Sunday, February 27, 2011

आनंदाचा स्त्रोत

पुस्तके वाचण्यासंदर्भात साहित्यिक संजय भास्कर जोशी यांनी काल रात्री एका कार्यक्रमात मस्त टिप्स दिल्या.या पद्धतीने कुणी पुस्तक वाचत असतील किंवा नाही.पण त्या टिप्स नक्कीच उपयुक्त आहेत. वाचनाचा आनंद वाढविणाऱ्या आणि त्यातले माधुर्य अधिक काळ टिकविणाऱ्या आहेत.

"पुस्तक मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचावे.पुस्तकाच्या प्रत्येक अंगावर कुणीतरी प्रचंड मेहनत घेतलेली असते.त्याला त्यातून काही तरी सांगायचे असते. मुखपृष्ठावर असलेल्या चित्रात त्या पुस्तकात सांगितलेले साररूपाने किंवा प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेले असते. मलपृष्ठावरील ब्लर्ब ही त्या पुस्तकात डोकावण्याची खिडकी असते.पुस्तकाचा विषय,आशय यांचा अंदाज त्या मजकुरावरून येतो. विशेषतः पुस्तक खरेदी करण्याचा निर्णय करताना हा ब्लर्ब मार्गदर्शक ठरतो. पुस्तकातील अर्पणपत्रिकाही महत्त्वाची असते. भालचंद्र नेमाडे यांनी "कोसला'च्या अर्पणपत्रिकेत "शंभरातील नव्व्याण्णवांना' ती कादंबरी अर्पण केली आहे. अवघेच शब्द, परंतु ते केवढा मोठा आशय सांगून जातात. पुस्तकाची प्रस्तावनाही वाचावी.त्यात काही तारतम्य मात्र पाळायला हवे. वैचारिक पुस्तकाची प्रस्तावना पुस्तक वाचण्याआधी वाचावी, मात्र कथाकादंबऱ्यांची प्रस्तावना आधी वाचू नये . कारण ती आधी वाचली तर पुस्तकासंबंधी काही पूर्वग्रह घेऊन आपण पुढील मजकूर वाचण्याची शक्‍यता असते.आपण जे वाचतो, त्याविषयी एक टिपण मुद्दाम लिहून ठेवावे.आपल्याला त्या पुस्तकात नेमके काय आढळले, किंवा एखादे पुस्तक वाचल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया झाली हे लिहून ठेवावे. एक पुस्तक जीवनाच्या वेगवेगळ्या वळणावर आपल्याला वेगवेगळे अर्थ सांगत असते.एक पुस्तक अनेकदा वाचल्यानंतर प्रत्येक वेळी काही तरी नव्या अर्थाचा उलगडा होतो. अनेक साहित्यकृतीमध्ये अशा अनेक मिती,अर्थ दडलेले असतात.आपणच आधीचे टिपण काढून वाचल्यावर आपल्यालाही वेगवेगळ्या क्षणी कसा वेगवेगळा अर्थ प्रतीत झाला याची प्रचिती येते. ती आनंददायक असते.वाचल्यानंतर आपला अभिप्राय लेखकाला जरूर कळवा. लेखकही आपल्या या लेखनासंबंधी वाचकाच्या भावना समजून घ्यायला आतुर असतो. अशा संवादातूनआनंदाची पखरण होत असते.'

संजय जोशी बोलले,त्यातील एखाद्या गोष्टीचा एकदा तरी प्रयोग करून पाहावाच.कुणी तसा केलेलाही असेल. त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टीत आनंदाचा प्रचंड खजिना दडला आहे.त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सातत्याने या गोष्टी स्वतः केलेल्या नाहीत.मात्र, या सर्व गोष्टी कधी ना कधी केलेल्या आहेत. कुणाचे पुस्तक वा लेख, कविता आवडली तर त्याला तसे सांगितले आहे.त्याचा त्यांना होणार आनंद पाहिलेला आहे.माझ्या लिखाणाविषयी कुणी कधी अभिप्राय देते,तेव्हाचा आनंद मीही अनुभवला आहे.काही पुस्तकेंविषयी टिपणे काढून ठेवली आहेत.ती वाचताना कधी ते पुस्तक पुन्हा अंतःचक्षूपुढून तरळून गेले आहे.कधी ते पुन्हा वाचावेसे वाटून त्यात पुनःप्रत्ययाचा आनंद उपभोगला आहे.संजय जोशी म्हणाले ते खरेच आहे, आनंद आपल्यापाशी असतो. आपण तो इतरत्र धुंडाळत असतो आणि तो गवसत नाही म्हणून दुःखीकष्टी होत असतो. पुस्तकासारख्या रोज हाताशी येणाऱ्या वस्तूतही अनेक अंगांनी उपभोगता येणाऱ्या आनंदाचा प्रचंड स्त्रोत दडलेला आहे.कुणीही त्याला भिडून त्याची अनुभूती घ्यायला हरकत नाही.

Monday, February 14, 2011

गुलाब नही, कॉंटेही सही !

हॅपी व्हॅलेंटाइन डे !

शुभेच्छा देण्याचा आणि थोडाफार सणासारखा साजरा करण्याचा आजचा आणखी एक दिवस.

या दिवसाची धूम अनेक दिवस आधीपासून सुरू झालेली असते.यंदा कुणा अपरिचिताने मला एक मेल पाठविला.त्यात व्हॅलेंटाइन डेच्या आधीची "सप्तपदी' सांगितलेली आहे. व्हॅलेंटाइन डेचे वेध सात फेब्रुवारीला सुरू होतात.रोझ डे, प्रपोझ डे,चॉकलेट डे,टेडी डे,प्रॉमिस डे, किस डे, हग डे अशा सात दिवसांच्या प्रवासानंतर आठव्या दिवशी उगवतो तो व्हॅलेंटाइन डे. आम्ही अशा वाटेने कधी गेलेलो नसल्याने या साऱ्या उपचारांची माहिती कधी झाली नाही. खूप आधी कधी तरी कुणी एकदा सांगितले होते, बड्या हॉटेलात म्हणे मुख्य जेवण यायच्या आधी चिटूकमिटूक खाण्यापिण्याच्या काही पायऱ्या असतात.त्याला कसलासा "कोर्स' म्हणतात. ब्रिटिश एटिकेटस्‌मध्ये त्याचे फार महत्त्व असते.त्या पायऱ्यांवरही कधी जाणे झालेले नसल्याने या अशा सगळ्या वातावरणापासून आम्ही तसे अलिप्त आणि म्हणून अनभिज्ञही राहिलो. या मेलने व्हॅलेंटाइन डेचे नवे "दर्शन' घडविल्याने पहिल्यांदा त्याची माहिती झाली. (त्याच्या वापराच्या काही टिप्स सोबत दिल्या असत्या, तर ..... )

काही वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेसारख्या परदेशी "फॅड'ना फार विरोध झाला होता.आताही तो तसा संपलेला नाही.कदाचित त्याची धार व तीव्रता कमी झालेली असावी.व्हॅलेंटाइन डेवरून गदारोळ चालू असताना आणि आताही या दिवसाच्या निमित्ताने मला हटकून आठवते ते आपल्या पुराणकाळातील गांधर्व विवाह, पाणिग्रहण वगैरेसंबंधीच्या कथा.संकटात सापडलेल्या स्त्रीला वाचविण्यासाठी तिचा हात धरला तरी तो पाणिग्रहणाचा प्रकार झाल्याच्या किंवा तेवढ्याने झालेल्या परपुरुषाच्या स्पर्शाने तो पुरुष स्त्रीने मनाने वरल्याच्या अथवा वरावा लागल्याच्या कथा पुराणात सापडतात.कारण त्या स्पर्शाने तो परपुरुष स्वपुरुष ठरे आणि त्याशिवाय अन्य पुरुषाचा स्पर्श सोडाच, विचारही परपुरुषाचा विचार ठरे, अशी काही नीतिमत्ता,संस्कृती-परंपरा त्याकाळी समाजात रूढ होती.त्यामुळे व्हॅलेंटाइन हा विदेशी प्रकार आहे, असे कुणी म्हटले,तरी त्याचे मूळ भारतात असावे असे मला सारखे वाटते. केवळ मूळच नव्हे, आपल्याकडे व्हॅलेंटाइनचा प्रकार फारच प्रगत होता, असे म्हणावे लागते. गांधर्व विवाहाच्या, पाणिग्रहणाच्या कथा हे त्याचे पुरावे आहेत.त्यात पुन्हा असे एक दिवस रोझसाठी, एक दिवस टेडीसाठी, एक दिवस चुंबनासाठी, एक दिवस आलिंगनासाठी असा काही राखीव कार्यक्रम आखून ताटकळत राहायचे झंझट नाही. धरला हात, की प्रकार साजराच ! नाही तरी आपली संस्कृती प्राचीन काळीही फारच प्रगत होती.विज्ञान,खगोलशास्त्रासारख्या अनेक क्षेत्रात पुढारलेली होती.ती एवढ्या बाबतीत मागे कशी पडली असती !

अनेकांना मात्र हे व्हॅलेंटाइनचे प्रकरण जमत नाही.आम्हीही त्यातलेच.ते जमणारही नाही.मेड फॉर इचअदरच्या धर्तीवर सांगायचे तर वी आर नॉट मेड फॉर दॅट ! त्याचा मोठा पुरावा म्हणजे आजचा प्रसंग.

सकाळी ऑफिसच्या पार्किंगमध्ये गाडी लावून खाली उतरलो.इमारतीच्या भिंतीला लागून काही फुलझाडे, फुलझाडांच्या कुंड्या आहेत. दरवाजा बंद करून मागे वळताना खांद्यावर शर्टात एका फुलझाडाची फांदी अडकली.माझ्या वळण्याच्या वेगामुळे तिचे काटे शर्टात रुतून तो थोडासा फाटला.फांदी अलगद सोडवून घेतली. पाहिले तर गुलाबाची फांदी होती. या ठिकाणी अनेकदा गाडी पार्क करतो.कधीही ही फांदी अंगचटीला आली नव्हती.नेमकी आजच ती भिडली. गंमत म्हणजे त्या फांदीवर एकही गुलाब नव्हता.कुणी खुडून नेला नव्हता, तर मुळातच उमललेला नव्हता.काहीशी वठलेली ती फांदी होती.

लोक व्हॅलेंटाइन डेला गुलाब देतात.मला भेटले गुलाबाचे काटे,तेही दस्तुरखुद्द झाडाकडून !

Saturday, January 1, 2011

स्वागत नववर्षाचे !


आज आणखी एका नव्या वर्षाला सुरवात झाली.

