Saturday, February 27, 2010

कौशल्य

जगणे आले तेव्हापासून जगण्याची लढाईही सुरू झाली. माणूस जितक्‍या अवस्थांतून उत्क्रांत होत गेला, त्या प्रत्येक अवस्थेच्या टप्प्यात जगण्याच्या लढाईचे स्वरूपही तसतसे बदलत गेले. आदीम अवस्थेतून आता माणसांचे सुसंस्कृत जग अवतरले आहे. लढण्याची आयुधे, साधने, माध्यमे या साऱ्यांतच परिवर्तन घडलेले आहे. सुधारलेल्या, पुढारलेल्या जगातही जगण्याचे संदर्भ सुसंस्कृत-असंस्कृत अंगाने सारखे कूस बदलत आहेत. चढाओढ, स्पर्धा नित्य नवे रूप धारण करीत आहे. त्यातून पुढे निघून जाण्यासाठीच नव्हे, आहे तेवढे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीही आपली साधने, माध्यमे तपासून घेणे आणि ती अद्ययावत ठेवणे अपरिहार्य आहे. ती हाताळण्याचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात करण्यापासून व्यतीत होणाऱ्या हरेक घटकेगणिक त्यांची धार, प्रखरता, गुणवत्ता वृद्धिंगत करीत राहणेही अपरिहार्य झाले आहे. अनेकदा असलेली कौशल्ये जुनी ठरतात, अपुरी पडतात. तेव्हा त्याच्या मिती वाढवाव्या लागतात किंवा नवी कौशल्ये संपादित करावी लागतात. ते नाही केले तर आपले अस्तित्वही बेदखल होऊन जाण्याचा किंवा नाकारले जाण्याचा धोका आहे. प्रवाहात टिकण्यासाठी, अग्रणी राहण्यासाठी किती कौशल्य असावे याचा काही ठोकताळा बांधावा लागतो. सरसकट अनुभवातून काही अंदाज ठेवून काही दक्ष माणसे त्या दृष्टीने तयारी करीत असतात. तरी अनेकदा फसगत होते. ती टाळण्यासाठी ज्या अनुभवांच्या आधारे आपण काही निष्कर्ष मांडतो, त्या अनुभवांचा दर्जा पडताळून पाहण्याबरोबरच, अनुभवाच्या पुढेही बुद्धीची नजरफेक करायला हवी.

एका जंगलात एका ठिकाणी एक हरीण लांब उडीचा सराव करीत होते. दहा फुटापर्यंत त्याची लांब उडी जात होती. त्याला अकरा फुटांचे लक्ष्य गाठायचे होते. काल वाघाच्या हल्ल्यात त्याच्या एका साथीदाराला जीव गमवावा लागला होता. वाघाने उडी मारून त्याचा मागचा पाय पकडून त्याला भक्ष्य केले होते. वाघाच्या उडीचे अंतर दहा फुटांचे होते. आणखी एक फूट लांबची उडी त्या हरणाला जमली असती, तर ते बचावले असते. या हरणाला जिवावरची ही जोखीम टाळायची होती. त्यासाठी जीव तोडून त्याचा सराव चालला होता.

त्याच जंगलात दुसऱ्या एका ठिकाणी एक वाघही लांब उडीचा सराव करीत होता. त्याचेही लक्ष्य अकरा फुटापर्यंत लांब उडी मारायचे होते. काल त्याने केलेल्या हल्ल्यात त्याला एक हरीण सापडले. त्याची उडी हरणाच्या मागच्या पायावर पडली. कसेबसे त्याला पंजात अडकवता आले. त्या हरणाची उडी अजून एका फुटाने लांब गेली असती तर काल वाघाला उपवास घडला असता. आपले भक्ष्य गाठण्यासाठी त्याला आपल्या उडीचा पल्ला एका फुटाने वाढवायचा होता. त्यासाठी त्याचाही कसोशीने सराव चालला होता.

जगण्याची लढाई, स्पर्धा प्रत्येक वेळी एका फुटाने कठीण होत असते. एक फुटाचा पल्ला वाढवून ती जिंकता येत नाही. त्यासाठी लक्ष्य दोन फुटांचे असायला हवे.

(प्रसिद्धी ःदै. गोमन्तक, 7 फेब्रुवारी 2010)

No comments: