Friday, February 6, 2009

बहुजन संघटनाचे स्वप्न

गेल्या रविवारी पर्वरी (गोवा) येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या गोवा शाखेतर्फे समता परिषद कार्यकर्त्यांचा मेळावा भरविण्यात आला.बहुजन समाजाची लोकसंख्या अधिक असूनही तो मागे का पडला, याविषयीचे विवेचन काही वक्‍त्यांनी केले. स्वाभाविकपणे उच्चवर्णीयांनी शोषणाच्या व्यवस्था कशा निर्माण केल्या आणि त्या कशा राबविल्या, शतकानुशतके बहुसंख्येने असलेल्या अठरा पगड जातीजमातीचा बनलेल्या बहुजन समाजाचे कसे दमन करण्यात आले, याविषयी, विशेषतः हरी नरके पोटतिडिकेने बोलले. बहुजन समाज संघटित होण्याची गरज का आणि कशासाठी आहे, यावरही त्यांच्या विवेचनात भर होता. या मेळाव्यात मांडले गेलेले अनेक मुद्दे नवे नाहीत. ते सतत मांडले जातात.ते पटवून देण्याचा प्रयत्न होतो. पण बहुजन समाजाच्या ते अजूनही गळी उतरत नाही.त्याची प्रत्यक्षात तामिली होत नाही.बहुजन समाज संघटित होत नाही आणि काही शतकापूर्वीसारखी दमनकारी परिस्थिती आज नसली, स्वातंत्र्याचे मुक्त वारे सर्वत्र पसरलेले असले, तरीही राजकीय, आर्थिक सत्ता या अल्पसंख्येने असलेल्या उच्चवर्णीयांकडेच आहेत. तिथे बहुजन समाजाची अधिसत्ता यायला अजून काही वर्षे आणि काही पिढ्या जाव्या लागतील. केवळ परिषदांतून आणि मेळाव्यातून उद्‌घोष करून ते साध्य होणार नाही. उद्‌घोषात असलेले कृतीच्या वेळी प्रत्यक्षात अवतरेल, असे आश्‍वासक वातावरण मेळाव्यातून निर्माण होत नाही, तशी ग्वाही त्यातून मिळत नाही. त्यामुळे उद्‌घोषाचा प्रभाव आणि परिणाम काही मर्यादेच्या पलीकडे जात नाही.

पर्वरीत मेळावा आयोजित करण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी एक कार्यकर्ते उल्हास नाईक यांचाही आयोजनात मोठा वाटा होता. ही सर्वच माणसे बहुजन समाजातील आहेत. हळर्णकर आधी कॉंग्रेसमध्ये होते. थिवी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. मेळाव्याला उपस्थित असलेल्यांपैकी बरेचजण या पक्षांचे कार्यकर्ते होते. मेळावा नेमका कुठे होणार याविषयी नीट माहिती प्रसिद्ध झाली नव्हती. प्रत्यक्षात मेळावा एक तास उशिरा सुरू झाला. सुरवातीला पूर्ण भरलेले संत गाडगे महाराज सभागृह साडेसात वाजल्यानंतर ओस पडत गेले. नरके यांचे भाषण शेवटच्या टप्प्यात आले असताना मागच्या रांगेत चाललेल्या कुजबुजीने गोंगाटाचे रूप धारण केले होते आणि एक जण "कधी संपणार हे' म्हणून वैतागून बोलत होता. या गोष्टींचा उल्लेख आयोजनात त्रुटी होत्या हे सांगण्यासाठी करीत नाही. आयोजन विशिष्ट हेतूबद्‌द्‌लच्या तळमळीने झाले होते. या बाबींचा उल्लेख प्रतिसादाची प्रत ठरविण्यासाठी करीत आहे. त्या वैतागलेल्या माणसाचे उद्‌गार ऐकल्यावर तो आणि त्यांच्यासारखी अन्य काही माणसे तिथे असण्याची शक्‍यता गृहीत धरली, तर ही माणसे मेळाव्यात होणारे प्रबोधन ऐकण्यासाठी आली होती, की आपल्या राजकीय नेत्यांनी सांगितले म्हणून गर्दी दाखविण्यासाठी जमली होती, असा प्रश्‍न पडतो. दुसरे, जे लोक कार्यक्रम पूर्ण संपेपर्यंत थांबू शकत नाहीत, ते खरोखर संघटित होऊ शकतील का ? ज्या तऱ्हेचे संघटन समता परिषदेला किंवा सामाजिक न्यायाची भूमिका मांडणाऱ्या, समता-बंधुतेचा उद्‌घोष करणाऱ्या विचारवंतांना आणि नेत्यांना अभिप्रेत आहे, ते होण्यास निकराच्या प्रयत्नांची गरज आहे, आणि त्याला खूप अवधीही लागू शकतो, तोवर चालण्याची क्षमता आणि थांबण्याचा संयम या लोकांमध्ये आहे का ?

बहुजनांच्या संघटनातून बहुजनांच्या कल्याणाचे ध्येय गाठायचा समतेच्या पुरस्कर्त्यांचा उद्देश आहे. त्यासाठी अनेक गोष्टीबरोबर राजकीय सत्तेवर बहुजनांची पक्की पकड होणे आवश्‍यक आहे. अनेक कल्याणकारी कार्यक्रमांचे, उन्नती- विकासाचे महामार्ग राजकीय सत्तेच्या प्रवेशद्वारातून प्रशस्त होत जातात. आताच्या युगाची ती खूणच आहे. परिवर्तनासाठी ओबामाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणे हा त्याचा दाखला आहे. बहुजनांच्या संघटनामागे आणि त्याद्वारे गाठायच्या ध्येयामागे राजकीय सत्ता, अधिकार बहुजनांच्या हाती येणे, राहणे हे पहिले अटळ पाऊल ठरते. ते प्रत्यक्षात अवतरण्यात व्यक्तीच्या राजकीय आकांक्षाच अडथळा म्हणून उभ्या ठाकल्या तर त्यातून मार्ग कसा काढला जाईल, हा प्रश्‍नही मेळावा बघितल्यावर ठळक झाला.

राजकीय सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेतून जावे लागते. मेळाव्याची धुरा वाहणारे नेते राजकीय क्षेत्रातील होते. उद्या जेव्हा निवडणुकीचा प्रसंग येईल, तेव्हा या राजकीय नेत्यांची भूमिका काय असेल ? सुभाष शिरोडकर बहुजन समाजातले आहेत म्हणून दुसरा बहुजन समाजातील कुणी त्यांच्याविरोधात उभा राहणार नाही का ? हळर्णकरचा पाडाव करण्यासाठी कॉंग्रेसमधली कुणी बहुजन समाजातील व्यक्ती दंड थोपटणार नाही का ? त्यावेळी हे नेते प्रतिस्पर्धी बहुजन समाजातला आहे, आपसांत लढणे नको म्हणून माघार घेतील का? प्रतिस्पर्ध्याला विजयी होण्यासाठी मदत करतील का ? किंवा प्रतिस्पर्धी या जुन्याजाणत्या नेत्यांना पाठिंबा देतील ? या प्रश्‍नांची प्रथमदर्शनी उत्तरे नाही अशीच येतील. निवडणुकांत बहुजन समाजाचे कार्ड आपली मते वाढविण्यासाठी, दुसऱ्याची आपल्याकडे वळविण्यासाठी वापरले जाते. त्यावेळी संघटनाचा उद्‌घोष सोईस्कर विसरला जातो. जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी बहुजन समाजातील असला तरी त्याची उणीदुणी काढून आपण कसे उजवे आहोत हे मतदारांवर ठसविण्याचा प्रयत्न केला जातो.बहुजनांच्या संघटनापेक्षा पक्ष, पक्षशिस्त हे परवलीचे शब्द बनतात. त्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बहुजनच बहुजनांवर आघात करायलाही कचरत नाही. बहुजन समाजाच्या संघटनाचे तीनतेरा वाजतात. हे वास्तव कसे बदलणार ? त्यावर उपाय काय, हे जोवर सांगितले जाणार नाही, तोवर बहुजनांचे संघटन व्यापक स्तरावर कधीच साकारणार नाही.

No comments: