Monday, February 9, 2009

सकारात्मक संमेलन

माशेलच्या देवभूमीत गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सत्ताविसावे गोमंतक मराठी साहित्य संमेलन सात आणि आठ फेब्रुवारी असे दोन दिवस अतिशय उत्साहाने आणि आशयसंपन्नतेने पार पडले.

पोर्तुगीजांची सत्ता असताना बाटाबाटीच्या काळात वेगवेगळ्या भागातील लोकांनी आपले देव वाचविण्यासाठी माशेलची वाट धरली होती. त्यामुळे तिसवाडी,बार्देश तालुक्‍यातील अनेक दैवतांची मंदिरे या गावात उभी आहेत. प्रख्यात साहित्यिक, पत्रकार बा. द. सातोस्कर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचे हे जन्मगाव. सातोस्करांचे हे जन्मशताब्दी वर्ष.अशा विविध योगायोगांच्या संगमावर साहित्य संमेलन पार पडले. रेखीव नियोजनाला निरलस आणि निरपेक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाची जोड लाभल्याने दीर्घ काळ आठवणीत राहील,असे हे संमेलन देखणपणाने यशस्वी झाले.

संमेलन उभे करण्यासाठी माशेलच्या साहित्य सहवास या आयोजक संस्थेला आणि तिथल्या साहित्यप्रेमींना अवधी तुलनेने कमी मिळाला होता. डिसेंबर 2008 च्या प्रारंभी कार्याला सुरवात झाली.आयोजनासंदर्भातील अनेक सोपस्कार, नियम पाळून सहभागासाठी अपेक्षित व्यक्ती मिळविण्यापर्यंत सगळा घाट जमवून आणणे तसे कठीण होते. अनेक व्यवधाने होती. परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदे ही प्रातिनिधिक मानून सर्वांशी मिळून मिसळून काम केले. परस्पर सुसंवादाने किती चांगले आयोजन करता येते,याचा उत्तम अनुभव या संमेलनाने दिला.तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची मोठी मदत यावेळी झाली. वेळेसारख्या आपले नियंत्रण न चालणाऱ्या घटकावर मात करून अनेक बाबी त्यामुळेच मार्गी लावता आल्या.

हे संमेलन सकारात्मक होते. मराठी भाषा गोव्याची राजभाषा व्हावी, ही गोंतकीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.प्रत्येक संमेलनात या विषयाचे पडसाद उमटतात.त्यात भरही गतकालीन गोष्टींवर असतो. त्याचे चर्वितचर्वण आणि त्याच्या ओघात उणीदुणी काढण्याचे प्रकार होतात. प्रश्‍न सोडवायचा कसा, याचे उत्तर काही मिळत नाही. यावेळी कार्यक्रम ठरवितानाच मागच्या बाबी न उकरता भविष्यात काय करायचे, याचा कृती कार्यक्रम ठरविता येईल, असे विचारमंथन, चर्चा व्हावी असा संदेश आधीच प्रसृत केला होता."वाङ्‌मयीन पुरस्कार ः समज - गैरसमज' या साहित्यविषयक परिसंवादात देखील गोमंतकीय मराठी साहित्याची खोली, त्याची गुणवत्ता,कस यांवर भर देण्याचे वक्‍त्यांना सुचविण्यात आले होते. गोमंतकात खूप दर्जेदार साहित्य निर्माण झाले आहे, होत आहे. मात्र त्याची पुरेशी गंभीर दखल एकूण साहित्यविश्‍वात घेतली जात नाही. त्याकडे लक्ष वेधले जावे आणि त्यासाठी काय करता येईल याचे दिशादिग्दर्शन व्हावे, असे उद्देश त्यामागे होते. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवकथनाचा "वेगळ्या वाटेने जाताना" कार्यक्रम होता. पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी) अंटार्क्‍टिकावरचे जग (डॉ. देवयानी बोरुले) पर्यावरणीय चळवळ (राजेंद्र केरकर) संगीत साधना (सुमेधा देसाई) अशा विविध अनुभवविश्‍वांचे प्रत्ययकारी दर्शन वक्‍त्यांनी घडविले. श्रोत्यांनी त्याची खूपच वाखाणणी केली.पहिल्या दिवशीचा तो सर्वात यशस्वी कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी विविध महाविद्यालयांतील चिन्मय घैसास, कौस्तुभ नाईक, केदार तोटेकर, वैष्णवी हेगडे, तृप्ती केरकर या विद्यार्थ्यांशी संगीता अभ्यंकर आणि रवींद्र पवार यांनी मुक्त संवाद साधला. आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेने या विद्यार्थ्यांनी सर्वांनाच थक्क करून सोडले. त्यांचा अभिव्यक्तीतला धीटपणा सलाम करावा असा होता. विविध विषयांवरील त्यांची मते,विचार अंतर्मुख करणारे होते. एखाद्या संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर विद्यार्थ्यांना स्थान देण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. तो कमालीचा यशस्वी झाला. सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. या संमेलनाची ही सर्वांत मोठी उपलब्धी किंवा फलश्रुती होय.

हे संमेलन क्रियाशील होते. गोमंतकातील मराठी भाषा आणि साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी, ती व्यापक आणि बळकट करण्यासाठी कृती कार्यक्रम या संमेलनातून मिळावा,असा विचार माशेलकर मंडळीचा सुरवातीपासून होता. नियोजनात त्याच्या खुणा दिसतात. कृती कार्यक्रम सिद्ध करण्यास संमेलनाने बरीच सामग्री दिली आहे. त्याची आखणी व्हायला अजून काही अवधी जाणार आहे. कृती कार्यक्रमासंबंधी त्यांची तळमळ इतकी खोल आणि सचोटीची आहे, की दुसऱ्या बाजूने त्यांनी कृतीचा आरंभ करून टाकलेला आहे. संमेलन सुरू व्हायच्या दोन दिवस आधी मराठीच्या विषयावर जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आल्या. त्यात कोपरा सभा झाल्या. काणकोण आणि पेडणे या गोव्याच्या दोन टोकांकडून सुरू झालेल्या या जनजागृती यात्रांमध्ये स्थानिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मराठी गोमंतकीयांच्या मनीमानसी अढळ असल्याची ग्वाही दिली.

नवीन पिढीविषयी प्रतिकूल टिपणी करायचीही प्रथा पडून गेली आहे. ही पिढी काही वाचत नसल्यापासून ती वाह्यात झाली आहे,इथपर्यंत अनेक प्रकारची शेरेबाजी चाललेली असते. ती खरे तर नव्या पिढीवर अन्यायकारक असते. नव्या पिढीला समजून न घेता किंवा तिला आपली बाजू मांडण्याची संधी न देता, अभिव्यक्तीचे माध्यम उपलब्ध करून न देता तिच्याविषयी काही मते बनवायची आणि प्रसंग असो वा नसो, तिच्याविषयी प्रतिकूल बोलत राहायचे,असे घडताना दिसते. संमेलनाने या तरुणाईला पेश केले. त्या तरुणांनी आपण काय आहोत याची दणदणीत चुणूक दाखवून दिली. youths are useless असे म्हटले जाते, खरे तर youths are used less असे आपल्या बाबतीत घडते असे सांगून त्यांनी आपल्या टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.नेतृत्वाची, एखाद्या कार्याची धुरा वाहण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, अशी मानभावी आवाहने कधी कधी केली जातात. प्रत्यक्षात त्यांना कधी संधी दिली जात नाही. या संमेलनाने ती संधी तरुणांना देऊन एका कृतीची सुरवात केली आहे. चर्चा आणि कृती या दोन्ही अंगांनी म्हणूनच हे संमेलन एक आशय देणारे, एक अवकाश दाखवणारे ठरले आहे.

No comments: