Sunday, February 15, 2009

विश्‍वास जागवणारा निवाडा

देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी बालहत्याकांडाप्रकरणी नोयड्यातील उद्योजक मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा घरगडी सुरिंदर कोली यांना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश रमा जैन यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षापूर्वी पंधेर यांच्या बंगल्याजवळील गटारात मानवी हाडे, कवट्या आणि अन्य मानवी अवशेष सापडल्यानंतर सुन्न करणारी भीषण हत्यामालिका उघडकीस आली होती. जवळच्या निठारी गावातील मुलांना फूस लावून पळवायचे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, बलात्कार करायचे,त्यांना ठार करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावायची, अशा अमानुष पद्धतीने सतत दोन वर्षे पंधेर यांच्या बंगल्यात मानवी हत्यासत्र सुरू होते.मुले आणि महिला अशा 19 जणांची हत्या करण्यात आली. त्याप्रकरणी गेली दोन वर्षे विशेष न्यायालयात खटले सुरू असून त्यातील रिम्पा हलदर या 14 वर्षीय मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.एकूण खटल्यांतील हा पहिला निकाल आहे.

या हत्याकांड प्रकरणात नोयडा पोलिसांचा एकूण कारभारच संशयास्पद आढळून आला होता. निठारीतील मुले बेपत्ता होण्याचे प्रकार दोन वर्षाहून अधिक काळ सुरू होते. पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता, उलटपक्षी तक्रारदारांना मिळणारी वागणूकही योग्य नव्हती.मुला-महिलांचे अवशेष गटारात आढळून आल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य उलगडले होते. पोलिसांकडून गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे घेतलेल्या सीबीआयने पंधेर यांना हलदर आणि अन्य दोन मृत्यूप्रकरणात क्‍लीन चीट दिली होती. आरोपपत्रात त्याच्यावर दोषारोप न ठेवण्याच्या आपल्या भूमिकेचे न्यायालयात समर्थनही केले होते. असे असूनही न्यायाधीशांनी पंधेर यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा म्हणजे सीबीआयच्या मुखात चपराक असल्याचे हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांतर्फे खटला चालविणारे वकील खलीद खान यांनी व्यक्त केली आहे.तर या देशातही गरिबांना न्याय मिळू शकतो, याबद्दलचा विश्‍वास दृढ करणारा हा निकाल असल्याची या कुटुंबीयांची प्रतिक्रिया आहे. पंधेर यांच्या मुलाने आपले वडील निर्दोष असल्याचे सांगताना प्रसारमाध्यमांनी गहजब केल्याने आणि न्यायप्रक्रिया प्रभावित केल्याने एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा झाल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयात निकालाविरुद्ध दाद मागण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. सीबीआयची याबाबतची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. अजून काही खटल्यांचे निकाल लागायचे आहेत. न्यायप्रक्रिया आपल्या मार्गाने पुढे सुरू राहणार आहे. जो निवाडा झाला आहे, तो न्यायसंस्थेवरचा विश्‍वास जागवणारा आहे, परंतु त्याचे महत्त्व त्याहीपलीकडचे आहे. कदाचित गुन्हेगारीसंबंधी खटल्यातील न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक ठरणारा हा निवाडा असेल.

रिम्पा हलदर हिच्या खुनाच्या वेळी पंधेर परदेशात होते,त्यामुळे त्याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला होता,अन्य दोन प्रकरणात पंधेर दूरच्या गावी असल्याचे आणि "कायदेशीरदृष्ट्या स्वीकारार्ह पुरावे" पंधेरविरुद्ध नसल्याचे म्हणणे सीबीआयने न्यायालयापुढे मांडले होते. वेगळ्या शब्दात "गुन्हेगारी कटात सहभागा'साठी ज्या स्वरूपाची सामग्री ग्राह्य मानली जाते ,तशी ती पंधेरविरुद्ध नव्हती, हा सीबीआयचा पवित्रा होता.गुन्ह्याच्या वेळी पंधेर परदेशात होते हे मान्य करूनही न्यायाधीशांनी गुन्ह्यातील सहभागाबद्दल पंधेर यांना दोषी धरले आहे.

सुरिंदर कोली हा मनोविकृत असल्याचे प्रारंभिक तपासाच्या वेळी सांगण्यात येत होते.त्याला मृतांशी कामक्रीडेची, मृताचे मांस खाण्याची विकृती असल्याचे सांगण्यात येत होते. जो भीषण हत्यासत्र घडले त्याला तोच सर्वस्वी जबाबदार असल्याचे चित्र सुरवातीला दाखवले गेले होते. मात्र, न्यायाधीशांनी अव्यक्त शब्द वाचले आणि त्याचे अर्थ उलगडले.त्यामुळे पंधेरला शिक्षा सुनावली जाऊ शकली.

आपले वडील निर्दोष आहे म्हणणाऱ्या पंधेरच्या मुलांने वडिलांच्या घरात चालणाऱ्या लैंगिक चाळ्यांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. स्वतः पंधेर यांनीही काही मुलींशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. कोली पंधेरकडे कामाला येण्यापूर्वी अनेकांकडे नोकरीला होता. तेव्हा त्यांने हत्या केल्याचे उघड झालेले नाही. जे हत्यासत्र घडले, ते पंधेरकडे आल्यानंतरच, 2004 ते 2006 या दोन वर्षात.त्याचा अजिबात सुगावा पंधेर यांना लागला नाही, हत्या केल्यानंतर घरातच पोलिथिन बॅगात भरून ठेवलेल्या मानवी अवयवाची दूरवरही पोचेल अशी दुर्गंधी पंधेर यांना कधीच जाणवली नाही, हे अविश्‍वसनीय आहे. पंधेर यांची जीवनशैली कोलीमधील "गुन्हेगारी प्रवृत्ती' जाग्या व प्रकट करण्यास कारणीभूत ठरली. पंधेरचे घरात चालणारे लैंगिक चाळे "लैंगिक सुखाला वंचित' असलेल्या कोलीला उत्तेजित करणारे ठरले आणि त्याचा आविष्कार विकृतपणे घडला.कोली याने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या जबानीच्या आधार घेत अशा आशयाच्या निरीक्षणातून न्यायाधीशांनी दोष निश्‍चिती केल्याचे जाणवते.पंधेर यांनी कट रचला आणि त्याच्या नोकराने तो प्रत्यक्षात आणला, असा निष्कर्ष मांडून न्यायाधीशांनी निवाडा केला आहे. एक प्रकारे गुन्ह्याचा शोध घेऊन निर्णय केला आहे. सीबीआय नेमक्‍या याच भूमिकेत चुकले आहे.

No comments: