Friday, January 30, 2009

पशूही नव्हे !

अपराधी, गुन्हेगार, गुंडापुंडाविषयी समाजाच्या मनामध्ये सामान्यतः प्रक्षोभाची भावना आहे. दहशतवाद्यासंदर्भात ही भावना आणि एकूणच त्यांच्याविषयीची चीड अधिक तीव्र आहे. त्यांना कोणतीही दयामाया न दाखवता शिक्षा केली पाहिजे ,असे नव्हे, तर त्यांना ठेचले पाहिजे असा पराकोटीचा संताप जनतेमध्ये आहे. मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर कधी नव्हे इतक्‍या जहालपणाने तो व्यक्तही झाला.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरिजीत पसायत यांनी दहशतवाद्यांसंदर्भात केलेल्या टिप्पणीतून लोकांच्या याच भावना व्यक्त झाल्या आहेत. अन्य गुन्हेगार आणि दहशतवादी हे अपराधी असले तरी त्यांच्यात फरक करावा लागणार आहे.सामान्य, निरागस लोकांची हत्या करणारे दहशतवादी माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे नाहीत. त्यांचे वर्तन जनावरांसारखे आहे आणि त्यांना जनावरांचेच नियम लागू केले पाहिजेत, अशा आशयाची टिपणी न्यायमूर्ती पसायत यांनी केली आहे. खरे तर दहशतवाद्यांची करणी जनावरांनाही लाजवणारी आहे. हिंस्र श्‍वापदे झाली, तरी वाटेत येणाऱ्या प्रत्येकाचा ती बळी घेत नसतात. भुकेसाठी अन्य प्राण्याची शिकार करणारे हिंस्र पशूदेखील पोट भरण्यापुरतेच भक्ष्याची शिकार करतात. पोट भरल्यावर त्यांचे भक्ष्य असलेला प्राणी अनायासे सापडला,तरी त्याचा जीव घेत नाहीत. निसर्गाने नियत केल्याच्या पलीकडे अन्य जिवाला आपले भक्ष्य करीत नाही. दहशतवादी असा कुठलाही निसर्गनियम, सुसंस्कृत समाजाचे नियम पाळीत नाही. हातात शस्त्रे घेऊन निष्पाप लोकांचे बळी घेत असतात. जे सुसंस्कृत समाजाचे नीतिनियम,संकेत पाळीत नाहीत, इतरांच्या जगण्याच्या हक्काचा आदर करीत नाहीत, उलट तो हिरावून घेतात, त्यांना किंवा त्यांच्या वतीने अन्य कुणाला त्यांच्यासाठी मानवाधिकार मागण्याचा, त्याची ग्वाही देण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्‍न या टिप्पणीने पुन्हा एकदा उपस्थित केला आहे.

मानवाधिकारासाठी कार्य करणारे, चळवळी चालविणारे सामान्य, खरोखर सर्व प्रकारे नागवल्या गेलेल्या वंचिताच्या हक्कासाठी कार्य करण्याने जेवढे लोकांना माहीत नसतात, अशा गुन्हेगारांच्या मानवी हक्कासाठी मोर्चे, आंदोलने करून त्यापेक्षा अधिक चर्चेत राहतात.गुन्हेगार ज्यांचे बळी घेतात, त्यांच्या मानवाधिकारांसाठी ही मंडळी तशा कळवळ्याने आणि पोटतिडिकेने भांडताना दिसत नाही.त्यांनाही न्या. पसायत यांच्या टिप्पणीने चपराक बसली आहे. तरी, हे लोक वरमून आपल्या विचारात सुधारणा करतील, अशी शक्‍यता नाही.

एक प्रगल्भ लोकशाही देश म्हणून आपण काही व्यवस्था स्वीकारलेली आहे, राबवितो आहोत. न्यायप्रक्रियेत गुन्हेगार म्हणून न्यायासनासमोर येणाऱ्या व्यक्तीला त्याची बाजू मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, अशी बंधने किंवा नियम आम्ही स्वीकारले आहेत. त्याची ग्वाही देत दहशतवाद्यांच्या मानवाधिकाराचे समर्थन केले जाते. आपल्या व्यवस्थेच्या प्रतिष्ठेसाठी, विश्‍वासार्हतेसाठी आपण त्यातील तरतुदींचे पालन करायला हवे. त्याचवेळी दहशतवादाचा संहारक विषाणू अशा व्यवस्थाच नव्हे, तर सारी मानवजातच उद्‌ध्वस्त आणि नष्ट करायला निघाला आहे, याचाही विचार करायला हवा.दहशतवाद्यांच्या गुन्ह्याची व्याप्ती अन्य गुन्ह्याप्रमाणे व्यक्ती किंवा समाजाची सीमित हानी करण्याइतकी मर्यादित नाही, तर व्यक्ती समूह ओलांडून साऱ्या जगालाच विनाशाच्या उंबरठ्यावर नेणारी आहे, मानवाचे जगणे नासवणारी आहे. त्यामुळेच दहशतवादाच्या गुन्ह्याचा विचार अन्य गुन्ह्याच्या व्याख्येत-पंक्तीत बसणारा नाही.अमानुषता आणि पाशवी पातळ्यांपलीकडे जाणारा हा गुन्हा आहे. आपण दहशतवादी कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी, त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वेगळा कायदा, यंत्रणा केल्या आहेत. पाश्‍चिमात्य जगानेही या स्वरूपाच्या यंत्रणा आणि व्यवस्था केल्या आहेत. हे सारेच दहशतवादी कृत्यांना अन्य गुन्ह्यांहून वेगळे ठरविणारे निदर्शक आहेत. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी या बाबी अपरिहार्य बनल्या आहेत. दहशतवाद्यांची न्यायदानासंदर्भातील हाताळणीही वेगळ्या पद्धतीने होणे आवश्‍यक आहे.न्यायाच्या नेहमीच्या कसोट्या लावून त्यांना पायबंद घालणे शक्‍य नाही. मानवाधिकाराचे छत्र त्यांच्या बेबंदपणाला पूरक ठरण्याचा धोका त्याचा पुरस्कार करणाऱ्यांनी लक्षात घ्यावा.

मुंबईत झालेल्या हल्ल्यातील एक दहशतवादी, कसाब अटकेत आहे. पैशासाठी आपण कुठेही याच प्रकारे लोकांचे जीव घेऊ, असे निर्दय विधान त्याने जबानीच्या वेळी केले होते. तोच कसाब आपल्या अटकेची माहिती आईवडिलांना कळू देऊ नका अशी विनवणी करीत होता.त्यांना दुःख होईल, याचे त्याला वाईट वाटत होते. केवळ आपल्या करणीची माहिती मिळाल्यावर आईवडिलांना दुःख होईल म्हणून कळवळणाऱ्या कसाबला आपण प्रत्यक्षात किती तरी आईवडिलांची मुलेच जगातून नाहीशी केली,याचे मात्र तसूभर दुःख नव्हते.उलट अशी माणसे मारण्याची भाषा त्याच्या तोंडी होती. कसाब किंवा असले हत्यारे कुठल्याही तर्काने किमान सहानुभूती दाखविण्याच्याही योग्यतेचे नाहीत. माणूस म्हणून घ्यायचाही त्यांना खरेच अधिकार नाही. तरी त्यांच्या मानवाधिकारांची ज्यांना काळजी आहे,त्यांनी कसाब आणि त्याच्या साथीदारांच्या गोळ्यांनी प्राण गमावलेल्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मानवाधिकाराचे मूल्य त्यांच्या लेखी काय आहे, हे एकदा जगाला सांगावे.

No comments: