Friday, March 13, 2009

तोकडा पर्याय

कॉंग्रेस आणि भाजपला समर्थ पर्याय देण्याच्या हेतूने आठ राजकीय पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे. कर्नाटकातील दोब्बेसपेट येथे दीडेक लाखाच्या गर्दीच्या उपस्थितीत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या स्थापनेचा कार्यक्रम पार पडला. तिसऱ्या आघाडीला केंद्रात सत्तास्थानी पोचविण्याचे स्वप्न असल्याचे देवेगौडा यांनी यावेळी सांगितले. कॉंग्रेस आणि भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे आणि केंद्रातील सत्ता हस्तगत करण्याचे मनसुबे जाहीर करण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. परंतु एक समर्थ राजकीय शक्ती म्हणून आजवर तिसरी आघाडी कधीच उभा राहू शकलेली नाही. आताही पंधराव्या लोकसभेसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यात आली आहे. प्रत्यक्षात निवडणुका होऊन निकाल जाहीर होईपर्यंत दोन महिन्यांचा कालावधी जायचा आहे. या काळात अनेक स्थित्यंतरे घडू शकतात. आता असलेल्या आघाडीमध्ये चार साम्यवादी पक्ष आणि तेलगू देसम, तेलंगणा राष्ट्रीय समिती, धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भजनलाल यांचा हरियाना जनहित पार्टी या पक्षांचा समावेश आहे. मायावती यांचा बहुजन समाज पार्टी आणि जयललिता यांचा अण्णाद्रमुक पक्ष आघाडीत सामील झालेले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी आघाडी स्थापनेच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.ते पुढेमागे आघाडीचे घटक बनतील किंवा आघाडीबरोबर असतील, असे सांगितले जात आहे. भारतीय जनता पक्षाशी नुकतीच फारकत घेतलेला नवीन पटनाईक यांचा बिजू जनता दलही आघाडीचा घटक बनलेला नाही. त्यालाही आघाडीत आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. आघाडी बांधणाऱ्यांचा आवेश आणि जोर मोठा आहे. लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसेपर्यंतच्या काळात तो किती टिकतो आणि त्याला किती फाटे फुटतात हे दिसेलच. ही आघाडी फुगून वाढेल किंवा निवडणूक निकालानंतर प्रत्येक घटक आपल्या सोईनुसार नव्या सोयरिकीच्या तजविजीत गढून जाईल. आघाडीत सध्या सामील झालेल्या पक्षाचे विशिष्ट राज्यांपलीकडे मुळीच प्रभाव नाही. आघाडी आकाराला आणण्यासाठी सातत्याने खटाटोप करणाऱ्या प्रकाश कारत यांच्या मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ राज्यातच मार्क्‍सवाद्यांच्या आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. दोन राज्यांपलीकडे देशात मार्क्‍सवाद्यांचे तसे प्रभावक्षेत्र नाही. चंद्राबाबू नायडू, देवेगौडा यांचा देशावर करिष्मा नाही. अन्य पक्षाचे अस्तित्वही विशिष्ट भौगोलिक प्रदेशापलीकडे जात नाही. अशा मर्यादित प्रभाव असलेल्या पक्षाची आघाडी कॉंग्रेस आणि भाजपला पर्याय देण्यास मुळातच किती समर्थ आहे, हा प्रश्‍न आहे.

