Saturday, February 27, 2010

संकट

संकट कधी एकटे येत नसते, असे म्हणतात. एखादे संकट कोसळले, की संकटांची मालिकाच सुरू होते किंवा एकाच वेळी अनेक संकटे एकदमच एखाद्याला गाठतात. एखाद्याला एकच समस्या वारंवार छळत असते. तो कावून जातो. पण, समस्या काही सुटत नाही. चालताना पायाला ठेच लागून अंगठा दुखावला, की काही ना काही निमित्त होऊन तोच अंगठा ठेचकाळत राहतो; तसे काहीसे संकटांचे, समस्यांचेही होत असते. कमीजास्त फरकाने अनेकांचा हा अनुभव आहे. त्यातूनच वरील म्हणीचे बोल रूढ झाले असावेत. संकट एकटे येत नाही हे दुसऱ्याही एका अर्थाने खरे आहे. संकट येते किंवा समस्या निर्माण होते, तेव्हा सगळा अवकाश संकटाने किंवा समस्येनेच व्यापलेला नसतो. संकट आणि समस्या आपल्यासोबत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि उपायही घेऊन येत असते. आपल्या लक्षात ते येत नाही आणि अनेकदा आपण संकटाचे, समस्येचे बळी ठरतो. चक्रव्यूहात शिरलेला अभिमन्यू तो छेदून बाहेर पडू शकला नाही. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता म्हणून नव्हे, त्याला तो माहीत नव्हता म्हणून. संकटे, समस्या आपल्याला पोटात ओढून घेतात, तेव्हा त्यांचा चक्रव्यूह चहूबाजूंनी असा पसरून राहतो, की दृष्टी, बुद्धी कुंठित होऊन जाते. आपला अभिमन्यू होऊन जातो. कधी कधी कुणी तरी आपसूकच आपल्याला यातून वाचवेल या आशेवर सारा भरिमार टाकून आपण निष्क्रिय बनून राहतो. आपोआपच संकटमुक्ती व्हावी, अशा इच्छेपोटी अकर्मण्य होऊन जातो. या मानसिकतेमुळे अनेकदा समोर आलेले संकटमुक्तीचे मार्ग आणि माध्यमे आपल्या लक्षात येत नाहीत. संकटातून सुटलो नाही, नुकसान सोसावे लागले, की देव-दैवाला बोल लावायला आपण मोकळे होतो. कधी तीही संधी मिळत नाही. संकटाला दुसरी बाजूही असते. तिथे त्यातून निसटण्याचा मार्गही असतो. संकट येते, तेव्हा त्याच्यासोबत असलेला सुटकेचा मार्ग हेरता आला पाहिजे. त्यासाठी बुद्धी सावध, मनाचे डोळे चौकस असायला हवेत. कुठल्याही स्वरूपाच्या लिप्ताळ्यापासून मन, बुद्धी मुक्त असायला हवी. तिथे चुकले, की संकटाने आपला ग्रास घेतलाच म्हणून समजावे.

एका मित्राने सांगितलेली ही गोष्ट ः नदीला पूर आला. गाव बुडू लागले. लोक धावत पळत, मिळेल ते वाहन घेऊन सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. एक देवभक्त झोपडीत होता. त्याला गाडी घेऊन आलेल्या त्याच्या मित्रांनी सोबत चलायचा आग्रह केला. तो नाही म्हणाला. "आपला देव आहे, तो सुखरूप वाचवेल,'असे सांगून त्याने मित्रांना मार्गस्थ केले. पाणी चढले. झोपडे बुडाले. देवभक्त शेजारच्या टेकडीवर चढला. होड्यांतून गावातली माणसे आली. चल म्हणाली. तो हलला नाही. टेकडीही बुडाली. तो झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. मदतकार्य करणारे सैनिक हेलिकॉप्टरने आले. त्याला आत घेऊ लागले. त्याने नकार दिला. आपला देव वाचवेल म्हणाला. ते निघून गेले. पाणी आणखी चढले. देवभक्त बुडू लागला. आयुष्यभर केलेल्या भक्तीचा हवाला देत वाचवायला येत नसल्याबद्दल देवाला शिणू लागला. मग शिव्या देऊ लागला.
देव प्रकटला. म्हणाला, "" शिव्या का देतोस. तुला वाचवायला मी गाड्या घेऊन आलो, होड्या घेऊन आलो, हेलिकॉप्टर घेऊन आलो. तू आला नाहीस.''
देवभक्त म्हणाला, ""तू कुठे आला होतास? आले होते माझे मित्र, गावकरी, सैनिक.''
देव ""म्हणाला, त्यांच्या रूपाने मीच तर आलो होतो!''

(प्रसिद्धी ः 24 जानेवारी 2010)

No comments: