Wednesday, March 11, 2009

रॅगिंगची विकृती

आपल्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा घेऊन महाविद्यालयीन जीवनात पदार्पण करणाऱ्या कोवळ्या जिवांचा रॅगिंग नावाच्या विकृतीने घास घेण्याचा प्रकार थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. रॅगिंगच्या विकृतीला कोवळे जीव, त्याचे भावविश्‍व बळी पडण्याची संकट मालिका सुरूच आहे. या विकृतीविरुद्ध देशपातळीवर वेळोवेळी चर्चा आणि संताप व्यक्त होऊनही तिला आळा बसत नाही.हिमाचल प्रदेशमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या अमन कचरू या 19 वर्षीय कोवळ्या तरुणाचा गेलेला बळी रॅगिंगच्या भयावहतेचा ताजा दाखला आहे. आपला महाविद्यालयात छळ होत असल्याची तक्रार त्याने आपल्या पालकांकडे आणि नातेवाइकांकडेही केली होती. कुणीही गोष्टी या थराला जातील याची कल्पना केली नव्हती.महाविद्यालयीन जीवनात, वसतिगृहाच्या जीवनशैलीत छेडछाड, थोडीफार सतावणूक,चेष्टा मस्करी होतच असते, अशीच धारणा करून कुणी त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. अमनच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील आणि अन्य नातेवाईकांच्या या आशयाच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. आपल्या मुलाच्या वाट्याला जे आले ते अन्य कुणाला सोसावे लागू नये,यासाठी आणि गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत लढण्याचा निर्धार अमनच्या वडिलांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या लढ्याला काय फळ येईल,हे येणाऱ्या काळात दिसेलच.मात्र, महाविद्यालयात चालणारा रॅगिंगचा प्रकार हा मौजेकरिता चाललेली मस्करी म्हणण्याइतपत निरुपद्रवी खेळ नसतो, याचा मुलांच्या पालकांनीही गांभीर्याने विचार करायला हवा, वेळीच त्याबाबत सावधगिरीची पावले उचलायला हवीत, हे अमनच्या मृत्यूने अधोरेखित केले आहे. महाविद्यालयातील सीनियर मुले मौजेकरिता खेळ करीत असतीलही, पण तो कुणाच्या तरी जिवावर बेततो, तेव्हा तो खेळ राहत नाही, याची जाणीव पालकांसह महाविद्यालयाचेप्रशासन आणि सरकारनेही ठेवायला हवी.

अमनच्या मृत्यूमुळे रॅगिंगचा हा हिडिस चेहरा लोकांच्या समोर आला. असे किती तरी प्रकार देशभरातील विविध महाविद्यालयात घडतच असतात. मूकपणाने किती तरी मुले त्याला बळी पडत असतात. त्यांचे भावविश्‍व उद्‌ध्वस्त होत असते. कुणाला त्याचा पत्ता नसतो.दीडेक वर्षापूर्वी इंदूरमध्ये संगणक अभ्यासक्रम करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थ्याने रॅगिंगपुढे खचून जाऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी माध्यमात एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. त्यात 2005 व 2006 या दोन वर्षांच्या काळात रॅंगिंगची 64 प्रकरणे माध्यमातून प्रसिद्धीस आल्याचे नमूद केलेले होते. जी माध्यमातून लोकांपर्यंत पोचत नाही अशी किती तरी प्रकरणे असतील. या 64पैकी दहा प्रकरणात विद्यार्थ्यांचे मृत्यू झाले, 11 प्रकरणात विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याचे प्रयत्न केले आणि तेवीस प्रकरणात विद्यार्थ्यांना इजा झाल्या होत्या. उजेडात न येणाऱ्या घटनांबाबत केवळ अंदाजच करता येतो. पण जे उजेडात येते त्यावरूनही रॅंगिंगच्या भयानकतेचा अंदाज करता येतो. कोवळ्या वयात माणसांचे जीवन उद्‌ध्वस्त करणाऱ्या या विकृतीला आणि ते प्रकार करणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्याशिवाय त्याला आळा बसणार नाही.जिथे असे प्रकार उघडकीस येतात, त्या महाविद्यालयांवर, शैक्षणिक संस्थांवरही कारवाई व्हायला हवी. परंतु, आपल्या संस्थेत रॅगिंग होत नाही ना, यावर पाळत ठेवण्यासाठी खास यंत्रणा उभारणेही त्यांना बंधनकारक करायला हवे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकारांची गंभीर दखल घेऊन रॅगिंग हा शिक्षायोग्य गुन्हा ठरविण्यासाठी भारतीय दंड संहितेत आवश्‍यक कलम जोडण्याची सूचना 2005 मध्ये केली होती. रॅगिंग मानवी हक्काच्या उल्लंघनाची बाब ठरविताना त्यासंदर्भातील वेगवेगळ्या कृतीं गुन्ह्याच्या व्याख्येत आणण्यासही न्यायालयाने सुचविले होते. महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगला आळा घालण्यासाठी कॉंग्रेसच्या एका खासदाराने संसदेत खासगी विधेयक मांडले होते.त्यावर अजूनही संसदेला कायदा करता आलेला नाही. त्यामुळे रॅगिंगचे जे बळी ठरतात त्याला कायदा करणारेही जबाबदार ठरतात. अमनच्या बलिदानाने किमान त्यांना जाग यावी.

No comments: