Saturday, February 27, 2010

कौशल्य

जगणे आले तेव्हापासून जगण्याची लढाईही सुरू झाली. माणूस जितक्‍या अवस्थांतून उत्क्रांत होत गेला, त्या प्रत्येक अवस्थेच्या टप्प्यात जगण्याच्या लढाईचे स्वरूपही तसतसे बदलत गेले. आदीम अवस्थेतून आता माणसांचे सुसंस्कृत जग अवतरले आहे. लढण्याची आयुधे, साधने, माध्यमे या साऱ्यांतच परिवर्तन घडलेले आहे. सुधारलेल्या, पुढारलेल्या जगातही जगण्याचे संदर्भ सुसंस्कृत-असंस्कृत अंगाने सारखे कूस बदलत आहेत. चढाओढ, स्पर्धा नित्य नवे रूप धारण करीत आहे. त्यातून पुढे निघून जाण्यासाठीच नव्हे, आहे तेवढे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीही आपली साधने, माध्यमे तपासून घेणे आणि ती अद्ययावत ठेवणे अपरिहार्य आहे. ती हाताळण्याचे तंत्र आणि कौशल्य आत्मसात करण्यापासून व्यतीत होणाऱ्या हरेक घटकेगणिक त्यांची धार, प्रखरता, गुणवत्ता वृद्धिंगत करीत राहणेही अपरिहार्य झाले आहे. अनेकदा असलेली कौशल्ये जुनी ठरतात, अपुरी पडतात. तेव्हा त्याच्या मिती वाढवाव्या लागतात किंवा नवी कौशल्ये संपादित करावी लागतात. ते नाही केले तर आपले अस्तित्वही बेदखल होऊन जाण्याचा किंवा नाकारले जाण्याचा धोका आहे. प्रवाहात टिकण्यासाठी, अग्रणी राहण्यासाठी किती कौशल्य असावे याचा काही ठोकताळा बांधावा लागतो. सरसकट अनुभवातून काही अंदाज ठेवून काही दक्ष माणसे त्या दृष्टीने तयारी करीत असतात. तरी अनेकदा फसगत होते. ती टाळण्यासाठी ज्या अनुभवांच्या आधारे आपण काही निष्कर्ष मांडतो, त्या अनुभवांचा दर्जा पडताळून पाहण्याबरोबरच, अनुभवाच्या पुढेही बुद्धीची नजरफेक करायला हवी.

एका जंगलात एका ठिकाणी एक हरीण लांब उडीचा सराव करीत होते. दहा फुटापर्यंत त्याची लांब उडी जात होती. त्याला अकरा फुटांचे लक्ष्य गाठायचे होते. काल वाघाच्या हल्ल्यात त्याच्या एका साथीदाराला जीव गमवावा लागला होता. वाघाने उडी मारून त्याचा मागचा पाय पकडून त्याला भक्ष्य केले होते. वाघाच्या उडीचे अंतर दहा फुटांचे होते. आणखी एक फूट लांबची उडी त्या हरणाला जमली असती, तर ते बचावले असते. या हरणाला जिवावरची ही जोखीम टाळायची होती. त्यासाठी जीव तोडून त्याचा सराव चालला होता.

त्याच जंगलात दुसऱ्या एका ठिकाणी एक वाघही लांब उडीचा सराव करीत होता. त्याचेही लक्ष्य अकरा फुटापर्यंत लांब उडी मारायचे होते. काल त्याने केलेल्या हल्ल्यात त्याला एक हरीण सापडले. त्याची उडी हरणाच्या मागच्या पायावर पडली. कसेबसे त्याला पंजात अडकवता आले. त्या हरणाची उडी अजून एका फुटाने लांब गेली असती तर काल वाघाला उपवास घडला असता. आपले भक्ष्य गाठण्यासाठी त्याला आपल्या उडीचा पल्ला एका फुटाने वाढवायचा होता. त्यासाठी त्याचाही कसोशीने सराव चालला होता.

जगण्याची लढाई, स्पर्धा प्रत्येक वेळी एका फुटाने कठीण होत असते. एक फुटाचा पल्ला वाढवून ती जिंकता येत नाही. त्यासाठी लक्ष्य दोन फुटांचे असायला हवे.

(प्रसिद्धी ःदै. गोमन्तक, 7 फेब्रुवारी 2010)

संकट

संकट कधी एकटे येत नसते, असे म्हणतात. एखादे संकट कोसळले, की संकटांची मालिकाच सुरू होते किंवा एकाच वेळी अनेक संकटे एकदमच एखाद्याला गाठतात. एखाद्याला एकच समस्या वारंवार छळत असते. तो कावून जातो. पण, समस्या काही सुटत नाही. चालताना पायाला ठेच लागून अंगठा दुखावला, की काही ना काही निमित्त होऊन तोच अंगठा ठेचकाळत राहतो; तसे काहीसे संकटांचे, समस्यांचेही होत असते. कमीजास्त फरकाने अनेकांचा हा अनुभव आहे. त्यातूनच वरील म्हणीचे बोल रूढ झाले असावेत. संकट एकटे येत नाही हे दुसऱ्याही एका अर्थाने खरे आहे. संकट येते किंवा समस्या निर्माण होते, तेव्हा सगळा अवकाश संकटाने किंवा समस्येनेच व्यापलेला नसतो. संकट आणि समस्या आपल्यासोबत त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आणि उपायही घेऊन येत असते. आपल्या लक्षात ते येत नाही आणि अनेकदा आपण संकटाचे, समस्येचे बळी ठरतो. चक्रव्यूहात शिरलेला अभिमन्यू तो छेदून बाहेर पडू शकला नाही. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता म्हणून नव्हे, त्याला तो माहीत नव्हता म्हणून. संकटे, समस्या आपल्याला पोटात ओढून घेतात, तेव्हा त्यांचा चक्रव्यूह चहूबाजूंनी असा पसरून राहतो, की दृष्टी, बुद्धी कुंठित होऊन जाते. आपला अभिमन्यू होऊन जातो. कधी कधी कुणी तरी आपसूकच आपल्याला यातून वाचवेल या आशेवर सारा भरिमार टाकून आपण निष्क्रिय बनून राहतो. आपोआपच संकटमुक्ती व्हावी, अशा इच्छेपोटी अकर्मण्य होऊन जातो. या मानसिकतेमुळे अनेकदा समोर आलेले संकटमुक्तीचे मार्ग आणि माध्यमे आपल्या लक्षात येत नाहीत. संकटातून सुटलो नाही, नुकसान सोसावे लागले, की देव-दैवाला बोल लावायला आपण मोकळे होतो. कधी तीही संधी मिळत नाही. संकटाला दुसरी बाजूही असते. तिथे त्यातून निसटण्याचा मार्गही असतो. संकट येते, तेव्हा त्याच्यासोबत असलेला सुटकेचा मार्ग हेरता आला पाहिजे. त्यासाठी बुद्धी सावध, मनाचे डोळे चौकस असायला हवेत. कुठल्याही स्वरूपाच्या लिप्ताळ्यापासून मन, बुद्धी मुक्त असायला हवी. तिथे चुकले, की संकटाने आपला ग्रास घेतलाच म्हणून समजावे.

एका मित्राने सांगितलेली ही गोष्ट ः नदीला पूर आला. गाव बुडू लागले. लोक धावत पळत, मिळेल ते वाहन घेऊन सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. एक देवभक्त झोपडीत होता. त्याला गाडी घेऊन आलेल्या त्याच्या मित्रांनी सोबत चलायचा आग्रह केला. तो नाही म्हणाला. "आपला देव आहे, तो सुखरूप वाचवेल,'असे सांगून त्याने मित्रांना मार्गस्थ केले. पाणी चढले. झोपडे बुडाले. देवभक्त शेजारच्या टेकडीवर चढला. होड्यांतून गावातली माणसे आली. चल म्हणाली. तो हलला नाही. टेकडीही बुडाली. तो झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. मदतकार्य करणारे सैनिक हेलिकॉप्टरने आले. त्याला आत घेऊ लागले. त्याने नकार दिला. आपला देव वाचवेल म्हणाला. ते निघून गेले. पाणी आणखी चढले. देवभक्त बुडू लागला. आयुष्यभर केलेल्या भक्तीचा हवाला देत वाचवायला येत नसल्याबद्दल देवाला शिणू लागला. मग शिव्या देऊ लागला.
देव प्रकटला. म्हणाला, "" शिव्या का देतोस. तुला वाचवायला मी गाड्या घेऊन आलो, होड्या घेऊन आलो, हेलिकॉप्टर घेऊन आलो. तू आला नाहीस.''
देवभक्त म्हणाला, ""तू कुठे आला होतास? आले होते माझे मित्र, गावकरी, सैनिक.''
देव ""म्हणाला, त्यांच्या रूपाने मीच तर आलो होतो!''

(प्रसिद्धी ः 24 जानेवारी 2010)

टेन्शनचे काम नाही

पणजीत साहित्य संस्कृती संमेलन सुरू आहे. संमेलनाध्यक्ष माधवी देसाई यांनी "बिझी' आणि "टेन्शन' हे दोन शब्द हद्दपार करण्याचे आवाहन लेखकांना केले. त्यांचे भाषण तिकडे चालले होते, नेमके त्याचवेळी मी इकडे कार्यालयीन कामात "बिझी' झाल्याने तिकडे जाऊन मला काही ते ऐकता आले नाही. पण मी त्याचे "टेन्शन' न घेता दुपारी संमेलनाच्या एका कार्यकर्त्याने आणून दिलेले त्यांचे लेखी भाषण वाचून काढले.

खरे तर गोव्याच्या संस्कृतीमध्ये, खास गोमंतकीय म्हणून जी जीवनशैली आहे, तीत "बिझी' आणि "टेन्शन' या शब्दांना मुळातच स्थान नाही. नसलेल्या या शब्दांना हद्दपार करण्याचा प्रश्‍न येतच नाही. पण, माधवी देसाई म्हणाल्या ते खोटेही नाही. या शब्दांनी गोमंतकीयांची नजर चुकवून त्यांच्या जीवनात कुठेतरी चंचुप्रवेश केला आहे. काही ठिकाणी अतिक्रमण केले आहे. काहींनी सताड दार उघडून त्यांचे स्वागतही केले आहे. तात्पर्य, हे मुळातले उपरे शब्द गोवेकरांच्या जीवनात घुसलेले आहेत. बदलती जीवनशैली आणि तिला अंगीकारण्याचा मोह, काहींच्या बाबतीत नाइलाज असेल, यामुळे "बिझी', "टेन्शन' हे शब्द आणि त्याचे परिणाम आमच्या जीवनात डोकावू लागले आहेत. जीवनशैलीचे परिणाम म्हणून रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या शारीरिक आणि ताण, डिप्रेशन यांसारख्या मानसिक आजारांनी घराघरांत हातपाय पसरले आहेत. आधी आजार ओढवून घ्यायचे आणि नंतर त्यावर उपचार करीत बसायचे, अशी नवी जीवनशैली आता रुळते आहे. ताण हा यातला सर्वांत जास्त हातपाय पसरलेला आजार आहे. ताण आला की मग त्यावर उतारा म्हणून ताण व्यवस्थापन, त्यासंबंधी व्याख्याने, योग, ध्यानधारणा किंवा अन्य प्रकारचे कोर्सेस हे सगळे सध्या जोरात सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी एक अंकज्योतिषी भेटला. आधुनिक होता. त्याच्या विचाराची सारी बैठक विज्ञाननिष्ठ होती. अंकज्योतिष हा त्याचा छंद होता. तोही ताणावर मात कशी करायची असते याविषयी बराच वेळ बोलत होता. त्याचे ऐकून घेतले. मी ताण व्यवस्थापनातला तज्ज्ञ नसल्याने ऐकून घेण्याशिवाय माझ्यापाशी पर्याय कुठे होता. त्याला पुरे म्हणून थांबवणे शक्‍य होते, पण ते शिष्टाचारात बसत नव्हते. शिवाय, मी ज्या स्वरूपाचे काम करतो, त्याचा माझ्यावर प्रचंड ताण पडत असल्याचे मानून, त्यातून मला मार्ग दाखवण्यासाठी तो अतिशय आपुलकीने बोलत होता. त्याच्या भावना का दुखवायच्या? त्याचे बोलून झाल्यावर, खूप वर्षांपूर्वी "चांदोबा'त वाचलेली एक गोष्ट मी त्याला सांगितली, ती अशी ः

बारमाही कधीही वादळवारे, पाऊस पडणाऱ्या एका प्रदेशात एका धनिक शेतकऱ्याला घरकामासाठी, तबेला व घोड्यांची निगा राखण्यासाठी एक नोकर हवा होता. एका सकाळी एक मरतुकडासा मुलगा त्याच्याकडे आला. त्याने नोकरी मागितली. "तू काय काय करू शकतोस?' असे मालकाने थोड्याशा टाळण्याच्या सुरातच त्याला विचारले. मुलगा म्हणाला, "वादळीवाऱ्यासह गडगडाटी धुवाधार पाऊस पडत असताना मी रात्री गाढ झोपू शकतो !'
वेगळं वाटलं. शहराला जायची घाईही होती. त्याने मुलाला ठेवून घेतले. आठवड्याचा बाजारहाट करून तो आला. थकला होता. लगेच झोपायला गेला. मध्यरात्री सोसाट्याचा वारा, मोठा गडगडाट घेऊन धुवाधार पाऊस सुरू झाला. त्याची झोपमोड झाली. बाहेर पटांगणात गवत वाळायला टाकले होते. तबेल्यात घोड्यांसाठी गवत भरलेले नव्हते. पाणीही ठेवलेले नव्हते. त्याला काळजी वाटली. त्याने नोकराला जोरजोरात हाका मारल्या. त्याचा प्रतिसाद मिळाला नाही. घरात तो कुठेच नव्हता. शिव्या घालीत मालकाने रेनकोट चढवला; छत्री, विजेरी घेतली. माळावर गेला. सर्व गवत आवरून, त्याचे ढीग करून आच्छादून ठेवलेले दिसले. तसाच धावत तबेल्यात गेला. गव्हाणीत गवत, पाण्याची पातेली भरून ठेवलेली दिसली. घोडे चारापाणी खाऊन समाधानाने झोप घेत होते. त्याने कुतूहलाने पाहिले, वरच्या माळ्यावर जागा स्वच्छ करून त्याचा नवा नोकर शरीराचे मुटकुळे करून घोरत होता! निसर्गाचे एवढे तांडव बाहेर चालले होते, ते त्याच्या गावीही नव्हते.

नोकर शांत झोपू शकला. कारण त्याला ताण नव्हता. का नव्हता? झोपायला जायच्या आधीच त्याने आपली सर्व कामे व्यवस्थित पूर्ण केली होती. तिथे ताणाला आत शिरायला फटच नव्हती!

(प्रसिद्धी ः दै. गोमन्तक, 17 जानेवारी 2010)

सलाम

नव्या वर्षासाठी शुभेच्छांचे संदेश आठवडाभर मोबाईलवर येत होते. मित्रांचे, परिचितांचे. कुठे कधी तरी गाठभेट झालेल्यांपैकी काहींनी मोबाईल नंबर शोधून शुभेच्छा पाठविल्या. त्याचे कौतुकच वाटले. अशा प्रसंगी शुभेच्छा पाठवायचा मला कायम कंटाळा. "सेम टू यू'चा संदेशही पाठविणे मला होत नाही. मला ते सारे कृत्रिम वाटते. प्रत्यक्ष भेटीत मात्र शुभेच्छांची देवाणघेवाण होते. मला या प्रकाराचा आळस असला, तरी कुणी पाठविलेला शुभेच्छा संदेश वा कार्ड मिळाले की आनंद वाटतो. त्यापेक्षा मला जो शुभेच्छा देत असतो, त्याला त्याचा जास्त आनंद वाटत असतो, याबद्दल मला खात्री आहे. त्याला आनंद वाटण्यात माझे काही कर्तृत्व नाही, तरी कुणाला आनंद साजरा करायला मिळतो हेच मला अधिक आनंददायी वाटते. माझ्याकडून प्रतिसाद जात नसतानाही जे न चुकता संदेश पाठवीत राहतात, त्यांचे तर मला अप्रूपच वाटते.(त्यात आता या लिहिण्याला निमित्त दिल्याच्या आनंदाची भर!) आपल्याला माहीत नसतेच, पण अशी किती माणसे आपल्या किती साध्या साध्या कृतीतून आपल्या जीवनात आनंद पेरत असतात !

आपल्या अवतीभवतीची माणसे आणि आपणही वर्षभर या ना त्या निमित्ताने शुभेच्छांची देवाणघेवाण करीत असतो. त्यात नव्या वर्षाच्या शुभेच्छांची एक गंमत लक्षात आली आहे. आपल्या देशात डझनावारी धर्म, पंथ नांदतात. त्या प्रत्येकाचे वेगळे कालगणनावर्ष आहे. त्याचे वर्षारंभ साजरे केले जातात. शुभेच्छांची देवाणघेवाण होते. त्या प्रत्येकालाच जानेवारीचा पहिला दिवस उजाडला की नववर्षाच्या शुभेच्छा मिळत असतात. एका वर्षात दोनदा नवी वर्षे आपल्या जीवनात अवतरतात. एक पहिल्या जानेवारीला आणि पाडव्याला. बॅंकेच्या खात्यात असलेले पैसे संपायच्या आधीच आणखी पैशाची भर पडल्यावर कसे सुखद वाटते! जानेवारीला मिळणाऱ्या शुभेच्छांचा उबारा ताजा असताना नव्याने भरभरून येणाऱ्या शुभेच्छा मनाची पोतडी उतू जाईपर्यंत भरून जाते. बाकी कशाने असेन नसेन, शुभेच्छांच्या दौलतीने मी तरी भरपूर श्रीमंत झालो आहे.

नव्याचे अप्रूप सर्वांना आणि सर्व काळ असते. नवीन वर्ष साजरे करताना त्याच त्याच पठडीतल्या शब्दांतले शुभेच्छा संदेश किती काळ चालतील? दर वर्षी त्यात काही नवी रचना करण्याचे माझ्या काही मित्रांचे प्रयत्न मला जाणवत आले आहेत. त्यातला एक नमुना सांगावासा वाटतो. एका मित्राने पाठविलेला हा संदेश आहे ः
"2010 उजाडत आहे. तुला नवीन वर्ष आनंदाचे जावो आणि त्याचबरोबर तुला 26 जानेवारीच्या..व्हॅलेंटाइन डेच्या... होळीच्या ... पाडव्याच्या ...15 ऑगस्टच्या .. वाढदिवसाच्या ..लग्नाच्या वाढदिवसाच्या .. मुलाच्या वाढदिवसाच्या... मुलीच्या वाढदिवसाच्या .. चतुर्थीच्या.. दिवाळीच्या.. नाताळच्या ...जागतिक--- दिनाच्या... पितृदिनाच्या ... शिक्षक दिनाच्या ... बालदिनाच्या ..या-- दिनाच्या , त्या--- दिनाच्या ... हार्दिक शुभेच्छा. शुभ सकाळ.. शुभ संध्याकाळ .. शुभ रात्री...बघ, साला, रोज का ड्रामाही खतम! मी तुला शुभेच्छा देणारा पहिला. आता पुऱ्या वर्षात म्हणू नकोस, मी शुभेच्छा दिल्या नाहीत...!'

घाऊक शुभेच्छा देण्याचा असा प्रकार याआधी कुणी केला, अनुभवला होता का?

एक वेगळा छान संदेश आला होता.

हा संदेश तीन लघुत्तम कथांमध्ये गुंफलेला आहे.
"पहिली कथा ः एकदा एका गावातील सर्वांनी पाऊस पडावा यासाठी प्रार्थना करायचे ठरविले. प्रार्थनेच्या दिवशी सगळे गावकरी एकत्र जमले. त्यांच्यातील एकच छोटा मुलगा छत्री घेऊन आला होता.
ती श्रद्धा होती !

दुसरी कथा ः तुम्ही जेव्हा छोट्या मुलाला हवेत उडविता, तेव्हा ते खिदळते, हसते: कारण त्याला माहीत असते, तुम्ही त्याला झेलणार आहात.
तो विश्‍वास असतो !

तिसरी कथा ः प्रत्येक रात्री आपण झोपी जातो, तेव्हा दुसऱ्या दिवसाची सकाळ पाहूच याची खात्री नसते. तरी दुसऱ्या दिवसासाठी आपण काही कार्यक्रम आखलेले, काही करायचे ठरविलेले असते.
ती आशा असते !

नवे वर्ष तुम्ही श्रद्धा, विश्‍वास आणि आशा यांसह साजरे करा.'
चला, कंटाळा टाकून हे दोन शुभेच्छा संदेश मी तुम्हाला फॉरवर्ड करतो.

(प्रसिद्धीःदै. गोमन्तक, 7 जानेवारी 2010)

Friday, February 5, 2010

मध्यंतर

तब्बल दहा महिन्यांच्या मध्यंतरानंतर आज पुन्हा उपस्थित होत आहे.मध्यंतर वाजवीपेक्षा जास्तच लांबले आहे.त्याचे वैषम्य आहेच. पण पुरते, थांबून जाण्यापेक्षा लांबणे कधीही चांगले.मध्यंतरात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या आहेत.आपण माणसे. आपले कार्यकलाप लांबतात, थांबतात. काळाचे तसे नाही. तो थांबत नाही, आणि लांबतही नाही.त्यामुळे त्याचे कार्यकलाप निरंतरपणे सुरूच असतात.त्यामुळे माझे मध्यंतर घडले असले,तरी काही ना काही घडत होतेच. ती काळाची देणगी आहे.काळाचा एक तुकडा प्रत्येकाच्या वाट्याला येतो. त्याला आम्ही आयुष्य म्हणतो.काळाच्या निरंतर प्रवाहात सतत घडत असणारे काही ना काही ज्याच्या त्याच्या आयुष्याला लगडून जात असते.त्याचे सातत्य असते.ते काही लांबत नाही. थांबते तेव्हा आयुष्यही थांबलेले असते.त्यामुळे बऱ्याच गोष्टी घडलेल्या असणे साहजिक आहे.त्याबद्दल अधूनमधून कधी तरी लिहायचे आहे. नव्याने सुरवात करायची आहे,त्याची ही एक प्रकारची प्रस्तावना.

गेल्या महिन्यात थोड्या वेगळ्या शैलीत लिखाण केले. त्याचे चार ते पाच लेख "गोमन्तक"मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.ते या ब्लॉगवर टाकून नव्या प्रारंभाचा संकल्प सोडीत आहे.त्याचे मध्यंतर कधी येईल की थेट पूर्णविरामच पडेल, हे माहीत नाही.सांगताही येणार नाही. काळाकडून शिकण्यासारखी एक गोष्ट आहे.तो सारखा चालतोच आहे. त्याला भगवद्‌गीतेमधील शिकवण कुणी दिली असेल का ? की त्याच्या सततच्या चालण्यातूनच ती शिकवण प्रसवली गेली असेल ? काळाइतकाच गूढ, गहन असा हा प्रश्‍न आहे. आयुष्यात समांतरपणे चालणारे असे काही प्रश्‍न असतात.असावे लागतातही. ते आपल्या आयुष्याची गती राखण्यास वंगणासारखे काम करतात.प्रेरकाची भूमिकाही निभावतात. आपल्याला गवसलेले, न गवसलेलेही त्या काळालाच अर्पण करून आपण चालत राहायचे!