Tuesday, February 17, 2009

हिंसकतेची होळी करा

व्हॅलेंटाईन डेला विशेष उपद्रवकारक घटना घडल्या नाहीत. काही ठिकाणच्या तुरळक घटना वगळता हा दिवस बऱ्यापैकी "प्रेमपूर्वक' साजरा केला गेला. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध करणाऱ्या घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने संस्कृतीच्या नावाखाली उपद्रव आणि हिंसाचार माजवण्याच्या योजनांना लगाम बसला. कर्नाटकातील राम सेनेला गुलाबी चड्ड्या भेट पाठविण्याच्या महिलांच्या अहिंसक निषेध मोहिमेचाही परिणाम झाला. 14 फेब्रुवारी उलटून गेल्यावर आता या चड्ड्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न राम सेनेसमोर आहे. चड्ड्या पाठविणाऱ्यांना परतीची भेट म्हणून साड्या पाठविण्याचे आधी ठरले होते. ते बहुतेक बारगळले आहे. या चड्ड्या अनाथाश्रमात पाठवायचा विचार झाला. त्यानंतर ज्या मुलींना त्या पाठविल्या त्यांच्या पालकांकडे त्या पाठवायच्या ठरले. नंतर त्यांचा जाहीर लिलाव पुकारायचा विचार पुढे आला. आता सरते शेवटी त्यांची होळी करायचे निश्‍चित झाले आहे. ते प्रत्यक्षात आल्यावर चड्ड्यांचा विषय संपून जाईल. परंतु संस्कृतिरक्षणाच्या आणि त्यानिमित्ताने नवीन पिढीला आपली भारतीय संस्कृती शिकविण्याच्या राम सेनेच्या आततायी प्रयत्नांमध्ये एका कोवळ्या जिवाची होळी झाली, त्याचे काय?

बंगळूरमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीला दुसऱ्या धर्मातील मुलांबरोबर एकत्र पाहून संस्कृतिरक्षकांनी अवमानित केले. त्या मुलाला मारहाणही केली. अवमान जिव्हारी लागल्याने मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली.त्या मृत्यूची जबाबदारी कुणीच घेणार नाही. तिच्या वडिलांनीही संस्कृतिरक्षकांच्या धाकदपटशामुळे मुलीने आत्महत्या केली नसल्याचे सांगितले आहे. त्यांना वाटले ,तरी दुसरे काही सांगता येणार नाही. मरणारा मरून गेला, जगणाऱ्याला मागे राहिलेल्या दहशतीचा मुकाबला करणे भाग असल्याने, तेवढे धाडस आणायचे कोठून असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला असेल. त्यात त्यांनी मात स्वीकारली, असे सहज अनुमान काढता येते.वडिलांनी अशी कबुली दिल्यामुळे ज्यांनी गुंडगिरी केली, ते आपसूकच मोकळे राहिले. त्यांच्या संवेदना थोड्याशाही जाग्या असतील, तर त्यांनी अशा तऱ्हेने संस्कृतीचे रक्षण करता येते का, असा प्रश्‍न स्वतःलाच विचारून पाहावा.

भारताने अनेक परकीय आक्रमणे पचविली. आक्रमकांच्या संस्कृतीही पचविल्या. भारताने दुसऱ्यावर आक्रमण केल्याचे, आपली संस्कृती दुसऱ्यावर लादण्याचे प्रयत्न केल्याचे उदाहरण नाही. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेल्या आपल्या देशात दुसऱ्यावर संस्कृतीच्या नावाखाली आपले विचार लादण्याचा अट्टहास का केला जातो आहे? दुसऱ्याच्या अभिव्यक्तीचा बळाचा वापर करून संकोच करण्याची ही कुठली संस्कृती आहे ? मंगळूरमधील किंवा अन्य कुठल्याही संस्कृतिरक्षकांना दुसऱ्यांना काही संस्कृती शिकवायची असेल,तर तिची पद्धत मुळात सुसंस्कृतपणाची हवी. बळजबरी,मारहाण करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय? म्हटल्याबरोबर दुसऱ्यानेही तसेच वागले पाहिजे, हा हट्टाग्रह का ? ही असहिष्णुता का ? सहिष्णुता आणि संयम हाही आपल्या संस्कृतीचा विशेष आहे. त्या सर्वांना हरताळ फासून कुठल्या संस्कृतीचा पुरस्कार केला जात आहे ? दुसऱ्यांनी संस्कृती पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी आपल्या पायाकडे आधी पाहावे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या मार्गाने संस्कृती शिकविता येणार नाही. ज्यांना ती शिकवायची, सांगायची आहे. त्यांची मने,विचार, भावना आधी समजून घेतल्या पाहिजेत.त्यांची संवेदनशीलता जपली पाहिजे. एखाद्याचे प्राण जाण्यासारखी स्थिती निर्माण करून संस्कृती जपता येणार नाही. संस्कृती जपण्यासाठी आधी माणसे जपली पाहिजेत,जगवली पाहिजेत. या संस्कृतिरक्षकांनी त्यासाठी गुलाबी चड्ड्यांबरोबर स्वतःमधील आततायीपणाची, अरेरावीपणाची आणि हिंसकपणाची होळी करावी.

No comments: