Wednesday, March 4, 2009

लाहोरचा इशारा

लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट खेळाडूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून तेथील दहशतवाद निपटून काढण्यास पाकिस्तान सरकार असमर्थ असल्याचेच उघड झाले आहे. दहशतवादी मनमानेल तसा उच्छाद पाकिस्तानात माजवू शकतात आणि सहीसलामत निसटून जाऊ शकतात, हेही या घटनेने स्पष्ट झाले आहे.पाकिस्तानच्या भूमीत जोमाने वाढणाऱ्या दहशतवादापासून जगाला असलेल्या धोक्‍याचे गांभीर्यही अधिक ठळक झाले आहे.

खरे तर श्रीलंकेचा क्रिकेट दौरा नियोजित नव्हता. भारतीय संघाचा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानचा क्रिकेट दौरा व्हायचा होता. मुंबईत नोव्हेंबरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दौरा रद्द केला. ती जागा भरून काढण्यासाठी आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाला संभाव्य नुकसानीतून वाचविण्यासाठी श्रीलंकेने सद्‌भावनेने दोन टप्प्यात या दौऱ्याला मान्यता दिली. पाकिस्तानातील सुरक्षाविषयक स्थितीबद्दल शंका असल्याने गेल्या वर्षात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिजनेही आपले नियोजित दौरे रद्द केले होते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. ही सर्व पार्श्‍वभूमी माहीत असताना दोन्ही देशातील संबंधाचा विचार करून हा दौरा ठरविण्यात आला. त्याची भारी किंमत श्रीलंकेच्या खेळाडूंना मोजावी लागली आहे. शारीरिक जखमा काही काळाने भरून येतील, परंतु त्यांच्या मनाला झालेल्या घावांतून सावरायला त्यांना निश्‍चितच खूप काळ जावा लागेल. भीतीचे सावट मनावर पसरून राहिले तर अन्यत्र खेळतानासुद्धा त्यांच्या खेळावर परिमाण जाणवू शकेल.

लाहोरमधील घटनेने पाकिस्तानच्या क्रिकेटचे खूप नुकसान केले आहे. दोन वर्षांनंतर होणारी विश्‍वचषक स्पर्धा भारत, श्रीलंका, बांगला देश आणि पाकिस्तान यांनी संयुक्तपणे आयोजित करायची होती. चारपैकी भारत वगळता अन्य तिन्ही देशातील स्थिती सुरक्षिततेच्या बाबतीत अनिश्‍चिततेची आहे. लाहोरमधील घटनेने पाकिस्तानने क्रिकेटविश्‍वाचा भरवसा पूर्णतः गमावला आहे. साहजिकच आयोजनातून त्याला वगळले जाईल. पुढेही कुणी देश पाकिस्तानात क्रिकेट खेळण्यासाठी आपले संघ पाठविण्याची शक्‍यता राहिलेली नाही.

क्रिकेट किंवा कुठलाही खेळ हा दोन मने, दोन समाज, दोन देश जोडणारा दुवा आहे. पाकिस्तानातही क्रिकेट हा खेळ लोकांना अतिशय प्रिय आहे. तिथे क्रिकेटपटूंवर हल्ला करून दहशतवाद्यांनी माणसे आणि मने जोडणाऱ्या दुव्यावरच घाव घातला आहे. या घटनेच्या परिणामी तिथे क्रिकेट खेळणे बंद झाले,तर त्यातून समाजाचे मोठे नुकसान होणार आहे.श्रीलंकेच्या खेळाडूंना अभेद्य सुरक्षा पुरवू न शकल्याने पाकिस्तानची देश म्हणून प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे.त्याचेही नुकसान या देशाला भावी काळात सोसावे लागणार आहे.

दहशतवाद पोसण्याचा खेळ पाकिस्तानच्या जिवावर बेतला आहे. दहशतवाद्यांनी संपूर्ण देशात जाळे पसरले आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने स्वातमध्ये तालिबानशी करार करून तेथे शरीयत कायदा लागू करण्यास मान्यता दिली होती. त्याच्या दोन दिवस आधी, तालिबान कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर कब्जा करू शकेल, अशी अगतिकता पाकिस्तानचे अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी व्यक्त केली होती. तालिबान कोणत्याही क्षणी कराचीचा ताबा घेऊ शकतील, असा पोलिसांचा अहवाल असल्याचे तीन चार दिवसांपूर्वी जाहीर झाले आहे. पाकिस्तानचा थोडा थोडा भाग कब्जात करीत सगळा देश आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचा तालिबानचा बेत असेल किंवा त्यांची अन्य काही योजना असेल, त्याला रोखण्याचे सामर्थ्य पाकिस्तानच्या नागरी सरकारमध्ये नाही, हे प्रत्येक घटनेनंतर अधिकच ठळक होत चालले आहे.तालिबान आणि दहशतवाद्यांच्या फासात अडकून पाकिस्तान स्वतःच जर्जर झालेला आहे. जेवढे जमेल तेवढा काळ स्वतःला वाचविण्यासाठी या जर्जरतेचा पाकिस्तान सरकारने आश्रय केल्यासारखे दिसते आहे.आपल्या भूमीत पोसल्या जाणाऱ्या दहशतवादापासून भारतासह जगाला असलेला धोका दूर करण्यासाठी पाकिस्तान प्रभावी आणि परिणामकारक कारवाई करू शकेल, ही शक्‍यता गृहीत धरणेच आता धोकादायक आहे.लाहोरच्या घटनेचा हाच इशारा आहे.

No comments: