Tuesday, December 16, 2008

"युद्ध नको'त दडलेय काय?

पाकिस्तान एक "जबाबदार राष्ट्र' आहे. "अण्वस्त्रसज्ज देश' आहे.पाकिस्तानला युद्ध नको, परंतु कुणी (म्हणजे भारताने)आक्रमण केल्यास आपले संरक्षण करण्यास देश सक्षम असल्याचे निवेदन त्या देशाचे पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांनी राष्ट्रीय असेंब्लीत केले. स्वतःला जबाबदार म्हणवणाऱ्या पाकिस्तानची मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतरची कृती आणि उलटसुलट वक्तव्ये त्याचा बेजबाबदारपणा दाखवणारी आहेत. त्याच्या अण्वस्त्रसज्जतेचा उल्लेख देशवासीयांना देशाच्या संरक्षणासंबंधी आपल्या क्षमतेची ग्वाही देण्यापेक्षा वेगळाच गर्भितार्थ सूचित करणारा आहे. त्याला जोडून येणारी "युद्ध नको'ची भाषाही मानभावीपणाची आहे. त्या "नको'मध्ये युद्धखोरीचा ज्वर दडलेला आहे. अण्वस्त्रसज्जतेचा उल्लेख त्यातून आलेला आहे.पाकिस्तानातील राज्यकर्त्यांवर तेथील मूलतत्त्ववाद्यांचा पगडा आहे.अण्वस्त्रसज्जतेला त्या आततायी शक्तीच्या उपस्थितीची आणि प्रभावाची जोड असल्यामुळे पाकिस्तान ही एक अविवेकी घातक शक्ती बनलेली आहे. त्यापायीच जग सबुरीने घेत आहे. परंतु, समजुतीने, चर्चेने सांगून पाकिस्तान ऐकणार नाही, हे त्याच्या सध्याच्या वर्तणुकीतून जसे स्पष्ट झाले आहे, तसेच तिथे लोकशाही रुजण्यास आणि ती सक्षम होऊन कारभाराची, निर्णयाची सत्ता व सूत्रे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीच्या हाती येण्यास आणखी खूप वर्षे जावी लागतील, हेही उघड झाले आहे. तेवढा काळ भारतालाच नव्हे, जगालाही त्याला चुचकारीत राहणे परवडणार नाही, हे ओळखूनच भारताला आणि जगाला त्यावर तोडीचा प्रभावी उपाय करावा लागणार आहे.

भारतीय संसदेवर हल्ला झाल्यानंतर लष्करे तोयबाला नेस्तनाबूत करण्याचे आश्‍वासन पाकिस्तानने दिले होते. त्यावर बंदी घातली गेली, परंतु तिचे उच्चाटन करण्यात आले नाही. तेच लोक जमात-उद-दावाच्या नावाने आता हैदोस घालीत आहेत. घातपाती कारवाया करणाऱ्या किंवा कुठल्याही विघातक संघटनेवर बंदी घातल्यानंतर तिची पाळेमुळे खणून काढली नाही, तर ती नव्या अवतारात प्रकटते आणि आपले विद्‌ध्वंसाचे काम पुढे चालू ठेवते. बंदीचा उद्देशच त्यात पराभूत होतो. भारतात "सिमी'च्या बाबतीतही असाच अनुभव आहे. बंदी म्हणजे विद्‌ध्वंसक घटकांना नव्या नावानिशी तीच घातक कृत्ये करण्यासाठी उपलब्ध होणारी पळवाट ठरू नये. बंदीचा उद्देश विद्‌ध्वंसक कारवायांना पूर्ण आळा घालण्याचा असतो. बंदीसारख्या निर्णयानंतर खरी कारवाई सुरू होते. व्हायची असते. बंदीतच कारवाई संपते. त्यामुळे अशा घातक घटकांचे फावते. मुळातले अरिष्ट आणखी तीव्र होते. पाकिस्तानने "लष्कर'वर कारवाईचे नाटक आणि "जमात'वर मेहेरनजर करून दहशतवादी शक्तींना बळकटी दिली आहे, जगावरील दहशतवादाची छाया आणखी गडद केली आहे.
"युद्ध नको'चा पाकिस्तानचा घोष फसवा आणि भारताला गाफील ठेवण्याचा डाव असेल, या शक्‍यतेचा गांभीर्याने विचार करायला हवा.पाकिस्तानशी शांततेच्या, दोस्तीच्या वाटाघाटी सुरू असताना कारगिल घडले होते. दोन दिवसांपूर्वी भारताने आपल्या हवाई हद्दीचा भंग केल्याची हूल पाकिस्तानने उठविली होती. तसा भंग झाला नसल्याचा खुलासाही नंतर पाकिस्तानने केला. मुंबईतील हल्ल्यावरून लक्ष दुसरीकडे वळविण्याचा तो पाकिस्तानचा प्रयत्न होता, अशी टिप्पणी भारताने केली. पाकिस्तानचा उद्देश तेवढा मर्यादित असेल, असे मानता येणार नाही. एका बाजूला "युद्ध नको' म्हणत, अशा हुली उठवीत राहायचे,दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करायचे नाटक करायचे, उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करीत गोंधळ उडवून देत राहायचे आणि दुसऱ्या बाजूला सैनिकी हालचाली सुरू ठेवायच्या, अशी पाकिस्तानी राज्यकर्त्यांची सध्याची वागणूक आहे. भारताला आणि जगाला जे अपेक्षित आहे, ते निर्णायकरीत्या करण्यात कालहरण करीत राहायचे, असा त्याचा खाक्‍या आहे. कारवाई करीत असल्याची धूळफेक करीत मिळणारा वेळ युद्धाच्या तयारीसाठी तो वापरीत नाही ना, याकडे भारताला आणि जगाला अगदी डोळ्यांत तेल घालून लक्ष द्यावे लागणार आहे. युद्धसदृश स्थिती निर्माण करून आपल्यावरचा जागतिक दबाव शिथिल करण्याचा डावपेच आणि खटाटोप त्यामागे असण्याची शक्‍यताही लक्षात घ्यावी लागणार आहे.

No comments: