Wednesday, March 18, 2009

संमेलनाचा वाद

संत तुकाराम यांच्याबद्दलचा काही मजकूर आक्षेपार्ह वाटल्याने आक्रमक बनलेल्या वारकऱ्यांच्या संतापापुढे आनंद यादव यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. महाबळेश्‍वर येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना यादव यांनी नियोजित अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने संमेलनाच्या इतिहासात अभूतपूर्व प्रसंग उभा राहिलेला आहे. आनंद यादव यांच्या लिखाणातील आक्षेपार्हता, वारकऱ्यांची त्यांना न साजणारी अट्टहासी आक्रमकता याची ही परिणती एकंदर सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक परिप्रेक्ष्यात अतिशय दुर्दैवी आणि धोकादायक घटना आहे.

आनंद यादव यांनी तुकाराम यांच्या संदर्भात लिहिलेला मजकूर आक्षेपार्ह आहे. कलावंत आणि साहित्यिकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करूनही तसे लिहिणे चुकीचे आहे, असे मला वाटते.समाजामध्ये विभूतिपदाला पोचलेली व्यक्ती पूर्वायुष्यात इतरांसारखी सर्वसामान्य असू शकते, या गृहितकाशिवाय त्या लिखाणाला काही आधार दिसत नाही. तरुण वयातील मुले तारुण्यसुलभ भावनाविकारांच्या आहारी जातात,भल्याबुऱ्याची पोच नसल्याने गावगप्पात रमतात, स्त्रैण-लैंगिक विषयात रस घेतात. तरुणाईचे हे सर्वसाधारण रूप असू शकते. संत तुकाराम हे अशा सर्वसाधारण तरुणांपैकीच होते, असे आनंद यादव यांनी आपल्या कादंबरीत सुचविले आहे. पंढरीची वारी करून आल्यानंतर आत्मबोधाची जी प्रचिती तुकरामांना आली, त्यावेळी आपल्या वर्तनाविषयी ते अंतर्मुख झाले.त्यावेळी मनात चाललेले विचारमंथन स्वगत स्वरूपात प्रकटले आहे. त्या मजकुरातून तुकारामाची चुकीची प्रतिमा रंगवली गेली, त्यांच्या व्यक्तिमत्व चुकीचे रेखाटले गेले, असा या लिखाणाविषयीचा आक्षेप आहे. तुकारामाच्या व्यक्तिमत्वाविषयी जनमानसात असलेल्या रूढ प्रतिमेला तडा देणारे हे लिखाण आहे. त्यामुळे आक्षेप अनाठायी नाही. एखाद्या थोर पुरुषाविषयी चरित्रात्मक कादंबरी लिहिताना त्यांच्या जीवनरेखाटनात काही रिकाम्या जागा आपल्या कल्पनेने, प्रतिभेच्या जोरावर भरायची मुभा कलावंताला असली,तरी त्यामुळे चरित्र नायकाच्या रुढ प्रतिमेला धक्का पोचत असेल, आणि कल्पनेने भरलेल्या रंगांना पक्‍क्‍या पुराव्याचा आधार नसेल, तर कलावंताचे असे स्वातंत्र्यही मान्य करता येणार नाही. स्वातंत्र्य; अभिव्यक्तीचे असेल अथवा अन्य कशाचेच; त्यालाही वाजवी निर्बंध लागू असतात. ते अमर्याद आणि अनिर्बंध असू शकत नाही. आक्षेपार्ह लिखाणाबद्दल माफी मागून यादवांनीच मुळात त्याला तसा आधार नसल्याचे मान्य केले आहे. दुसरी बाब अशी, की कादंबरी म्हणून लिहिले गेले असेल, तरी संबंधित मजकूर कल्पनेच्या भराऱ्याच्या स्वातंत्र्याची जाणीव ओलांडून केवळ मजकूर म्हणूनच पुढे नोंद होत जातो. संबंधित व्यक्तीच्या चरित्राचाच तो "अस्सल' भाग मानला जाण्याची हरेक शक्‍यता असते. त्यामुळे तिऱ्हाईतांसाठी, ज्यांना तुकाराम मुळात माहीत नाही, अशा वर्गामध्ये हा मजकूर कल्पनेचा भाग न राहता वास्तवाचा भाग बनून जातो.परिणामी संबंधित विभूतीविषयी चुकीचे चरित्र रूढ होण्याचा धोका त्यातून निर्माण होतो.यासाठी यादव यांच्या लिखाणातील संबंधित मजकूर समर्थनीय ठरत नाही.

वारकऱ्यांनी संबंधित लिखाणाला आक्षेप घेणे समजता येते. परंतु, मूळ आक्षेपाच्या पलीकडे जाऊन जी भूमिका त्यांनी अट्टहासाने पुढे चालविली आहे ती मुळीच समर्थनीय नाही. यादव यांनी आपली चूक मान्य करून दोनदा माफी मागितली. माफीपत्र लिहून दिले. अखेरीस वारकऱ्यांच्या दबावापुढे झुकून राजीनामा दिला. त्यावर हा तुकोबा- ज्ञानोबा यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया वारकरी मंडळीनी व्यक्त केली आहे. खरे तर या दोन्ही संतश्रेष्ठांचा हा पराभव आहे. रात्रंदिन त्यांचा नामजप करणाऱ्या वारकऱ्यांनी तो घडवून आणलेला आहे. या ना त्या निमित्ताने ज्यांनी सतत छळ केला, त्यांनाही ज्ञानोबा- तुकोबांनी सहृदयपणे क्षमा केली.त्यांचा वारसा सांगणाऱ्यांनी संतांच्या या थोरपणाचे भान सोडलेले दिसते.

यादव यांच्या लिखाणाला आक्षेप घेतल्यानंतर, त्यांनी माफी मागितली.पुस्तकही मागे घेतले.तेव्हा खरे तर विषय संपायला हवा होता. हट्टाला पेटून वारकऱ्यांनी त्यानंतरही यादव यांच्या राजीनाम्याचा राजीनाम्याचा हट्ट धरला,संमेलन होऊ न देण्याची धमकी दिली. हा वारकऱ्यांचा अतिरेक आहे.आनंद यादव लोकशाही निवडणूक प्रक्रियेतून संमेलनाध्यक्ष निवडले गेले आहेत. त्यांची निवड केवळ एका पुस्तकाच्या आधारे झालेली नाही. त्यांच्या एकूण साहित्यनिर्मितीचा, साहित्य सेवेचा विचार करून त्यांची निवड झाली आहे.संमेलन हा मराठी साहित्याचा, कोट्यवधी साहित्यप्रेमींचा उत्सव आहे. तो एकट्या यादवांचा कार्यक्रम नाही. त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडून वारकऱ्यांनी साहित्य महामंडळ, आयोजक संस्था मराठी साहित्यप्रेंमी, साहित्य जगत या सर्वांनाच वेठीला धरले आहे. आपल्या संघटितपणाचा फायदा उठवून लोकशाहीत इतरांना असलेल्या हक्कांवर ते गदा आणीत आहे. आपण म्हणू ते मनवून घेण्याचा आडदांडपणा त्यांनी चालविला आहे. महामंडळ आणि आयोजकांनीच नव्हे, तर सर्व मराठी माणसांनीही या दादागिरीचा निषेध करायला हवा.संत तुकाराम ही वारकऱ्यांची मक्तेदारी नाही,हेही त्यांना ठणकावून सांगायला हवे. या प्रकारे संमेलनाची वासलात लावता येते, असे दिसले तर उद्या उपद्रवमूल्य असलेले कुणीही घटक, संघटन मनमानी करायला पुढे सरसावल्याशिवाय राहणार नाही. वाद उकरून काढायला कुठलेही निमित्त पुरेसे ठरेल. महामंडळालाच नव्हे तर अन्य कुणालाही अशा स्वरूपाचे साहित्यिक,सांस्कृतिक अभिसरणाचे उपक्रम निश्‍चिंतपणे राबविता येणार नाही.अनिष्ट प्रवृत्तीच्या ध्रुवीकरणाला वाट मिळून सामाजिक जीवनातही त्याचे विपरीत परिणाम होतील. महाबळेश्‍वर संमेलनानिमित्ताने उफाळून आलेला हा वाद पुढील काळातील धोक्‍याकडे इशारा देणारा आहे. त्याचा पाया आताच नष्ट करायला हवा.

1 comment:

Anonymous said...

नाइक साहेब,
जे झालं आणि जे काही वारकऱ्यांनी केलं ते योग्यच आहे. म्हणजे आता तरी इतर लेखक ह्या पासुन बोध घेतिल आणि इतर महापुरुषांविषयी लिहितांना हजारदा विचार करतिल. आनंद यादव, तसेही, फुटक्या तोंडाचे. पहिल्या वेळेसच जेंव्हा ह्या गोष्टिवर आक्षेप घेतला गेला तेंव्हा ते म्हणाले होते की तुम्हाला कादंबरी म्हणजे काय ते कळते कां? लोकांच्या बुध्दि किंवा समजावर बोलण्याचा लेखकाला काहिही अधिकार नसतो.
बरं , यावर माझे उत्तर असे आहे.. की समजा उद्या आनंद यादवांवर कादंबरी लिहिली आणी त्यात लिहिलं की यादव हे वेश्यांचे दलालीचा कारभार करायचे कधी कधी वेश्यागमन पण करायचे ( हे सगळं काल्पनिकच आहे अर्थात, आणि कादंबरी काल्पनीक असते(!) तेंव्हा यादवांच्या म्हणण्याप्रमाणे यात काहिही लिहिले तरी चालेल) असं काही लिहिलं तर चालेल कां??