Tuesday, March 16, 2010

पुन्हा कुळागरी सैर

नेत्रावळीच्या कुळागरातील "दिलखुलास' कार्यक्रमानंतर बरोबर दोन आठवड्यांनी, रविवारी (14 मार्च) गुडे -केपे येथे पुन्हा कुळागरात एका साहित्यिक कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याचा योग आला. इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा या संस्थेने मराठी - कोकणी लेखकांचा एक मेळावा नागेश लव फॉरेस्ट गार्डनमध्ये आयोजित केला होता. संस्थेचा हा यंदाचा या संकल्पनेतील तिसरा कार्यक्रम. सावई-वेरे येथील स्पाईस फार्मवर पहिला आणि गेल्या वर्षी सिद्धनाथ पर्वतावर दुसरा कार्यक्रम झाला होता.साहित्यातील निसर्गचित्रण आणि साहित्यातील पर्यावरण अशी विषयसूत्रे अनुक्रमे दोन्ही वेळेला होती.यावेळी विषयाचे सूत्र नव्हते. प्रत्येकाने आपल्या मनाला वाटेल त्या विषयावर मत, विचार मांडावे, असे समन्वयक दामोदर मावजो यांनी सुरवातीलाच सांगितले. त्यांनी स्वतः वैश्‍विकीकरणाची मूळ संकल्पना आपल्या "वसुधैव कुटुंबकम्‌' कडून आता ग्लोबल व्हिलेजपर्यत आल्याचे एक सूत्र चर्चेसाठी खुले केले.भाषा आणि संस्कृतीच्या ऱ्हासाविषयीची चिंता व्यक्त करताना 33 टक्के आरक्षणाबाबत संसदेत घडलेल्या ताज्या नाटकांच्या अनुषंगाने महिला सक्षमीकरणाच्या विषयाचे सूत्रही लेखकांसाठी मोकळे केले.

विषयाचे बंधन नसल्याने ज्याला हवे त्या त्या विषयावर बोलण्याची मोकळीक मिळाली.मावजो यांच्या प्रास्ताविकातील धागे धरत-सोडत संपूर्ण कार्यक्रमात विविध मते व्यक्त झाली. विषयाचे बंधन नसल्याने किंबहुना विषयाचे एक सूत्र धरून बोलण्याचे बंधन नसल्याने बोलण्याचा, व्यक्त होण्याचा मोकळेपणा सर्वांना मिळाला,तो सर्वांनी उपभोगला,अनुभवला.मध्यवर्ती विषय नसल्याने चर्चा रंगली, तरी तिला काही ठोस आकार मिळाला नाही. "येणाऱ्या काळात दोनच गोष्टी राहतील- एक, इंग्रजी भाषा आणि दुसरा आंतरजातीय विवाह ' इथून सुरवात झालेली चर्चा भटक्‍या कुत्र्यांबद्दल भूतदया दाखवण्याचे आवाहन करता करता रेबीज रोग किती घातक आहे, त्यासंदर्भात काय खबरदारी घ्यायला, हवी इथपर्यंत येऊन थांबली.गोमंतकीयांची मातृभाषा कुठली या प्रश्‍नाला स्पर्श केला गेला.त्याबद्दलच्या वादात न शिरता वक्‍त्याने मध्यममार्ग म्हणून "भारतीय भाषा'च्या जतन-संवर्धनाची भूमिका मांडली.इंग्रजी स्वीकारताना आपल्या भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणाची गरज अधोरेखित करण्यात आली. गोमंतकीयांचे साहित्य किती दर्जेदार, हाही प्रश्‍न उपस्थित केला गेला.वेळेअभावी त्यावर ऊहापोह झाला नाही.साहित्याचा समाजावर परिणाम होतो का, या प्रश्‍नावर होय- नाही अशी मते व्यक्त झाली.मराठी -कोकणी लेखक एकत्र येतात, कार्यक्रम संपला की आपापल्या वाटेने निघून जातात. असे न होता त्यांनी हातात हात घालून एकत्र वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.त्यावर पुढे कुणी काही बोलले नाही. आपल्याला हवे ते आणि तितके वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत नाही,शब्दांच्या-जागेच्या मर्यादा आड येतात, याविषयीची खंतही व्यक्त झाली.पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करूनही प्रकाशित करण्याचा योग जुळून येत नाही, प्रकाशनासाठी अर्थसाह्याच्या अनेक योजना कार्यरत असूनही पुस्तक प्रकाशित व्हायला दोन दोन वर्षे लागतात,अशीही खंत व्यक्त झाली. संस्कृती, भाषा यांच्या ऱ्हासाविषयी चिंता व्यक्त करताना पर्यावरणाचा होणारा नाश, बोडके होणारे डोंगर, आटत जाणारे पाण्याचे झरे, प्रशासन-राजकारणातील भ्रष्टाचार याविषयी तप्त-संतप्त उद्‌गारही निघाले.अनेकांनी आपल्या कविता सादर करून दाद मिळविली.कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी झालेल्या प्रत्येकाने अभिव्यक्तीला वाट मोकळी करून दिली. खुलेपणाने आणि दिलखुलास झालेल्या या कार्यक्रमाला लाभलेली निसर्गाची पार्श्‍वभूमी पुन्हा एकदा कधी तरी या ठिकाणाला भेट देण्याचा मोह मनात जागवून गेली.

राजन लोटलीकरांचे हे कुळागर तसे नव्याने विकसित होत असलेले दिसले. माडा पोफळीची एरव्ही कुळागरी गच्च गर्दी नव्हती, पण हिरवागर्दपणा भरपूर होता. भोजनासाठी दालन, कार्यक्रमासाठी दालन (बांबूपासून दरवाजे, खिडक्‍या बनविलेल्या या दालनाला भिंती नव्हत्या !), स्वच्छतागृहांचे तीनेक ठिकाणचे वेगळे ब्लॉक्‍स, शॉवर लावून केलेले रेन डान्सचे फ्लोअर, शॉवरबाथ, नैसर्गिक झरीला छान, कल्पकतेने दिलेले स्वीमिंग पूलचे स्वरूप,त्यात दिसलेले, आता अनेक गावातही दुर्मिळ झालेले करणकाटके हे छोटे मासे, तिथे फिश बाईटची केलेली योजना आणि सारी सैर संपल्यावर वनौषधी, झाडपाला घालून तापवलेल्या गरम पाण्यात पावले शेकून घेण्याची खास ट्रीट हा सारा सरंजाम कॅन्व्हासवरच्या चित्रासारखा मनावर रेखांकित होऊन राहिला. रॉक क्‍लाइंबिंगचा खेळ इथे उपलब्ध आहे. परंतु मुक्त संवादी कार्यक्रम आणि माडापोफळीच्या हिरव्यागंधित निसर्गकुशीतील वातावरणामुळे मन आकाशस्पर्शाला कधीच झेपावले होते.रॉक क्‍लायबिंगचा विचारही त्यात जमिनीवरच राहिला!

Thursday, March 4, 2010

"दिलखुलास' सोहळा

साहित्यनिर्मिती आणि प्रकाशन सोहळे, दोन्ही ऐन भरात आहेत.आठ पंधरा दिवसांनी गोव्यात पणजीत, नाही तर अन्य एखाद्या गावात,शहरात पुस्तक प्रकाशनाचा समारंभ ठरलेला.लेखकाचा, रसिकांचा आणि आयोजकांचाही याबाबतीतला उत्साह उतू जाणारा. इतक्‍या सातत्याने आणि सुविहितपणाने हे सोहळे होत आहेत, की एखाद्या कार्यक्रमानंतर लगेचच दुसऱ्या तशाच कार्यक्रमाची वर्दी नाही मिळाली,की चुकल्या चुकल्यासारखे वाटते. एवढी या कार्यक्रमांची आताशा सर्वांनाच सवय लागली आहे.त्याचे स्वागतही तेवढ्याच अप्रूपानिशी चाललेले असते. कार्यक्रमाच्या औपचारिकतेबरोबर नियमाने हजेरी लावणाऱ्यांमध्ये एक जवळिकीचे,आपुलकीचे नाते जुळून आले आहे.ते प्रत्येकवेळी नव्या ताजेपणाने दृढावत चाललेले आहे. गेल्या रविवारी असाच एक प्रकाशन सोहळा मडगावचे आमचे कविमित्र अशोक बोरकर यांनी चक्क नेत्रावळी येथील तानशीकरांच्या कुळागरात आयोजित केला. त्यांच्या "दिलखुलास' या कवितासंग्रहाचे प्रकाशन होते. कवितासंग्रहाच्या नावाप्रमाणेच कवी अशोक हे दिलखुलास व्यक्तिमत्वाचे. पणजीत होणाऱ्या "काव्यसंध्या' या मासिक कवितावाचनाच्या कार्यक्रमाला मडगावहून सपत्निक येऊन नियमित हजेरी लावणारे.त्यांच्या पत्नी कविता याही स्वतः उत्तम कवयित्री.(त्यांची एक कविता "गांधी तुम्ही आऊटडेटेड झालात' मी या ब्लॉगमध्ये दिली होती) कवितेवर इतक्‍या उत्कटतेने प्रेम करणारी माणसे फार क्वचित पाहायला मिळतात. त्यांच्या काव्यप्रेमाविषयी मला नेहमीच अप्रूप वाटत आले आहे.नेत्रावळीतील कुळागारात झालेल्या त्यांच्या पुस्तक प्रकाशनसोहळ्याचे एक वैशिष्ट्य मनात नोंदवले गेले, ते हे की बंदिस्त खोलीतून निसर्गाच्या सान्निध्यात, मोकळ्या वातावरणात होणारा असा हा पहिलाच समारंभ.छानशा मुक्त छंदातल्या कवितेसारखा हा कार्यक्रम होता. औपचारिकतेला बराचसा फाटा दिल्याने तो रंगलाही चांगला.कार्यक्रमानंतर तानशीकरांच्या मेनुतली फणसाची भाजी कित्येक वर्षांमागे बालपणात घेऊन गेली.तिची चव जिभेवर आणि बालपणी बाहेर धो धो पडणाऱ्या पावसामुळे अंगाभोवती रेंगाळणाऱ्या गारठ्याचा मधूनच कुडकुडवणारा स्पर्श अनुभवत ऊनशी भाजी खाण्यातल्या लज्जतीची आठवण मनात रेंगाळत आहे.

"दिलखुलास'च्या प्रकाशनाआधी बुडबडी तळीच्या पटांगणात त्यांच्या "आई ग' या आईविषयी असलेल्या कवितेच्या आणि तिच्याविषयीच्या काही लेखांचा समावेश असलेल्या पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ झाला.तो प्रसंग फारच हृद्य होता. अशोक बोरकर यांच्या आईला बुडबुडी तळी पाहायला यायचे होते. आजारपणामुळे त्यांना कधी ते शक्‍य झाले नाही.आता त्या हयात नसल्याने तो विषय राहिलेला नाही. त्यांची तळी पाहायला येण्याची अधुरी राहिलेली इच्छा त्यांच्यावरच्या पुस्तकाचे प्रकाशन करून त्या स्वरूपात पूर्ण केल्याच्या समाधानाचे काही कण कवीने पदरात बांधून घेतले आहेत.एखाद्या उत्कट मनाच्या कवीला, तरल संवेदनशील मनालाच अशी कल्पना सुचू शकते.त्याचे काही अमिट ठसेही माझ्या मनावर
उमटून आहेत.हा सोहळा अनुभवताना आठवणींची एक कविता माझ्या मनात सारखी कूस बदलत राहिली...