Saturday, February 27, 2010

टेन्शनचे काम नाही

पणजीत साहित्य संस्कृती संमेलन सुरू आहे. संमेलनाध्यक्ष माधवी देसाई यांनी "बिझी' आणि "टेन्शन' हे दोन शब्द हद्दपार करण्याचे आवाहन लेखकांना केले. त्यांचे भाषण तिकडे चालले होते, नेमके त्याचवेळी मी इकडे कार्यालयीन कामात "बिझी' झाल्याने तिकडे जाऊन मला काही ते ऐकता आले नाही. पण मी त्याचे "टेन्शन' न घेता दुपारी संमेलनाच्या एका कार्यकर्त्याने आणून दिलेले त्यांचे लेखी भाषण वाचून काढले.

खरे तर गोव्याच्या संस्कृतीमध्ये, खास गोमंतकीय म्हणून जी जीवनशैली आहे, तीत "बिझी' आणि "टेन्शन' या शब्दांना मुळातच स्थान नाही. नसलेल्या या शब्दांना हद्दपार करण्याचा प्रश्‍न येतच नाही. पण, माधवी देसाई म्हणाल्या ते खोटेही नाही. या शब्दांनी गोमंतकीयांची नजर चुकवून त्यांच्या जीवनात कुठेतरी चंचुप्रवेश केला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. काहींनी सताड दार उघडून त्यांचे स्वागतही केले आहे. तात्पर्य, हे मुळातले उपरे शब्द गोवेकरांच्या जीवनात घुसलेले आहेत. बदलती जीवनशैली आणि तिला अंगीकारण्याचा मोह, काहींच्या बाबतीत नाइलाज असेल, यामुळे "बिझी', "टेन्शन' हे शब्द आणि त्याचे परिणाम आमच्या जीवनात डोकावू लागले आहेत. जीवनशैलीचे परिणाम म्हणून रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या शारीरिक आणि ताण, डिप्रेशन यांसारख्या मानसिक आजारांनी घराघरांत हातपाय पसरले आहेत. आधी आजार ओढवून घ्यायचे आणि नंतर त्यावर उपचार करीत बसायचे, अशी नवी जीवनशैली आता रुळते आहे. ताण हा यातला सर्वांत जास्त हातपाय पसरलेला आजार आहे. ताण आला की मग त्यावर उतारा म्हणून ताण व्यवस्थापन, त्यासंबंधी व्याख्याने, योग, ध्यानधारणा किंवा अन्य प्रकारचे कोर्सेस हे सगळे सध्या जोरात सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी एक अंकज्योतिषी भेटला. आधुनिक होता. त्याच्या विचाराची सारी बैठक विज्ञाननिष्ठ होती. अंकज्योतिष हा त्याचा छंद होता. तोही ताणावर मात कशी करायची असते याविषयी बराच वेळ बोलत होता. त्याचे ऐकून घेतले. मी ताण व्यवस्थापनातला तज्ज्ञ नसल्याने ऐकून घेण्याशिवाय माझ्यापाशी पर्याय कुठे होता. त्याला पुरे म्हणून थांबवणे शक्‍य होते, पण ते शिष्टाचारात बसत नव्हते. शिवाय, मी ज्या स्वरूपाचे काम करतो, त्याचा माझ्यावर प्रचंड ताण पडत असल्याचे मानून, त्यातून मला मार्ग दाखवण्यासाठी तो अतिशय आपुलकीने बोलत होता. त्याच्या भावना का दुखवायच्या? त्याचे बोलून झाल्यावर, खूप वर्षांपूर्वी "चांदोबा'त वाचलेली एक गोष्ट मी त्याला सांगितली, ती अशी ः

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'
वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.

नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!

(प्रसिद्धी ः दै. गोमन्तक, 17 जानेवारी 2010)

No comments: