Friday, February 13, 2009

पाकिस्तानची कबुलीं

मुंबईत झालेल्या हल्ल्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध सातत्याने नाकारणाऱ्या पाकिस्तानने अखेर हल्ल्याच्या अर्ध्याअधिक कटाची आखणी आपल्या भूमीत झाल्याची कबुली गुरुवारी दिली. भारताने दिलेल्या पुराव्याची ती केवळ "माहिती' असल्याची संभावना करण्यापासून कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचेच अमान्य करण्यापर्यंत आणि देशाबाहेरील घटकांचेच ते कृत्य असल्याचा मानभावीपणा करण्यापर्यंत भूमिका घेत, शब्दांचे खेळ करीत आपण नामानिराळे राहण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न पाकिस्तानने मुंबईवरील हल्ल्यानंतरच्या गेल्या जवळपास ऐशी दिवसात केले.भारताने दिलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने स्वतंत्र चौकशी करण्याचे नाटक वठवून साऱ्या प्रकारातून हात झटकण्याचे प्रयत्न केले. रोज वेगवेगळ्या उपपत्ती मांडून, कधी काश्‍मीर प्रश्‍नाची सरमिसळ करून आपल्यावरील रोख दुसरीकडे वळविण्याचे प्रयोगही केले.आपणही दहशतवादाचे बळी असल्याचे भासवीत आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याबरोबर त्याच्याच भूमीतून प्रसवणाऱ्या दहशतवादाची गेली काही वर्षे खरोखर झळ सोसणाऱ्या भारताच्या जोडीला स्वतःला बसविण्याचा डाव खेळत दहशतवादविरोधी लढ्यात आपला सहभाग प्रामाणिकपणाचा असल्याचे ठसविण्याचा खेळही त्याने करून पाहिला. जग त्याच्या या कांगाव्याला फसले नाही. भारताने आणि अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या गुप्तचर संस्थेने मुंबईतील हल्ल्यासंदर्भात दिलेले सबळ पुरावे,भारताने आपल्या मुत्सद्देगिरीने जगभरातून कारवाईसाठी आणलेला दबाव आणि अमेरिकेचा थेट दबाव यामुळे पाकिस्तानला कटातील सहभागाची कबुली देणे भाग पडले आहे. जे पाकिस्तान अजिबात मान्यच करायला तयार नव्हता, त्याची किमान काही कबुली त्याने दिली ही पुढे काही कारवाई केली जाण्यासंदर्भात पडलेले पहिले सकारात्मक पाऊल आहे. भारत आणि अमेरिकेने त्याचे तेवढ्या मर्यादेत स्वागत केले, हे योग्यच होय.

पाकिस्तानने कटाचा काही भाग आपल्या भूमीत शिजल्याचे मान्य करताना नेहमीसारखी काही चलाखीही केली आहे. हल्ल्यासाठी खुद्द अमेरिकेसह पाच देशातील यंत्रणांचा वापर केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतासाठी त्याने तीस मुद्‌द्‌यांवर प्रश्‍नावली तयार केली आहे. कटासंदर्भात तपास पूर्ण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी या प्रश्‍नांची उत्तरे त्याला आवश्‍यक वाटतात.दहशतवाद्यांना भारतात मोबाईलची सिम कार्डे कशी उपलब्ध झाली, गुजरातच्या किनारपट्टीत दहशतवाद्यांच्या बोटींना इंधन कुणी पुरविले, अशा काही प्रश्‍नांचा त्यात समावेश आहे. सगळेच प्रश्‍न असंबद्ध ठरविता येण्यासारखे नाहीत.मात्र, या प्रश्‍नासंदर्भात प्रतिसादावरून अजून पाकिस्तानला प्रत्यक्ष कृती करेपर्यंत बरेच कालहरण करणे शक्‍य आहे. हल्ल्यात सहभागी झालेल्या कसाबसह अन्य नऊ जणांविरुद्ध पाकिस्तानने खटले दाखल केले आहेत. कटासंदर्भात आठ जणांविरुद्ध पाकिस्तानने एफआयआर नोंदविले आहेत.त्यातल्या सहा जणांची नावे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी जाहीर केली आहेत. लष्करे तोयबाचे कमांडर झाकी- उर- रहमान लाखवी आणि झरार शाह हे हल्ल्याचे मास्टरमाईंड असल्याचे भारत आणि अमेरिकेने नमूद केले आहे.त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र एफआयआरमध्ये त्यांची नावे नमूद केलेली नाहीत. उलटपक्षी हमद अमीन सादिक हा हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे हल्ल्याच्या कटासंदर्भात कबुली देतानाही पाकिस्तानने हातचे राखून ठेवले आहे. त्याच्या कारवाईचा रोखही भारत आणि अमेरिकेने प्रमुख संशयित ठरविलेल्या व्यक्तींकडे नाही. अन्य कुणाला बळीचा बकरा बनवून हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा डाव पाकिस्तान खेळत नाही ना, याकडे आता अधिक सावधपणाने लक्ष पुरविण्याची गरज आहे. अर्थात,पाकिस्तानच्या कारवाईचे स्वागत करतानाही परराष्ट्र व्यवहारमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि नेटवर्क उद्‌ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नात कोणतीही कसूर ठेवणार नसल्याचे स्वच्छपणे सांगितले आहे. पाकिस्तानला तपास, माहितीची देवाणघेवाण, शंकानिरसन अशा सबबीखाली कालापव्यय करण्याची संधी न देता त्या प्रयत्नांची गती वाढवावी लागणार आहे.

No comments: