Saturday, February 27, 2010

सलाम

नव्या वर्षासाठी शुभेच्छांचे संदेश आठवडाभर मोबाईलवर येत होते. मित्रांचे, परिचितांचे. कुठे कधी तरी गाठभेट झालेल्यांपैकी काहींनी मोबाईल नंबर शोधून शुभेच्छा पाठविल्या. त्याचे कौतुकच वाटले. अशा प्रसंगी शुभेच्छा पाठवायचा मला कायम कंटाळा. "सेम टू यू'चा संदेशही पाठविणे मला होत नाही. मला ते सारे कृत्रिम वाटते. प्रत्यक्ष भेटीत मात्र शुभेच्छांची देवाणघेवाण होते. मला या प्रकाराचा आळस असला, तरी कुणी पाठविलेला शुभेच्छा संदेश वा कार्ड मिळाले की आनंद वाटतो. त्यापेक्षा मला जो शुभेच्छा देत असतो, त्याला त्याचा जास्त आनंद वाटत असतो, याबद्दल मला खात्री आहे. त्याला आनंद वाटण्यात माझे काही कर्तृत्व नाही, तरी कुणाला आनंद साजरा करायला मिळतो हेच मला अधिक आनंददायी वाटते. माझ्याकडून प्रतिसाद जात नसतानाही जे न चुकता संदेश पाठवीत राहतात, त्यांचे तर मला अप्रूपच वाटते.(त्यात आता या लिहिण्याला निमित्त दिल्याच्या आनंदाची भर!) आपल्याला माहीत नसतेच, पण अशी किती माणसे आपल्या किती साध्या साध्या कृतीतून आपल्या जीवनात आनंद पेरत असतात !

आपल्या अवतीभवतीची माणसे आणि आपणही वर्षभर या ना त्या निमित्ताने शुभेच्छांची देवाणघेवाण करीत असतो. त्यात नव्या वर्षाच्या शुभेच्छांची एक गंमत लक्षात आली आहे. आपल्या देशात डझनावारी धर्म, पंथ नांदतात. त्या प्रत्येकाचे वेगळे कालगणनावर्ष आहे. त्याचे वर्षारंभ साजरे केले जातात. शुभेच्छांची देवाणघेवाण होते. त्या प्रत्येकालाच जानेवारीचा पहिला दिवस उजाडला की नववर्षाच्या शुभेच्छा मिळत असतात. एका वर्षात दोनदा नवी वर्षे आपल्या जीवनात अवतरतात. एक पहिल्या जानेवारीला आणि पाडव्याला. बॅंकेच्या खात्यात असलेले पैसे संपायच्या आधीच आणखी पैशाची भर पडल्यावर कसे सुखद वाटते! जानेवारीला मिळणाऱ्या शुभेच्छांचा उबारा ताजा असताना नव्याने भरभरून येणाऱ्या शुभेच्छा मनाची पोतडी उतू जाईपर्यंत भरून जाते. बाकी कशाने असेन नसेन, शुभेच्छांच्या दौलतीने मी तरी भरपूर श्रीमंत झालो आहे.

नव्याचे अप्रूप सर्वांना आणि सर्व काळ असते. नवीन वर्ष साजरे करताना त्याच त्याच पठडीतल्या शब्दांतले शुभेच्छा संदेश किती काळ चालतील? दर वर्षी त्यात काही नवी रचना करण्याचे माझ्या काही मित्रांचे प्रयत्न मला जाणवत आले आहेत. त्यातला एक नमुना सांगावासा वाटतो. एका मित्राने पाठविलेला हा संदेश आहे ः
"2010 उजाडत आहे. तुला नवीन वर्ष आनंदाचे जावो आणि त्याचबरोबर तुला 26 जानेवारीच्या..व्हॅलेंटाइन डेच्या... होळीच्या ... पाडव्याच्या ...15 ऑगस्टच्या .. वाढदिवसाच्या ..लग्नाच्या वाढदिवसाच्या .. मुलाच्या वाढदिवसाच्या... मुलीच्या वाढदिवसाच्या .. चतुर्थीच्या.. दिवाळीच्या.. नाताळच्या ...जागतिक--- दिनाच्या... पितृदिनाच्या ... शिक्षक दिनाच्या ... बालदिनाच्या ..या-- दिनाच्या , त्या--- दिनाच्या ... हार्दिक शुभेच्छा. शुभ सकाळ.. शुभ संध्याकाळ .. शुभ रात्री...बघ, साला, रोज का ड्रामाही खतम! मी तुला शुभेच्छा देणारा पहिला. आता पुऱ्या वर्षात म्हणू नकोस, मी शुभेच्छा दिल्या नाहीत...!'

घाऊक शुभेच्छा देण्याचा असा प्रकार याआधी कुणी केला, अनुभवला होता का?

एक वेगळा छान संदेश आला होता.

हा संदेश तीन लघुत्तम कथांमध्ये गुंफलेला आहे.
"पहिली कथा ः एकदा एका गावातील सर्वांनी पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करायचे ठरविले. प्रार्थनेच्या दिवशी सगळे गावकरी एकत्र जमले. त्यांच्यातील एकच छोटा मुलगा छत्री घेऊन आला होता.
ती श्रद्धा होती !

दुसरी कथा ः तुम्ही जेव्हा छोट्या मुलाला हवेत उडविता, तेव्हा ते खिदळते, हसते: कारण त्याला माहीत असते, तुम्ही त्याला झेलणार आहात.
तो विश्‍वास असतो !

तिसरी कथा ः प्रत्येक रात्री आपण झोपी जातो, तेव्हा दुसऱ्या दिवसाची सकाळ पाहूच याची खात्री नसते. तरी दुसऱ्या दिवसासाठी आपण काही कार्यक्रम आखलेले, काही करायचे ठरविलेले असते.
ती आशा असते !

नवे वर्ष तुम्ही श्रद्धा, विश्‍वास आणि आशा यांसह साजरे करा.'
चला, कंटाळा टाकून हे दोन शुभेच्छा संदेश मी तुम्हाला फॉरवर्ड करतो.

(प्रसिद्धीःदै. गोमन्तक, 7 जानेवारी 2010)

No comments: