Monday, January 5, 2009

भारताने कारवाई करावी

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याला महिन्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. दहशतवाद्यांविरुद्ध आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे भारतीय नेते सांगत आहेत. तर,हल्ल्यात पाकिस्तानमधील कुणाचाही हात नसल्याचे पालूपद पाकिस्तान आळवीत आहे. पाकिस्तानात दडलेल्या आणि त्या देशाच्या भूमीवरून, तेथील घटकांच्या सक्रिय पाठिंब्याने, सहभागाने दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवादी संघटना आणि व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचा पाकिस्तानचा मुळीच मनोदय नसल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या वक्तव्यावरून पुरेसे स्पष्ट झालेले आहे. हल्ल्यात कुणाही पाकिस्तानी नागरिकाचा सहभाग नाकारणाऱ्या आणि तशा सहभागाचे पुरावे मागणाऱ्या पाकिस्तानने आता पुरावे दिल्यानंतर तेही नाकारण्याचे धोरण अवलंबिलेले आहे.हल्ल्यात कुणीही पाकिस्तानी नसल्याचे ठासून सांगणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादी आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या म्होरके यांच्यातील संभाषणाचे पुरावे उपलब्ध करून दिल्यानंतरही आणि मुंबईतील हल्ल्यात पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार त्या देशाबाहेरील नव्हे, तर तेथील घटकांचाही सहभाग असल्याचे उघड केल्यानंतरही पाकिस्तान आपला दुराग्रह आणि खोटारडेपणा सोडायला तयार नाही. अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संस्थेने हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचे पुरावे दिल्यानंतर त्याची नकारघंटा थांबलेली नाही. एफबीआय अधिकाऱ्यांनी पाकिस्तानशी चर्चा केल्यानंतर पाकिस्तानच्या भूमिकेत किंचित फरक पडला आहे. पाकिस्तानातील संशयित दहशतवाद्यांचे जाबजबाब घेण्यास भारताला परवानगी दिली जाऊ शकेल, इतपतच हा फरक पडलेला आहे. परंतु, काही झाले तरी दहशतवाद्यांना भारताच्या हवाली केले न जाण्याची त्याची भूमिका ठाम आहे. अमेरिकेबरोबर पाकिस्तानचा प्रत्यार्पण करार आहे, तसा भारताशी नसल्याने भारताची मागणी मान्य करता येणार नसल्याचे कारण ते आपल्या भूमिकेच्या समर्थनार्थ पुढे करीत आहेत. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव असूनही पाकिस्तानचा आढ्यतेखोरपणा सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय दबाव वाढला की थोडे नरमल्यासारखे करायचे आणि थोडीशी पाठ वळताच मूळ पालूपदावर यायचे असे धोरण पाकिस्तानने चालविले आहे. याच तऱ्हेने होता होईल तेवढे कालहरण करायचे. अजून थोडा काळ गेला,की आंतरराष्ट्रीय दबावातही शिथिलता येईल.त्याचा फायदा उठवून मुंबईतील हल्ल्याचे प्रकरण जिरून जाऊ द्यायचे, अशी खेळी पाकिस्तानने चालविली आहे. ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही "शब्द नको कृती करा' अशी तंबी दिली होती. अमेरिकेने तेवढ्याच कठोरपणाने वारंवार सुनावले आहे.अजूनही कृतीचा मागमूस दिसत नाही. सगळीकडून शब्दांचेच आसूड सध्या तरी ओढले जात आहेत. त्याबरोबरीने संयम आणि सबुरीने घ्यायचे सल्लेही दोन्ही देशांना दिले जाताना दिसते. भारताच्या संयमाचा आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या समजावण्याच्या भूमिकेचा पाकिस्तान गैरफायदा घेत आहे.कृतिविना जो काळ पुढे सरकत चालला आहे, तो प्रकार पाकिस्तानचा निर्ढावलेपणा वाढविणारा ठरणार आहे.

मुंबईतील हल्ल्याचा भारत बळी ठरलेला आहे. देशावर हल्ला करणाऱ्याला त्याचे चोख उत्तर देण्याचा आणि अशा घटनेची पुनरावृत्ती करण्याची विद्‌ध्वंसक घटकांना छाती होणार नाही अशी उपाययोजना करण्याचे, त्यासाठी आवश्‍यक कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य भारताला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती झाल्यास त्याची भारी किंमत मोजावी लागेल, असे इशारे दिल्याने दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानला पुरेशी जरब बसणार नाही.त्यांच्या उद्दामपणालाही आळा बसणार नाही, याची जाणीव भारतीय नेतृत्वाने ठेवायला हवी. असे इशारे दिले जातात,तेव्हा "आता झाले ते झाले, पुढे करू नका,' अशी तंबी देऊन झाला प्रकार मागे सारला जातो की काय, अशा शंकेला वाव राहतो. आपण नको तेवढे सौम्य वागतो आहेत, असा विपरीत संदेशही त्याने देशवासीयांना आणि विद्‌ध्वंसक घटकांना जाऊ शकतो. त्यातून देशवासीयांत निराशेची भावना निर्माण होऊ शकते,त्याचवेळी दहशतवादी घटकांच्या उन्मादाला खतपाणी मिळू शकते. मुंबईतील हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव वाढविणे, मुत्सद्देगिरीच्या स्तरावर पाकिस्तानला कारवाई करण्यासाठी बाध्य करणे यासाठी प्रयत्न आणि व्यूहरचना करणे आवश्‍यक आहे.त्याचवेळी स्वतःही कारवाई सुरू करून दहशतवाद सहन करणार नसल्याचा कठोर संदेश संबंधितांना देणेही अपरिहार्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरून कधी कारवाई होईल तेव्हा होईल, पाकिस्तान स्वतः त्याच्या भूमीत दहशतवादाविरुद्ध पावले उचलेल तेव्हा उचलेल, त्याची वाट पाहत न थांबता दूतावास बंद करण्यापासून ज्या ज्या पद्धतीने पाकिस्तानची थेट कोंडी करणे शक्‍य आहे, तिथे तिथे तिथे भारताने प्रत्यक्ष कृती करायला हवी. तरच, भारताचा वचक बसेल.

1 comment:

vijay said...

ब्लॉग मस्तच आहे. "भारताने कारवाई करावी' हेही तितकेच बेधडक आणि मनमोकळे. "आता झाले ते झाले, पुढे करु नका,' अशी तंबी देऊन झाला प्रकार मागे सारला जातो की काय, अशा शंकेला वाव राहतो... हे निरीक्षण तंतोतंत खरे ठरण्याची चिन्हे दिसताहेत. लोकभावनेची कदर व सामाजिक दायित्व यांवर आपल्या देशात नेहमीच कमजोर राजकीय इच्छाशक्तीने मात केली आहे. या वेळीही तसेच होण्याची शक्‍यता आहे. "ये रे माझ्या मागल्या' अशी अवस्था निदान यावेळी तरी होणार नाही, असे प्रत्येक घटनेनंतर भारतीयांना वाटते; पण त्याच्या या वाटण्या न वाटण्याची कदर करतो कोण? आक्रमण हा पर्याय नसला, तरी पाकविरुद्ध राजकीय आणि राजनैतिक मोहीम उघडता येणे शक्‍य आहे. या दोन्ही पातळ्यांवरुन त्या देशाची कोंडी करण्याचे अनेक मार्ग आहेत आणि ते यापूर्वीच अवलंबले जायला हवे होते. पण, आमचे पाऊल मात्र इशाऱ्यांच्या पुढे पडत नाही. ते पडेल, तो भारतीयांसाठी सुदिन!
- विजय बुवा