आपल्या देशात अनेक वेळा नव्या वर्षाला आरंभ होत असतो. ते सगळे साजरे करण्याचे क्षण असतात.तसा हाही एक साजरा करण्याचा क्षण आहे.गंमत म्हणजे प्रत्येक नव्या वर्षाच्या सुरवातीला वर्षभरासाठी संकल्प केले जातात.त्याचे काय होते हे विचारायचे नसतेच.कारण ते वर्ष संपायच्या आतच दुसरे नवे वर्ष सुरू होत असते. आता एक जानेवारीला सुरू झालेले वर्ष 31 डिसेंबरपर्यंत आहे.परंतु 31 डिसेंबर यायच्या आतच चैत्राच्या प्रारंभी गुढी पाडव्याला नवे वर्ष सुरू होणार आहे. त्याला अवघे तीनच महिने राहिलेले आहेत.अशी एका कॅलेंडर वर्षांत अनेकांची नववर्षे सुरू होतच असतात.त्याशिवाय व्यावहारिक नवी वर्षेही असतात.उदाहरणार्थ, येत्या एक एप्रिलला नवे वित्तीय वर्ष सुरू होत असते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत असते.त्या त्या वर्षांचे संकल्प सोडण्याची प्रथा नाही. किंवा असली तरी त्याची फार चर्चा होत नाही.परंतु, ही नवी वर्षे खरी तोंडाला फेस आणणारी असतात.कारण या नव्या वर्षांच्या प्रारंभी केवळ संकल्प करून भागत नाही, त्या वर्षभरातील आर्थिक व्यवहारांचे पक्के नियोजनच करावे लागते.अन्यथा वेगवेगळ्या खर्चाची भागवणूक करताना प्रचंड धावपळ,प्रसंगी उसनवारी करणे भाग पडते.ते सारे निभावून नेताना आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांचे बजेट आणि हिशेबठिशेब कोलमडून पडतात.त्याने कंबरडे मोडते आणि स्वास्थ्यही हरवते.तसे पाहिले तर एक जानेवारीला वर्ष सुरू होताच राहिलेल्या नव्वद दिवसात सध्याचे आर्थिक वर्ष संपणार असल्याची चाहूल लागते.ज्यांना कर वगैरे भरावे लागतात आणि आधीपासून काही तजवीज केलेली नसते, त्यांना तर ही चाहूल धडकीच भरवणारी असते.अनेकदा अशी आवश्‍यक तजवीज केलेली नसतेच.मग, राहिलेल्या थोडक्‍या अवधीत आवश्‍यक त्या साऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी,गुंतवणुकीसाठी, सगळे नीट मार्गी लावण्यासाठी जी धावपळ करावी लागते, ती अनेकदा झोप उडवणारी नाही तर प्रचंड ताण देणारी असते.इथून जे बजेट बिघडते, ते काही केल्या पुढच्या काळात सुरळीत होत नाही.देशाचे असतील किंवा आपण जिथे राहते त्या राज्याचे असतील, अर्थसंकल्प आणि अर्थमंत्रीही आपल्या विवंचना सोडवू शकत नाही.उलटपक्षी ते त्यात अनेकदा भरच घालतात.त्यामुळे नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाचा जल्लोष मनात घोळवताना संकल्प करायचा तर काय करायचा याचा विचार करताना मनात आले,की आपण आपले आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन किमानपक्षी नीट केले पाहिजे.स्वतःसाठी म्हणून काही वेळ,उसंत काढण्यासाठी दिवसाच्या चोवीस तासांचे काही गणित मांडले पाहिजे आणि ते अमलातही आणले पाहिजे. एवढे करू शकलो,तर वर्षारंभाच्या पहिल्या दिवसाचा आनंद देऊ शकणारे अनेक दिवस वर्षभरात
आपल्याला भेटत राहतील !
तसे ते सगळ्यांना भेटावेत अशा सर्वांनाच शुभेच्छा!

Friday, December 31, 2010

वाद कशासाठी ?

ठाणे येथे 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठल्याही वादाशिवाय पार पडेल असे वातावरण अगदी संमेलनाच्या प्रारंभापर्यंत होते.पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याचा वाद उफाळून आला.त्याची झळ संमेलनाच्या मंडपापर्यंत पोचली. प्रत्यक्ष संमेलन सुरू झाल्यानंतर संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसेच्या आलेल्या उल्लेखावरून स्मरणिकेतील ते पान फाडून त्याला आग लावण्यात आली.हे वाद किती प्रस्तुत वा अप्रस्तुत होते, हा वेगळा मुद्दा. मात्र,वादाच्या संमेलनाशी जडलेल्या नात्याची फारकत होणार नाही हे ठाण्याच्या संमेलनातही ठळकपणे जाणवले.

संमेलनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका लेखात यंदाच्या वर्षात ज्यांच्या जन्मशताब्दी येतात, त्यांच्याविषयी माहिती देणारा लेख समाविष्ट करण्यात आला होता. त्यात नथुराम गोडसेविषयी तीन ओळींची माहिती होती. त्यांचा हा उल्लेखच वादाला कारणीभूत ठरला. संमेलन आयोजकांनी त्यावर माफी मागितली. वाद फार चिघळला नाही.संमेलनाला वादाचे गालबोट लागण्यास तेवढा प्रसंगही पुरेसा ठरला.

हे सर्व घडून गेल्यानंतर संमेलनाच्या शेवटच्या दिवशी त्या अनुषंगाने चर्चा चालली होती. एक जण म्हणाला, "खरेच इतके आकांडतांडव करण्याची गरज होती का? स्मरणिकेत तो उल्लेख चुकीचा होता तर ती चूक आयोजकांच्या निदर्शनास आणून सुधारून घेता आली नसती का?'

या प्रश्‍नामागील भावना चांगली होती. परंतु, त्या प्रश्‍नाचे तेवढे सरळ उत्तर देणे मात्र कठीण होते. मी त्याला म्हटले,"तसे करताही आले असते. परंतु तेवढे सामंजस्य असते,तर मुळातच वाद आणि नंतरचा अप्रिय प्रसंग घडला नसता. हे तसेच का घडले याची ज्याची त्याची काही कारणेही असतील. पण, गुपचूपपणे चूक दुरुस्त केली असती तर ती माणसेही कुणाच्या लक्षात आली नसती. काही वेळा आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी निमित्त लागते. कारण प्रत्येकाला आपल्यासाठी काही "स्पेस" हवी असते. या सर्वांमागे तसाही विचार असू शकतो.'

हा वाद तत्त्वासाठी होता की "स्पेस'साठी हा विचार तेव्हापासून डोक्‍यात आहे. कारण नथुरामविषयी नंतर एक विशेषांकही संमेलनस्थळी वितरित करण्यात आला होता.त्याबद्दल कुणाचीच काही प्रतिक्रिया आली नाही.

Monday, December 13, 2010

कृष्णार्पणमस्तु

गेले काही दिवस, दिवस म्हणण्यापेक्षा महिनेच म्हणावे लागेल, मी माझ्या ब्लॉगवर आलेलो नाही.मध्ये काही वेळा आठवण झाली,काही लिहायचे मनात होते, परंतु कुठल्या ना कुठल्या कारणामुळे आणि काही वेळा तांत्रिक अडचणीमुळे ते राहून गेले. वितीली चुकले की वावाला चुकते असे म्हणतात, तशी काहीशी ही अवस्था झाली. मग तासभर बसून एकदाचा माझाच ब्लॉग मी गाठला.मध्ये किती खंड पडला,त्याचा हिशेब करू लागलो.तेवढ्यात तिथे एक नोंद होती, तिकडे लक्ष गेले. मी अठरा आठवडे दोन दिवस ब्लॉगवर आलेलो नाही,अशी ती नोंद होती. (त्यालाही आता आठवडा उलटला आहे.)मध्ये गेलेल्या अवधीचा तयार हिशेबच मिळाला.तो करायचा त्रास वाचला, तेव्हा दोन गोष्टी मनात आल्या, त्या लिहून ब्लॉगवर नियमित येण्याचे मी ठरवतो आहे.

पहिली गोष्ट मनात आली, ती एक किस्सा किंवा विनोद आहे....

एकदा मोठी चोरी करून काही चोर लांबच्या जंगलात जाऊन विसावले.त्यातील दोघे तरुण चोर वाटणी करण्यासाठी चोरीच्या मालाची मोजदाद करून लागले. त्यावेळी तिसरा म्हणाला," आता शांत झोपा.एवढे कष्ट आणि धावपळ करून आपण दमलो आहोत.या मालाची किंमत उद्या वर्तमानपत्रात येईलच छापून, ती मोजण्यासाठी कशाला कष्ट करता?'

आणि दुसरी गोष्ट, तशी जुनी, पण कधीमधी आम्हा काही मित्रमंडळीत चर्चेला आलेली...

कुणी चार मित्र, परिचित एकत्र आले, की प्रसंग कसलाही असो,त्यांच्या चर्चेत राजकारण, सेक्‍स आणि अध्यात्म हे विषय हटकून येतातच. एकदा चर्चा चालली होती, कुणी माणूस किती भ्रष्टाचारी आहे, किती लांड्यालबाड्या त्याने केल्या आणि आता तो कसा अडचणीत आलेला आहे, वगैरे...

एक जण म्हणाला, "सगळं इथंच करायचं आणि इथंच भरायचं...'

दुसरा एक जण माणसे कशी बेईमान असतात, याविषयी बोलत होता.त्याने कुणाला कशी मदत केली, ती तो कसा विसरला, भल्याची दुनिया नाही, वगैरे....

तिसरा म्हणाला, "चांगले केलं की कुठं ना कुठे त्याबदली चांगलंच भेटतं...'त्याने कुणाला कशी मदत केली होती आणि त्यांच्या गरजेच्या वेळी त्याला अनपेक्षितपणे कशी मदत मिळाली, वगैरे..

असे अनुभव सगळे जणच सांगू लागले.मला आठवते,त्यावेळी मी म्हणालो होतो, की "भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे, "कृष्णार्पणमस्तु.' जे करायचे ते कृष्णाच्या नावाने म्हणजे भगवंताच्या नावाने सोडून द्यायचे आणि आपण विसरून जायचे.आपल्या पापपुण्याचा हिशेब लिहीत बसायचे आपल्याला काही कारण नाही.त्यासाठी वर चित्रगुप्ताची व्यवस्था आहे.तो सगळ्या नोंदी ठेवीत असेल, तर त्यासाठी आपण काही डोके शिणवायचे नाही.मी तरी शिणवीत नाही.सगळं संपल्यावर त्याला म्हणायचं फारतर, काय बाबा माझा हिशेब झाला ते सांग.त्यासाठी आता कशाला मेंदूच्या मागे अधिकचं काम लावायचे?'

Tuesday, March 16, 2010

पुन्हा कुळागरी सैर

नेत्रावळीच्या कुळागरातील "दिलखुलास' कार्यक्रमानंतर बरोबर दोन आठवड्यांनी, रविवारी (14 मार्च) गुडे -केपे येथे पुन्हा कुळागरात एका साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेने मराठी - कोकणी लेखकांचा एक मेळावा नागेश लव फॉरेस्ट गार्डनमध्ये आयोजित केला होता. संस्थेचा हा यंदाचा या संकल्पनेतील तिसरा कार्यक्रम. सावई-वेरे येथील स्पाईस फार्मवर पहिला आणि गेल्या वर्षी सिद्धनाथ पर्वतावर दुसरा कार्यक्रम झाला होता.साहित्यातील निसर्गचित्रण आणि साहित्यातील पर्यावरण अशी विषयसूत्रे अनुक्रमे दोन्ही वेळेला होती.यावेळी विषयाचे सूत्र नव्हते. प्रत्येकाने आपल्या मनाला वाटेल त्या विषयावर मत, विचार मांडावे, असे समन्वयक दामोदर मावजो यांनी सुरवातीलाच सांगितले. त्यांनी स्वतः वैश्‍विकीकरणाची मूळ संकल्पना आपल्या "वसुधैव कुटुंबकम्‌' कडून आता ग्लोबल व्हिलेजपर्यत आल्याचे एक सूत्र चर्चेसाठी खुले केले.भाषा आणि संस्कृतीच्या ऱ्हासाविषयीची चिंता व्यक्त करताना 33 टक्के आरक्षणाबाबत संसदेत घडलेल्या ताज्या नाटकांच्या अनुषंगाने महिला सक्षमीकरणाच्या विषयाचे सूत्रही लेखकांसाठी मोकळे केले.

विषयाचे बंधन नसल्याने ज्याला हवे त्या त्या विषयावर बोलण्याची मोकळीक मिळाली.मावजो यांच्या प्रास्ताविकातील धागे धरत-सोडत संपूर्ण कार्यक्रमात विविध मते व्यक्त झाली. विषयाचे बंधन नसल्याने किंबहुना विषयाचे एक सूत्र धरून बोलण्याचे बंधन नसल्याने बोलण्याचा, व्यक्त होण्याचा मोकळेपणा सर्वांना मिळाला,तो सर्वांनी उपभोगला,अनुभवला.मध्यवर्ती विषय नसल्याने चर्चा रंगली, तरी तिला काही ठोस आकार मिळाला नाही. "येणाऱ्या काळात दोनच गोष्टी राहतील- एक, इंग्रजी भाषा आणि दुसरा आंतरजातीय विवाह ' इथून सुरवात झालेली चर्चा भटक्‍या कुत्र्यांबद्दल भूतदया दाखवण्याचे आवाहन करता करता रेबीज रोग किती घातक आहे, त्यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला, हवी इथपर्यंत येऊन थांबली.गोमंतकीयांची मातृभाषा कुठली या प्रश्‍नाला स्पर्श केला गेला.त्याबद्दलच्या वादात न शिरता वक्‍त्याने मध्यममार्ग म्हणून "भारतीय भाषा'च्या जतन-संवर्धनाची भूमिका मांडली.इंग्रजी स्वीकारताना आपल्या भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली. गोमंतकीयांचे साहित्य किती दर्जेदार, हाही प्रश्‍न उपस्थित केला गेला.वेळेअभावी त्यावर ऊहापोह झाला नाही.साहित्याचा समाजावर परिणाम होतो का, या प्रश्‍नावर होय- नाही अशी मते व्यक्त झाली.मराठी -कोकणी लेखक एकत्र येतात, कार्यक्रम संपला की आपापल्या वाटेने निघून जातात. असे न होता त्यांनी हातात हात घालून एकत्र वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.त्यावर पुढे कुणी काही बोलले नाही. आपल्याला हवे ते आणि तितके वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नाही,शब्दांच्या-जागेच्या मर्यादा आड येतात, याविषयीची खंतही व्यक्त झाली.पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करूनही प्रकाशित करण्याचा योग जुळून येत नाही, प्रकाशनासाठी अर्थसाह्याच्या अनेक योजना कार्यरत असूनही पुस्तक प्रकाशित व्हायला दोन दोन वर्षे लागतात,अशीही खंत व्यक्त झाली. संस्कृती, भाषा यांच्या ऱ्हासाविषयी चिंता व्यक्त करताना पर्यावरणाचा होणारा नाश, बोडके होणारे डोंगर, आटत जाणारे पाण्याचे झरे, प्रशासन-राजकारणातील भ्रष्टाचार याविषयी तप्त-संतप्त उद्‌गारही निघाले.अनेकांनी आपल्या कविता सादर करून दाद मिळविली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येकाने अभिव्यक्तीला वाट मोकळी करून दिली. खुलेपणाने आणि दिलखुलास झालेल्या या कार्यक्रमाला लाभलेली निसर्गाची पार्श्‍वभूमी पुन्हा एकदा कधी तरी या ठिकाणाला भेट देण्याचा मोह मनात जागवून गेली.

राजन लोटलीकरांचे हे कुळागर तसे नव्याने विकसित होत असलेले दिसले. माडा पोफळीची एरव्ही कुळागरी गच्च गर्दी नव्हती, पण हिरवागर्दपणा भरपूर होता. भोजनासाठी दालन, कार्यक्रमासाठी दालन (बांबूपासून दरवाजे, खिडक्‍या बनविलेल्या या दालनाला भिंती नव्हत्या !), स्वच्छतागृहांचे तीनेक ठिकाणचे वेगळे ब्लॉक्‍स, शॉवर लावून केलेले रेन डान्सचे फ्लोअर, शॉवरबाथ, नैसर्गिक झरीला छान, कल्पकतेने दिलेले स्वीमिंग पूलचे स्वरूप,त्यात दिसलेले, आता अनेक गावातही दुर्मिळ झालेले करणकाटके हे छोटे मासे, तिथे फिश बाईटची केलेली योजना आणि सारी सैर संपल्यावर वनौषधी, झाडपाला घालून तापवलेल्या गरम पाण्यात पावले शेकून घेण्याची खास ट्रीट हा सारा सरंजाम कॅन्व्हासवरच्या चित्रासारखा मनावर रेखांकित होऊन राहिला. रॉक क्‍लाइंबिंगचा खेळ इथे उपलब्ध आहे. परंतु मुक्त संवादी कार्यक्रम आणि माडापोफळीच्या हिरव्यागंधित निसर्गकुशीतील वातावरणामुळे मन आकाशस्पर्शाला कधीच झेपावले होते.रॉक क्‍लायबिंगचा विचारही त्यात जमिनीवरच राहिला!

Thursday, March 4, 2010

"दिलखुलास' सोहळा

साहित्यनिर्मिती आणि प्रकाशन सोहळे, दोन्ही ऐन भरात आहेत.आठ पंधरा दिवसांनी गोव्यात पणजीत, नाही तर अन्य एखाद्या गावात,शहरात पुस्तक प्रकाशनाचा समारंभ ठरलेला.लेखकाचा, रसिकांचा आणि आयोजकांचाही याबाबतीतला उत्साह उतू जाणारा. इतक्‍या सातत्याने आणि सुविहितपणाने हे सोहळे होत आहेत, की एखाद्या कार्यक्रमानंतर लगेचच दुसऱ्या तशाच कार्यक्रमाची वर्दी नाही मिळाली,की चुकल्या चुकल्यासारखे वाटते. एवढी या कार्यक्रमांची आताशा सर्वांनाच सवय लागली आहे.त्याचे स्वागतही तेवढ्याच अप्रूपानिशी चाललेले असते. कार्यक्रमाच्या औपचारिकतेबरोबर नियमाने हजेरी लावणाऱ्यांमध्ये एक जवळिकीचे,आपुलकीचे नाते जुळून आले आहे.ते प्रत्येकवेळी नव्या ताजेपणाने दृढावत चाललेले आहे. गेल्या रविवारी असाच एक प्रकाशन सोहळा मडगावचे आमचे कविमित्र अशोक बोरकर यांनी चक्क नेत्रावळी येथील तानशीकरांच्या कुळागरात आयोजित केला. त्यांच्या "दिलखुलास' या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते. कवितासंग्रहाच्या नावाप्रमाणेच कवी अशोक हे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे. पणजीत होणाऱ्या "काव्यसंध्या' या मासिक कवितावाचनाच्या कार्यक्रमाला मडगावहून सपत्निक येऊन नियमित हजेरी लावणारे.त्यांच्या पत्नी कविता याही स्वतः उत्तम कवयित्री.(त्यांची एक कविता "गांधी तुम्ही आऊटडेटेड झालात' मी या ब्लॉगमध्ये दिली होती) कवितेवर इतक्‍या उत्कटतेने प्रेम करणारी माणसे फार क्वचित पाहायला मिळतात. त्यांच्या काव्यप्रेमाविषयी मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.नेत्रावळीतील कुळागारात झालेल्या त्यांच्या पुस्तक प्रकाशनसोहळ्याचे एक वैशिष्ट्य मनात नोंदवले गेले, ते हे की बंदिस्त खोलीतून निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात होणारा असा हा पहिलाच समारंभ.छानशा मुक्त छंदातल्या कवितेसारखा हा कार्यक्रम होता. औपचारिकतेला बराचसा फाटा दिल्याने तो रंगलाही चांगला.कार्यक्रमानंतर तानशीकरांच्या मेनुतली फणसाची भाजी कित्येक वर्षांमागे बालपणात घेऊन गेली.तिची चव जिभेवर आणि बालपणी बाहेर धो धो पडणाऱ्या पावसामुळे अंगाभोवती रेंगाळणाऱ्या गारठ्याचा मधूनच कुडकुडवणारा स्पर्श अनुभवत ऊनशी भाजी खाण्यातल्या लज्जतीची आठवण मनात रेंगाळत आहे.

"दिलखुलास'च्या प्रकाशनाआधी बुडबडी तळीच्या पटांगणात त्यांच्या "आई ग' या आईविषयी असलेल्या कवितेच्या आणि तिच्याविषयीच्या काही लेखांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ झाला.तो प्रसंग फारच हृद्य होता. अशोक बोरकर यांच्या आईला बुडबुडी तळी पाहायला यायचे होते. आजारपणामुळे त्यांना कधी ते शक्‍य झाले नाही.आता त्या हयात नसल्याने तो विषय राहिलेला नाही. त्यांची तळी पाहायला येण्याची अधुरी राहिलेली इच्छा त्यांच्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करून त्या स्वरूपात पूर्ण केल्याच्या समाधानाचे काही कण कवीने पदरात बांधून घेतले आहेत.एखाद्या उत्कट मनाच्या कवीला, तरल संवेदनशील मनालाच अशी कल्पना सुचू शकते.त्याचे काही अमिट ठसेही माझ्या मनावर
उमटून आहेत.हा सोहळा अनुभवताना आठवणींची एक कविता माझ्या मनात सारखी कूस बदलत राहिली...