जयललिता आणि मायावती या पक्षाची जोड आघाडीला मिळण्याची शक्‍यता आहे किंवा तसे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात असले,तरी अम्माचे राजकारण व्यक्तिहितकेंद्री आहे. आपल्या सोयीनुसार त्यांच्या राजकीय चाली ठरतात. आघाडीत सामील झाल्या किंवा सोबत राहिल्या तरी, ती सोबत शेवटपर्यंत त्या पाळतील याची खात्री त्यांची आजवरची राजकीय वाटचाल पाहता कुणीही देऊ शकणार नाही. मायावती या अतिशय महत्त्वाकांक्षी राजकारणी असून त्यांचा "सोशल इंजिनिअरिंग' चा फॉर्मुला यशस्वी झाल्यापासून त्या भलत्याच फॉर्ममध्ये आहेत. त्यांनी आपली आकांक्षा आणि राजकीय वाटचालीची दिशा मुळीच लपवून ठेवलेली नाही. आताच्या निवडणुकीसंदर्भातही त्यांचे धोरण त्यांनी आधीच ठरवून टाकले आहे. त्याला मुरड घालून त्या आघाडीला अनुसरीत मार्गक्रमण करण्याची शक्‍यता नाही. त्यांच्या कलानुसार घेतले तर त्या आघाडीसोबत राहतील. आपल्या महत्त्वाकांक्षेत सहायक होईल तोवरच ही सोबत त्यांना उपयुक्त ठरणार असल्याने उपयुक्तता संपल्याचे दिसू लागल्यावर त्या आपल्या मार्गाने पुढे जातील हे सांगण्यासाठी फार डोकेफोड करायची गरज नाही. बिजू जनता दलाचा कल अजून स्पष्ट झालेला नाही. ज्या पद्धतीने नवीन पटनाईक यांनी भाजपला दूर केले , ते पाहता त्यांनीही काही गणिते पक्की केल्याचे स्पष्ट आहे. त्या गणितानुसार निवडणुकोत्तर परिस्थितीच्या कलानुसार प्रसंगी भाजपशी जवळीक साधता येईल अशा धोरणीपणानेच ते आपल्या पुढच्या चाली खेळणार आहेत.कॉंग्रेस आणि भाजपला काही प्रमाणात शह देण्याची ज्यांच्यात काही ताकद आहेत, असे हे पक्ष तिसऱ्या आघाडीच्या पर्यायांबाबत सावधगिरी आणि काहीशी गूढता दर्शवीत असल्याने त्यांच्यावाचून तिसरी आघाडी मोठे मैदान मारू शकणार नाही.

कॉंग्रेस आणि भाजप देशातील प्रमुख पक्ष असले, तरी स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे त्यांचेही सामर्थ्य राहिलेले नाही. कॉंग्रेसने पूर्वपुण्याईच्या बळावर बहुतेक काळ देशावर राज्य केले.काही झाले तरी सत्ता मिळते या तोऱ्यापायी प्रादेशिक अस्मिता आणि आकांक्षाची आवश्‍यक गांभीर्याने दखल घेण्याचे भान कॉंग्रेसला राहिले नाही. त्यानुसार सर्व स्तरांवर सर्वसमावेशक धोरण निश्‍चित करण्यात, सर्व अस्मिता - आकांक्षांना न्याय देतो आहोत, अशा विश्‍वास देण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली. परिणामी तिचा पाया आक्रसून गेला आहे. प्रादेशिक पक्षाच्या आधाराविना सत्ता मिळविणे आणि राखणे तिला कठीण झाले आहे. भाजपची स्थिती तर त्याहून बिकट झाली आहे. यावेळी बिजू जनता दलासारख्या भरवशाच्या साथीदारानेही संबंध तोडल्याने त्याची स्थिती केविलवाणी झाली आहे.एका निरीक्षणानुसार लोकसभेच्या एकूण 545 पैकी 175 जागांवर भाजपचा उमेदवारच रिंगणात नसेल,अशी स्थिती आहे. या दोन्ही पक्षांची स्थिती दुबळेपणाची आणि देशव्यापीत्व प्रश्‍नांकित झाल्याने पर्यायाचा विचार मूळ धरतो आहे. परंतु, तिसऱ्या आघाडीसारख्या प्रयोगातून तसा समर्थ पर्याय उभा राहणार नाही. एक तर निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या या खटाटोपामागे काही दीर्घकालीन धोरणाचा, देशासंबंधी सर्वंकष विचाराचा अभाव आहे. आघाडीत असलेल्या घटकांची पक्षनिहाय विचारधारा आणि धोरणे भिन्न आहेत. देशाला समर्थ राजकीय पर्याय देण्याची भाषा असली,तरी कुणाला कुणाचे तरी उट्टे काढायचे आहे, असेही दिसते. सर्व खटाटोपाच्या मुळाशी असा देशाच्या दृष्टीने विधायक नसलेला अंतस्थ हेतू नांदत असतो. एकत्र आलेल्या घटकांमध्ये विचार, कार्यक्रम, नेतृत्व याबाबत एकजिनसीपणा दिसत नाही. त्यांच्या हाती सत्ता सोपवली तरी ते ती पूर्ण कार्यकाल राबवू शकतील यासंबंधी भरवसा जनतेमध्ये नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे विशिष्ट प्रदेशापलीकडे या सर्वांचे किंवा त्यांच्या पक्षाचे म्हणून काही प्रभावक्षेत्र नाही. त्यामुळे कितीही बोलबाला झाला आणि कितीही गाजावाजा केला, तरी संघटित, एकसंध असा समर्थ पर्याय तिसरी आघाडी देऊ शकणार नाही.

No comments: