्णय करायचा झाला तर तो सगळ्या गोव्यासाठी व्हायला हवा, जसा व ज्या पद्धतीने तो तो नंतर झाला. मग त्याआधी उलटसुलट चर्चेला वाव देणारी गोष्ट कशी घडली ? मंत्री आणि प्रशासन परस्परांशी अलिप्तपणाने निर्णय घेतात, असे चित्र का दिसले ? तेही दहशतवादासारख्या मोठ्या आपदा निर्माण करणाऱ्या विषयासंदर्भात ? निर्णय घेताना आवश्‍यक असणारा ताळमेळ का दिसत नाही ? मुंबईसारख्या महानगरात एवढे हत्याकांड घडूनही आपण काहीच शिकायला तयार नाहीत, असा त्याचा अर्थ घ्यायचा का ? पाण्यावर एकामागून एक उठणाऱ्या तरंगासारखे काही क्षण असे अनेक प्रश्‍न मनात उमटले.सावधगिरीचा संदेश निर्णायकपणे आणि निःसंदिग्धपणे द्यायच्या वेळी अशा तऱ्हेचा घोळ लोकांना, निर्णयामागील पार्श्‍वभूमी व कारणाबाबत गोंधळवून टाकणारा आणि पुढील स्थितीसंबंधी आकलनाबाबत संभ्रमात टाकणारा आहे. प्रत्यक्ष घडू शकणाऱ्या विपरिताइतका तो अधिक धोक्‍याचा आहे. यासाठी राज्यकर्त्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी असे विषय अधिक परिपक्वतेने हाताळणे गरजेचे आहे.

गोवा दहशतवाद्यांच्या नजरेत आल्याचे किमान तीन चार वर्षापूर्वी उघड झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांसारखी गर्दीची ठिकाणे दहशतवाद्यांची लक्ष्य होण्याची बाबही याआधी उघड झाली आहे. मध्यंतरी पकडल्या गेलेल्या काही विद्‌ध्वंसक घटकांकडूनही दहशतवाद्यांची नजर गोव्याकडे वळल्याची माहिती उघड झाली होती. गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर विदेशी पर्यटकांची होणारी वर्दळ, त्यातही इस्त्राईली नागरिकांचा असलेला वावर, गोव्याला असणाऱ्या संभाव्य धोक्‍यामागची कारणे आहेत. देशातील गुप्तचर यंत्रणानांही दहशतवाद्यांच्या अशा कारस्थानाची माहिती मिळालेली आहे आणि त्या त्यावेळी गोव्याला सावधानतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबईतील हल्ल्यानंतर तर कुठल्याही स्वरूपाची, थोडीशीही जोखीम पत्करणे संकटाला आमंत्रण देण्यासारखेच आहे.त्यामुळे सरकारने केलेला बंदीचा निर्णय समर्थनीय ठरतो.

वर्षअखेर, नववर्षदिन साजरा करण्याच्या निमित्ताने वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात जल्लोषाचे वातावरण असते, हे खरे असले,तरी तो जल्लोष सगळाचा सगळा निकोप असतो, असे मानायचे काही कारण नाही. जल्लोषाच्या मलमली वातावरणाच्या पडद्याआड अमली पदार्थाचा व्यापार, सेवन, व्यसन आणखीनही काही हिडीस प्रकार यांचाही फड रंगलेला असतो. जल्लोषाच्या वातावरणामुळे एरव्हीचे नियंत्रण, तपासणीचा काचही काहीसा सैलावलेला असतो.त्याचा फायदा घेऊन आत शिरणारे असतात आणि नव्याने जाळ्यात अलगद अडकणारेही असतात. त्यात देशी, विदेशी पर्यटकही सामील असतात. आयुष्याची वाट कोरण्याच्या वयातली आणि वळणावरची मुलेही असतात, ज्यातील काही क्षणिक मोहाला बळी पडून कर्तृत्वाचे पाऊल गमावून बसतात. लोकांच्या मदहोशीचा आपले उखळ पांढरे करून घेण्यासाठी लाभ उठविऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी असते.अशा "लाभार्थी'ची अर्थात मोठी साखळी असते. बंदीमुळे त्यांना थोडी खोट बसेल,पण काही बहकणाऱ्या पावलांनाही चाप बसेल. परिसरात राहणाऱ्यांना थोडासा मोकळेपणा, निवांतपणा मिळेल. थोड्याशा चांगल्या निष्पत्तीच्या अल्प दिलाशासाठीदेखील बंदीचे स्वागत करायला हवे.

No comments: