Tuesday, February 17, 2009

हिंसकतेची होळी करा

व्हॅलेंटाईन डेला विशेष उपद्रवकारक घटना घडल्या नाहीत. काही ठिकाणच्या तुरळक घटना वगळता हा दिवस बऱ्यापैकी "प्रेमपूर्वक' साजरा केला गेला. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास विरोध करणाऱ्या घटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने संस्कृतीच्या नावाखाली उपद्रव आणि हिंसाचार माजवण्याच्या योजनांना लगाम बसला. कर्नाटकातील राम सेनेला गुलाबी चड्ड्या भेट पाठविण्याच्या महिलांच्या अहिंसक निषेध मोहिमेचाही परिणाम झाला. 14 फेब्रुवारी उलटून गेल्यावर आता या चड्ड्यांच्या विल्हेवाटीचा प्रश्‍न राम सेनेसमोर आहे. चड्ड्या पाठविणाऱ्यांना परतीची भेट म्हणून साड्या पाठविण्याचे आधी ठरले होते. ते बहुतेक बारगळले आहे. या चड्ड्या अनाथाश्रमात पाठवायचा विचार झाला. त्यानंतर ज्या मुलींना त्या पाठविल्या त्यांच्या पालकांकडे त्या पाठवायच्या ठरले. नंतर त्यांचा जाहीर लिलाव पुकारायचा विचार पुढे आला. आता सरते शेवटी त्यांची होळी करायचे निश्‍चित झाले आहे. ते प्रत्यक्षात आल्यावर चड्ड्यांचा विषय संपून जाईल. परंतु संस्कृतिरक्षणाच्या आणि त्यानिमित्ताने नवीन पिढीला आपली भारतीय संस्कृती शिकविण्याच्या राम सेनेच्या आततायी प्रयत्नांमध्ये एका कोवळ्या जिवाची होळी झाली, त्याचे काय?

बंगळूरमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीला दुसऱ्या धर्मातील मुलांबरोबर एकत्र पाहून संस्कृतिरक्षकांनी अवमानित केले. त्या मुलाला मारहाणही केली. अवमान जिव्हारी लागल्याने मुलीने दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली.त्या मृत्यूची जबाबदारी कुणीच घेणार नाही. तिच्या वडिलांनीही संस्कृतिरक्षकांच्या धाकदपटशामुळे मुलीने आत्महत्या केली नसल्याचे सांगितले आहे. त्यांना वाटले ,तरी दुसरे काही सांगता येणार नाही. मरणारा मरून गेला, जगणाऱ्याला मागे राहिलेल्या दहशतीचा मुकाबला करणे भाग असल्याने, तेवढे धाडस आणायचे कोठून असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला असेल. त्यात त्यांनी मात स्वीकारली, असे सहज अनुमान काढता येते.वडिलांनी अशी कबुली दिल्यामुळे ज्यांनी गुंडगिरी केली, ते आपसूकच मोकळे राहिले. त्यांच्या संवेदना थोड्याशाही जाग्या असतील, तर त्यांनी अशा तऱ्हेने संस्कृतीचे रक्षण करता येते का, असा प्रश्‍न स्वतःलाच विचारून पाहावा.

भारताने अनेक परकीय आक्रमणे पचविली. आक्रमकांच्या संस्कृतीही पचविल्या. भारताने दुसऱ्यावर आक्रमण केल्याचे, आपली संस्कृती दुसऱ्यावर लादण्याचे प्रयत्न केल्याचे उदाहरण नाही. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असलेल्या आपल्या देशात दुसऱ्यावर संस्कृतीच्या नावाखाली आपले विचार लादण्याचा अट्टहास का केला जातो आहे? दुसऱ्याच्या अभिव्यक्तीचा बळाचा वापर करून संकोच करण्याची ही कुठली संस्कृती आहे ? मंगळूरमधील किंवा अन्य कुठल्याही संस्कृतिरक्षकांना दुसऱ्यांना काही संस्कृती शिकवायची असेल,तर तिची पद्धत मुळात सुसंस्कृतपणाची हवी. बळजबरी,मारहाण करणे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे काय? म्हटल्याबरोबर दुसऱ्यानेही तसेच वागले पाहिजे, हा हट्टाग्रह का ? ही असहिष्णुता का ? सहिष्णुता आणि संयम हाही आपल्या संस्कृतीचा विशेष आहे. त्या सर्वांना हरताळ फासून कुठल्या संस्कृतीचा पुरस्कार केला जात आहे ? दुसऱ्यांनी संस्कृती पाळण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी आपल्या पायाकडे आधी पाहावे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या मार्गाने संस्कृती शिकविता येणार नाही. ज्यांना ती शिकवायची, सांगायची आहे. त्यांची मने,विचार, भावना आधी समजून घेतल्या पाहिजेत.त्यांची संवेदनशीलता जपली पाहिजे. एखाद्याचे प्राण जाण्यासारखी स्थिती निर्माण करून संस्कृती जपता येणार नाही. संस्कृती जपण्यासाठी आधी माणसे जपली पाहिजेत,जगवली पाहिजेत. या संस्कृतिरक्षकांनी त्यासाठी गुलाबी चड्ड्यांबरोबर स्वतःमधील आततायीपणाची, अरेरावीपणाची आणि हिंसकपणाची होळी करावी.

नवे डावपेच गरजेचे

स्वात प्रांतामध्ये शरीयत कायदा लागू करण्याची मागणी मान्य करून पाकिस्तानने तालिबानपुढे सपशेल शरणागती पत्करली आहे.तालिबान पाकिस्तानवर कधीही कब्जा करू शकेल, अशी अगतिक कबुली दोनच दिवसांपूर्वी अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी दिली होती. पाकिस्तान आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असल्याचे केविलवाणेपणाने सांगितले होते. लढाईचे शब्द हवेत विरण्याआधीच पाकिस्तानने शस्त्रे म्यान केली आहेत.स्थानिक तालिबानी संघटनेशी शरीयत कायदा लागू करण्यासंबंधी केलेल्या करारामुळे पाकिस्तानचा मलकंद भाग, ज्यात स्वात खोऱ्याचा समावेश होतो, शरीयतचा अंमल लागू होणार आहे. तालिबानी संघटनेने गेल्या काही वर्षात स्वात भागात उच्छाद मांडला आहे. महिलांवर शिकण्यास बंदी घातली आहे.त्यापायी अनेक शाळा जमीनदोस्त करून टाकल्या. संगीत ऐकण्यास, कोणत्याही स्वरूपातच करमणुकीस बंदी, असा त्यांचा जाच सुरू आहे. त्यांच्या अत्याचारामुळे या भागातून गेल्या काही वर्षात हजारो लोक परागंदा झाले आहेत. पाकिस्तान सरकार तालिबान्यांच्या कारवायांना पायबंद घालू शकले नव्हते.पाकिस्तानातील लष्कर आणि आयएसआयचा या शक्तींना छुपा पाठिंबा आहे.पाकिस्तानी लष्करालाही मनापासून तालिबानी शक्तींविरुद्ध लढायचेच नसल्याने त्याचा बीमोड करायचा प्रामाणिक प्रयत्न झाला नाही. त्यामुळे राजकीय नेतृत्व त्यांच्यापुढे हतबल ठरले आहे. शरीयत लागू करण्यास मान्यता दिल्याने तालिबानी शक्ती अधिक प्रबळ होण्यास मदत होणार आहे.अन्य भागातूनही या स्वरूपाच्या मागण्या पुढे करण्याची व्यूहरचना राबवून सरकारला जेरीस आणण्याचे प्रयत्नही केले जातील. आपल्या अस्तित्वाची लढाई लढण्यासाठी पाकिस्तान ताठ उभा राहू शकत नाही,अशी स्थिती निर्माण झालेली आहे.

स्वात भागातील ताज्या घडामोडीमुळे तालिबानी दहशत भारताच्या सीमेपर्यंत पोचली आहे. पाकिस्तानचा बराचसा भूभाग तालिबानी वर्चस्वाखाली आल्याने या घटकांपासून असलेला धोका भौगोलिकदृष्ट्याही जवळ आलेला आहे, हा भारताच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. पाकिस्तानात हातपाय पसरत असलेल्या तालिबानचा योग्यवेळी बंदोबस्त करण्याबाबत "सौम्यपणा' स्वीकारण्यात आला, असेही झरदारी यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यावर आहे. पाकिस्तानमध्ये सत्तेवर कुणीही राहिले असले,त्यांना हा "सौम्यपणा' अपरिहार्यपणे स्वीकारावाच लागला असता. सत्ताधिकाराचे चालन करणाऱ्या शक्ती वेगळ्याच होत्या. "सौम्यपणा'मागे त्याची निश्‍चित भूमिका होती,ती डावलणे कुणालाही शक्‍य झाले नसते.त्या शक्तींनी शत्रू मानून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कार्यक्रम राबविला. तालिबान आणि अल कायदाच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेने डावपेचात्मक धोरणाचा भाग म्हणून पाकिस्तानला जवळ केले. भारताने वेळोवेळी सांगूनही पाकिस्तानशी जवळिकीला प्राधान्य दिले. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा पुरविला. त्याचा उपयोग पाकिस्तानने आपली लष्करी ताकद व शस्त्रसज्जता भारताविरुद्ध वापरण्याच्या दृष्टीने वाढविण्यासाठी केला. भारतात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी केला. भारताने याविषयी वारंवार सावध करूनही, त्याविषयी चिंता व्यक्त करूनही त्याची पुरेशी दखल अमेरिकेने घेतली नाही. त्याचे फलित आज असे निघाले आहे,की पाकिस्तान खुद्द त्याच्या भूमीत शिरलेल्या दहशतवादी घटकांचा मुकाबला करण्यास समर्थ उरलेला नाही आणि दहशतवादविरोधी लढ्यातही अपेक्षेइतका सक्षम साथीदार राहिलेला नाही.उलटपक्षी त्याच्याकडील अण्वस्त्रासारखा विद्‌ध्वंसक शस्त्रसंभार आणि त्याचे नियंत्रण दहशतवादी अथवा त्या देशातील मूलतत्त्ववादी घटकांकडे जाण्याची शक्‍यता दिसू लागली आहे. पाकिस्तानच्या सीमेवर आणि त्याच्या भूमागात बस्तान ठोकलेल्या तालिबानी आणि अल कायदाच्या दहशतवादाचा भारत,अमेरिका आणि खुद्द पाकिस्तानलाही सर्वाधिक धोका निर्माण झालेला आहे.अमेरिकेलाही या वास्तवाची आता जाणीव झालेली आहे.सद्यःस्थितीतील पाकिस्तानवर भिस्त ठेवून दहशतवादविरोधी लढा निर्णायक करता येणार नाही.दहशतवादावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिकेला आता वेगळे डावपेच आणि व्यूह रचावा लागेल.

Sunday, February 15, 2009

विश्‍वास जागवणारा निवाडा

देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी बालहत्याकांडाप्रकरणी नोयड्यातील उद्योजक मोनिंदरसिंग पंधेर आणि त्याचा घरगडी सुरिंदर कोली यांना विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश रमा जैन यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षापूर्वी पंधेर यांच्या बंगल्याजवळील गटारात मानवी हाडे, कवट्या आणि अन्य मानवी अवशेष सापडल्यानंतर सुन्न करणारी भीषण हत्यामालिका उघडकीस आली होती. जवळच्या निठारी गावातील मुलांना फूस लावून पळवायचे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, बलात्कार करायचे,त्यांना ठार करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावायची, अशा अमानुष पद्धतीने सतत दोन वर्षे पंधेर यांच्या बंगल्यात मानवी हत्यासत्र सुरू होते.मुले आणि महिला अशा 19 जणांची हत्या करण्यात आली. त्याप्रकरणी गेली दोन वर्षे विशेष न्यायालयात खटले सुरू असून त्यातील रिम्पा हलदर या 14 वर्षीय मुलीच्या बलात्कार व हत्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.एकूण खटल्यांतील हा पहिला निकाल आहे.

या हत्याकांड प्रकरणात नोयडा पोलिसांचा एकूण कारभारच संशयास्पद आढळून आला होता. निठारीतील मुले बेपत्ता होण्याचे प्रकार दोन वर्षाहून अधिक काळ सुरू होते. पोलिसांना त्याचा सुगावा लागत नव्हता, उलटपक्षी तक्रारदारांना मिळणारी वागणूकही योग्य नव्हती.मुला-महिलांचे अवशेष गटारात आढळून आल्यानंतर त्यांच्या बेपत्ता होण्यामागचे रहस्य उलगडले होते. पोलिसांकडून गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे घेतलेल्या सीबीआयने पंधेर यांना हलदर आणि अन्य दोन मृत्यूप्रकरणात क्‍लीन चीट दिली होती. आरोपपत्रात त्याच्यावर दोषारोप न ठेवण्याच्या आपल्या भूमिकेचे न्यायालयात समर्थनही केले होते. असे असूनही न्यायाधीशांनी पंधेर यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा म्हणजे सीबीआयच्या मुखात चपराक असल्याचे हत्याकांडात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांतर्फे खटला चालविणारे वकील खलीद खान यांनी व्यक्त केली आहे.तर या देशातही गरिबांना न्याय मिळू शकतो, याबद्दलचा विश्‍वास दृढ करणारा हा निकाल असल्याची या कुटुंबीयांची प्रतिक्रिया आहे. पंधेर यांच्या मुलाने आपले वडील निर्दोष असल्याचे सांगताना प्रसारमाध्यमांनी गहजब केल्याने आणि न्यायप्रक्रिया प्रभावित केल्याने एका निष्पाप व्यक्तीला शिक्षा झाल्याचे म्हटले आहे. उच्च न्यायालयात निकालाविरुद्ध दाद मागण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. सीबीआयची याबाबतची भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही. अजून काही खटल्यांचे निकाल लागायचे आहेत. न्यायप्रक्रिया आपल्या मार्गाने पुढे सुरू राहणार आहे. जो निवाडा झाला आहे, तो न्यायसंस्थेवरचा विश्‍वास जागवणारा आहे, परंतु त्याचे महत्त्व त्याहीपलीकडचे आहे. कदाचित गुन्हेगारीसंबंधी खटल्यातील न्यायप्रक्रियेला मार्गदर्शक ठरणारा हा निवाडा असेल.

रिम्पा हलदर हिच्या खुनाच्या वेळी पंधेर परदेशात होते,त्यामुळे त्याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा युक्तिवाद सीबीआयने केला होता,अन्य दोन प्रकरणात पंधेर दूरच्या गावी असल्याचे आणि "कायदेशीरदृष्ट्या स्वीकारार्ह पुरावे" पंधेरविरुद्ध नसल्याचे म्हणणे सीबीआयने न्यायालयापुढे मांडले होते. वेगळ्या शब्दात "गुन्हेगारी कटात सहभागा'साठी ज्या स्वरूपाची सामग्री ग्राह्य मानली जाते ,तशी ती पंधेरविरुद्ध नव्हती, हा सीबीआयचा पवित्रा होता.गुन्ह्याच्या वेळी पंधेर परदेशात होते हे मान्य करूनही न्यायाधीशांनी गुन्ह्यातील सहभागाबद्दल पंधेर यांना दोषी धरले आहे.

सुरिंदर कोली हा मनोविकृत असल्याचे प्रारंभिक तपासाच्या वेळी सांगण्यात येत होते.त्याला मृतांशी कामक्रीडेची, मृताचे मांस खाण्याची विकृती असल्याचे सांगण्यात येत होते. जो भीषण हत्यासत्र घडले त्याला तोच सर्वस्वी जबाबदार असल्याचे चित्र सुरवातीला दाखवले गेले होते. मात्र, न्यायाधीशांनी अव्यक्त शब्द वाचले आणि त्याचे अर्थ उलगडले.त्यामुळे पंधेरला शिक्षा सुनावली जाऊ शकली.

आपले वडील निर्दोष आहे म्हणणाऱ्या पंधेरच्या मुलांने वडिलांच्या घरात चालणाऱ्या लैंगिक चाळ्यांकडे दुर्लक्ष केलेले दिसते. स्वतः पंधेर यांनीही काही मुलींशी संबंध असल्याचे मान्य केले आहे. कोली पंधेरकडे कामाला येण्यापूर्वी अनेकांकडे नोकरीला होता. तेव्हा त्यांने हत्या केल्याचे उघड झालेले नाही. जे हत्यासत्र घडले, ते पंधेरकडे आल्यानंतरच, 2004 ते 2006 या दोन वर्षात.त्याचा अजिबात सुगावा पंधेर यांना लागला नाही, हत्या केल्यानंतर घरातच पोलिथिन बॅगात भरून ठेवलेल्या मानवी अवयवाची दूरवरही पोचेल अशी दुर्गंधी पंधेर यांना कधीच जाणवली नाही, हे अविश्‍वसनीय आहे. पंधेर यांची जीवनशैली कोलीमधील "गुन्हेगारी प्रवृत्ती' जाग्या व प्रकट करण्यास कारणीभूत ठरली. पंधेरचे घरात चालणारे लैंगिक चाळे "लैंगिक सुखाला वंचित' असलेल्या कोलीला उत्तेजित करणारे ठरले आणि त्याचा आविष्कार विकृतपणे घडला.कोली याने दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या जबानीच्या आधार घेत अशा आशयाच्या निरीक्षणातून न्यायाधीशांनी दोष निश्‍चिती केल्याचे जाणवते.पंधेर यांनी कट रचला आणि त्याच्या नोकराने तो प्रत्यक्षात आणला, असा निष्कर्ष मांडून न्यायाधीशांनी निवाडा केला आहे. एक प्रकारे गुन्ह्याचा शोध घेऊन निर्णय केला आहे. सीबीआय नेमक्‍या याच भूमिकेत चुकले आहे.

Friday, February 13, 2009

पाकिस्तानची कबुलीं

मुंबईत झालेल्या हल्ल्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध सातत्याने नाकारणाऱ्या पाकिस्तानने अखेर हल्ल्याच्या अर्ध्याअधिक कटाची आखणी आपल्या भूमीत झाल्याची कबुली गुरुवारी दिली. भारताने दिलेल्या पुराव्याची ती केवळ "माहिती' असल्याची संभावना करण्यापासून कसाब पाकिस्तानी नागरिक असल्याचेच अमान्य करण्यापर्यंत आणि देशाबाहेरील घटकांचेच ते कृत्य असल्याचा मानभावीपणा करण्यापर्यंत भूमिका घेत, शब्दांचे खेळ करीत आपण नामानिराळे राहण्याचे हर तऱ्हेचे प्रयत्न पाकिस्तानने मुंबईवरील हल्ल्यानंतरच्या गेल्या जवळपास ऐशी दिवसात केले.भारताने दिलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने स्वतंत्र चौकशी करण्याचे नाटक वठवून साऱ्या प्रकारातून हात झटकण्याचे प्रयत्न केले. रोज वेगवेगळ्या उपपत्ती मांडून, कधी काश्‍मीर प्रश्‍नाची सरमिसळ करून आपल्यावरील रोख दुसरीकडे वळविण्याचे प्रयोगही केले.आपणही दहशतवादाचे बळी असल्याचे भासवीत आपल्याविषयी सहानुभूती निर्माण करण्याबरोबर त्याच्याच भूमीतून प्रसवणाऱ्या दहशतवादाची गेली काही वर्षे खरोखर झळ सोसणाऱ्या भारताच्या जोडीला स्वतःला बसविण्याचा डाव खेळत दहशतवादविरोधी लढ्यात आपला सहभाग प्रामाणिकपणाचा असल्याचे ठसविण्याचा खेळही त्याने करून पाहिला. जग त्याच्या या कांगाव्याला फसले नाही. भारताने आणि अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) या गुप्तचर संस्थेने मुंबईतील हल्ल्यासंदर्भात दिलेले सबळ पुरावे,भारताने आपल्या मुत्सद्देगिरीने जगभरातून कारवाईसाठी आणलेला दबाव आणि अमेरिकेचा थेट दबाव यामुळे पाकिस्तानला कटातील सहभागाची कबुली देणे भाग पडले आहे. जे पाकिस्तान अजिबात मान्यच करायला तयार नव्हता, त्याची किमान काही कबुली त्याने दिली ही पुढे काही कारवाई केली जाण्यासंदर्भात पडलेले पहिले सकारात्मक पाऊल आहे. भारत आणि अमेरिकेने त्याचे तेवढ्या मर्यादेत स्वागत केले, हे योग्यच होय.

पाकिस्तानने कटाचा काही भाग आपल्या भूमीत शिजल्याचे मान्य करताना नेहमीसारखी काही चलाखीही केली आहे. हल्ल्यासाठी खुद्द अमेरिकेसह पाच देशातील यंत्रणांचा वापर केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. भारतासाठी त्याने तीस मुद्‌द्‌यांवर प्रश्‍नावली तयार केली आहे. कटासंदर्भात तपास पूर्ण करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी या प्रश्‍नांची उत्तरे त्याला आवश्‍यक वाटतात.दहशतवाद्यांना भारतात मोबाईलची सिम कार्डे कशी उपलब्ध झाली, गुजरातच्या किनारपट्टीत दहशतवाद्यांच्या बोटींना इंधन कुणी पुरविले, अशा काही प्रश्‍नांचा त्यात समावेश आहे. सगळेच प्रश्‍न असंबद्ध ठरविता येण्यासारखे नाहीत.मात्र, या प्रश्‍नासंदर्भात प्रतिसादावरून अजून पाकिस्तानला प्रत्यक्ष कृती करेपर्यंत बरेच कालहरण करणे शक्‍य आहे. हल्ल्यात सहभागी झालेल्या कसाबसह अन्य नऊ जणांविरुद्ध पाकिस्तानने खटले दाखल केले आहेत. कटासंदर्भात आठ जणांविरुद्ध पाकिस्तानने एफआयआर नोंदविले आहेत.त्यातल्या सहा जणांची नावे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षामंत्री रहमान मलिक यांनी जाहीर केली आहेत. लष्करे तोयबाचे कमांडर झाकी- उर- रहमान लाखवी आणि झरार शाह हे हल्ल्याचे मास्टरमाईंड असल्याचे भारत आणि अमेरिकेने नमूद केले आहे.त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र एफआयआरमध्ये त्यांची नावे नमूद केलेली नाहीत. उलटपक्षी हमद अमीन सादिक हा हल्ल्यामागील सूत्रधार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे.त्यामुळे हल्ल्याच्या कटासंदर्भात कबुली देतानाही पाकिस्तानने हातचे राखून ठेवले आहे. त्याच्या कारवाईचा रोखही भारत आणि अमेरिकेने प्रमुख संशयित ठरविलेल्या व्यक्तींकडे नाही. अन्य कुणाला बळीचा बकरा बनवून हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना वाचविण्याचा डाव पाकिस्तान खेळत नाही ना, याकडे आता अधिक सावधपणाने लक्ष पुरविण्याची गरज आहे. अर्थात,पाकिस्तानच्या कारवाईचे स्वागत करतानाही परराष्ट्र व्यवहारमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे आणि नेटवर्क उद्‌ध्वस्त करण्यासाठी प्रयत्नात कोणतीही कसूर ठेवणार नसल्याचे स्वच्छपणे सांगितले आहे. पाकिस्तानला तपास, माहितीची देवाणघेवाण, शंकानिरसन अशा सबबीखाली कालापव्यय करण्याची संधी न देता त्या प्रयत्नांची गती वाढवावी लागणार आहे.

Thursday, February 12, 2009

मोदींचे चुकलेच

प्रसंग, निमित्त काही असो, आपल्याकडच्या राजकारण्यांना एकमेकांना ओरबाडण्यात रस वाटतो. त्याचे बाहेरच्या जगात काय संदेश जातात याची त्यांना चिंता नसते. कोण वरचढ आहे, हे दाखविण्यात त्यांना धन्यता वाटते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेले वक्तव्य आणि केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी त्यावर केलेली तिरकस टिपणी यातून कॉंग्रेस आणि भाजपच्या नेत्यांची मिळून सुरू जालेली जोरकस जुगलबंदी हे त्याचेच निदर्शक आहे.

मुंबईत दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंदर्भात वक्तव्य करताना मोदी यांनी असा हल्ला स्थानिक घटकांच्या पाठिंब्याशिवाय करणे शक्‍य नसल्याचे म्हटले होते. अशी काही सामग्री हाती लागते काय, यावर नजरच ठेवून असलेल्या पाकिस्तानी नेत्यांनी लगेच त्याचा फायदा उठवायला सुरवात केली. मुंबईवरील हल्ल्यात आपला सहभाग दडविण्यासाठी, नाकारण्यासाठी पाकिस्तानचा सुरवातीपासून आटापिटा चाललेला आहे. त्यासाठी हल्ल्याचा कट युरोपमध्ये शिजल्याचे, कधी बांगलादेशातील दहशतवादी घटक त्यामागे असल्याचे नवेनवे शोध पाकिस्तान जाहीर करीत आहे. भारताने दिलेले पुरावे असत्य ठरविण्यासाठी ना ना क्‍लृप्त्या अवलंबित आहे. अशा परिस्थितीत मोदी यांचे वक्तव्य त्याच्या हातात दिले गेलेले कोलीतच ठरले. आपल्या वक्तव्याचा गाजावाजा पाकिस्तानकडून होत असल्याचे दिसल्यावर आणि त्यासाठी देशातही आपण टीकेचे लक्ष्य ठरत असल्याचे पाहिल्यावर मोदी यांनी घूमजाव करण्याचा प्रयत्न केला.अशा वेळी, "आपल्या विधानाचा विपर्यास केला गेला', "चुकीचा अर्थ लावला गेला" अशी सारवासारव करण्याचे सर्रास वापरले जाणारे तंत्र मोदींनीही अवलंबिले. आपले म्हणणे संदर्भ सोडून सांगितले जात असल्याचा कांगावा त्यांनी चालविला आहे."पाकिस्तानने एवढी मोठी कारवाई केली असेल, तर त्यामागे स्थानिक नेटवर्कच्या स्वरूपात त्यांना स्थानिक पातळीवर पाठिंबा मिळालेला असलाच पाहिजे.भारत सरकारने पाकिस्तानशी चर्चा करण्याबरोबर याबाबतही चौकशी करायला हवी' असे आपण बोललो असल्याचे मोदी आता सांगत आहेत. "स्थानिक सहभागा"संबंधी त्यांच्या वक्तव्यावर "त्यांचा पाकिस्तानशी संपर्क आहे का,' अशी उपरोधिक टिपणी चिदंबरम यांनी केली.ती भाजपच्या अन्य नेत्यांना बरीच झोंबली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अ.र. अंतुले यांनी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुखआणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूसंदर्भात केलेल्या विधानाचा विषय उकरून काढून कॉंग्रेसची त्यांनी पंचाईत केली आहे. मोदींच्या वक्तव्यात काही चूक नसल्याची भूमिका ते मांडू लागले आहेत. देशातल्या सामान्य माणसाच्या मनातला प्रश्‍नच ते बोलले, असेही समर्थन ते करीत आहेत. दहशतवाद्यांच्या हल्ल्यासंदर्भात कारवाई करण्यात अपयशी ठरल्याने चिदंबरम यांचा संताप झाल्याची टीका त्यांनी चालविली आहे. तर, कॉंग्रेसच्या नेत्यांनी भाजपची भूमिका पाकिस्तानला उपकारक होत असल्याचे मत मांडीत त्यांच्या देशाभिमानालाच हात घातला आहे. एका परीने हा साराच थिल्लरपणा आहे. मुख्य विषयावर तोड काढण्यासाठी गंभीर आणि पक्षभेदापलीकडची चर्चा अपेक्षित असताना सारेच त्यापासून भरकटले आहेत. त्यामागे त्यांचा वेगळा एजंडा असेल, पण चाललेला प्रकार मूळ विषयाची हानी करणारा आहे. त्याची पोच कुणालाच उरलेली नाही.

मोदींच्या वक्तव्यात तथ्यांश असेलही. देशातल्या सामान्य माणसाच्या तर्कबुद्धीतही हा मुद्दा डोकावत असेल. पण,त्याची जाहीर वाच्यता आपल्या देशापुढे असलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी, दहशतवादविरोधी लढ्याच्या उद्दिष्टाला पूरक आहेत का? मुळात, समान्याची भावना तशी असली, तरी मोदी हे सामान्य व्यक्ती नाहीत. ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत. देशातल्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यांच्याही बुद्धीला सामान्यांच्या मनातला प्रश्‍न भिडला असेल, तर तो त्यांनी केंद्र सरकारच्या योग्य व्यासपीठावरच मांडायला हवा होता. दहशतवादविरोधी लढा हा एका पक्षाचा विषय नाही.तो साऱ्या देशाचा प्रश्‍न आहे. त्यापुढे पक्षीय आणि वैयक्तिक प्रतिष्ठेची, अहंकाराची भावना गौण ठरावी. मोदींना खरेच "स्थानिक घटकां"च्या सहभागाची शंका होती किंवा असेल, तरी देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून, एक जबाबदार नेता म्हणून त्यांनी आपल्या स्त्रोतांचा वापर करून त्याविषयी किमान प्राथमिक स्तरावर शहनिशा करून त्याची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना, संबंधित घटकांना द्यायला हवी होती. ते न करता जाहीर वक्तव्यबाजी करणे हे गैरच आहे.

Wednesday, February 11, 2009

निषेधाची मोहीम

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याला राम सेनेने विरोध दर्शविला आहे. त्यांच्या विरोधाला न जुमानता असा मैत्री दिवस साजरा करणाऱ्यांना कोणत्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल, याबाबत नक्की अंदाज वर्तविता येत नाही. अविवाहित तरुण -तरुणी एकत्र फिरताना दिसल्यास, प्रेम व्यक्त करताना आढळल्यास त्यांचे तिथल्या तिथे लग्न लावण्याचा कृती कार्यक्रम राम सेनेने आधी जाहीर केला आहे. त्याविरोधात देशभरातून त्याविरोधात आवाज उठल्याने आणि कायद्याच्या दृष्टीने ते अडचणीचे ठरणार असल्याचे दिसल्याने असेल, राम सेनेने आपल्या कृती कार्यक्रमात काही बदल केला आहे. आता लग्न लावण्याऐवजी संबंधित मुलामुलींना त्यांच्या पालकांच्या किंवा पोलिसांच्या हवाली करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.मंगळूरमधील पबमध्ये गेलेल्या महिलांना मारहाण करणारे, त्यांचा छळ करणारे स्वयंघोषित संस्कृतिरक्षक प्रत्यक्षात तेवढेच करून थांबतील,दांडगाई करणार नाहीत,याचा भरवसा नाही. नैतिक पोलिस बनून अन्य नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणाऱ्या सांस्कृतिक गुंडांना कर्नाटक सरकार पायबंद घालू शकेल, का हा ही प्रश्‍न आहे. सरकार तोंडाने काही सांगत असले,तरी भारतीय नागरिकांना असलेल्या स्वातंत्र्याचा आपल्या कृतीने संकोच करू पाहणारे अजून मोकळेच आहेत. मात्र, या तथाकथित संस्कृतिरक्षकांविरुद्ध देशभरात संताप व्यक्त होत आहे. त्या पाठिंब्यावर मैत्री दिवस साजरा करणाऱ्या तरुण- तरुणींनी सांस्कृतिक गुंडांना प्रतिकार केला, तर स्थिती गंभीर होण्याची शक्‍यता आहे. अशा प्रसंगांची कल्पना करून कर्नाटक शासनाने काही प्रतिबंधक उपाययोजना केल्याचे अजून तरी ऐकिवात नाही. त्यामुळे 14 फेब्रुवारीने आताच एक प्रकारची धास्ती निर्माण केलेली आहे.

तथाकथित संस्कतिरक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या प्रमोद मुतालिक यांचा देशभरातून अभिनव पद्धतीने निषेध सुरू आहे. निशा सुसान या महिलेने इंटरनेटच्या माध्यमांतून निषेधाची मोहीम सुरू केली आहे. ज्यांना संस्कृती रक्षणाच्या नावाखाली चाललेली गुंडगिरी, दादागिरी मंजूर नाही, ज्यांना व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कोणत्याही प्रकारे गळचेपी मान्य नाही, त्यांना निषेधात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. र्झीलसेळपस, ङीेश रपव ऋीुेरीव थोशप या नावाने संघटन स्थापून त्यांनी मोहीम सुरू केली आहे. नावातच राम सेनेच्या विचार आणि कृतीसंदर्भातील उपरोध स्पष्ट होतो. संस्कृती आणि नीतिमूल्यासंबंधीच्या राम सेनेच्या कोत्या संकल्पनांनाही त्यात थेट नकार दिला आहे. या मोहिमेंतर्गत मुतालिक आणि राम सेनेच्या कार्यकर्त्यांना "गुलाबी चड्डी' भेट पाठविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या मोहिमेत आतापर्यंत तीन हजाराहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. महिलांबरोबर पुरुषांचाही त्यात समावेश आहे. या सर्व चड्ड्या एकत्र करून पाठविणे शक्‍य नसल्याने आता प्रत्येकाने थेट कार्यकर्त्यांना चड्ड्या पाठवायला त्यांनी सांगितले आहे. त्यालाही प्रतिसाद मिळत आहे.

भेट म्हणून चड्डी पाठविण्यामागे राम सेनावाल्यांच्या विचारातला कोतेपणा अधोरेखित करायचा आहे. आणि गुलाबी रंग फालतूपणाचे निदर्शक म्हणून निवडला गेला आहे. गुलाबी रंगाला जडलेला हा विशेष अनेकांना योग्य वाटणार नाही. त्या रंगाशी खूप उदात्त भावना जोडल्या जातात. मोहीम राबविणाऱ्यांना मात्र असे वेगळे अपेक्षित आहे.

निषेधाच्या या प्रकाराने व्यथित होऊन राम सेनेच्या एका कार्यकर्त्याने म्हणे असे म्हटले, की चांगल्या घरांतील लोकांना हे शोभादायक नाही. प्रश्‍न असा पडतो, की त्यांनी मंगळूरमध्ये जे केले आणि व्हॅलेंटाइन डेला ते जे करणार आहेत, ते शोभादायक आहे का ? किंवा ते ज्यांनी केले आणि पुढे करणार आहेत, ते चांगल्या घरांतले नाहीत का ?

निषेधाच्या या मोहिमेलाही राम सेनेने उत्तर शोधले आहे. चड्डी पाठविणाऱ्यांना ते परतीची भेट म्हणून साड्या देणार आहेत. राष्ट्रीय हिंदू सेनेच्या महिला साड्यांची जमवाजमव करायला लागल्या आहेत. त्याचा अर्थ इतकाच की त्यांना निषेधाची भाषा कळत नाही, किंवा निलाजरेपणाने ते त्यापलीकडे गेले आहेत.

Monday, February 9, 2009

सकारात्मक संमेलन

माशेलच्या देवभूमीत गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे सत्ताविसावे गोमंतक मराठी साहित्य संमेलन सात आणि आठ फेब्रुवारी असे दोन दिवस अतिशय उत्साहाने आणि आशयसंपन्नतेने पार पडले.

पोर्तुगीजांची सत्ता असताना बाटाबाटीच्या काळात वेगवेगळ्या भागातील लोकांनी आपले देव वाचविण्यासाठी माशेलची वाट धरली होती. त्यामुळे तिसवाडी,बार्देश तालुक्‍यातील अनेक दैवतांची मंदिरे या गावात उभी आहेत. प्रख्यात साहित्यिक, पत्रकार बा. द. सातोस्कर आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचे हे जन्मगाव. सातोस्करांचे हे जन्मशताब्दी वर्ष.अशा विविध योगायोगांच्या संगमावर साहित्य संमेलन पार पडले. रेखीव नियोजनाला निरलस आणि निरपेक्ष कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाची जोड लाभल्याने दीर्घ काळ आठवणीत राहील,असे हे संमेलन देखणपणाने यशस्वी झाले.

संमेलन उभे करण्यासाठी माशेलच्या साहित्य सहवास या आयोजक संस्थेला आणि तिथल्या साहित्यप्रेमींना अवधी तुलनेने कमी मिळाला होता. डिसेंबर 2008 च्या प्रारंभी कार्याला सुरवात झाली.आयोजनासंदर्भातील अनेक सोपस्कार, नियम पाळून सहभागासाठी अपेक्षित व्यक्ती मिळविण्यापर्यंत सगळा घाट जमवून आणणे तसे कठीण होते. अनेक व्यवधाने होती. परंतु प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पदे ही प्रातिनिधिक मानून सर्वांशी मिळून मिसळून काम केले. परस्पर सुसंवादाने किती चांगले आयोजन करता येते,याचा उत्तम अनुभव या संमेलनाने दिला.तंत्रज्ञानाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची मोठी मदत यावेळी झाली. वेळेसारख्या आपले नियंत्रण न चालणाऱ्या घटकावर मात करून अनेक बाबी त्यामुळेच मार्गी लावता आल्या.

हे संमेलन सकारात्मक होते. मराठी भाषा गोव्याची राजभाषा व्हावी, ही गोंतकीयांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.प्रत्येक संमेलनात या विषयाचे पडसाद उमटतात.त्यात भरही गतकालीन गोष्टींवर असतो. त्याचे चर्वितचर्वण आणि त्याच्या ओघात उणीदुणी काढण्याचे प्रकार होतात. प्रश्‍न सोडवायचा कसा, याचे उत्तर काही मिळत नाही. यावेळी कार्यक्रम ठरवितानाच मागच्या बाबी न उकरता भविष्यात काय करायचे, याचा कृती कार्यक्रम ठरविता येईल, असे विचारमंथन, चर्चा व्हावी असा संदेश आधीच प्रसृत केला होता."वाङ्‌मयीन पुरस्कार ः समज - गैरसमज' या साहित्यविषयक परिसंवादात देखील गोमंतकीय मराठी साहित्याची खोली, त्याची गुणवत्ता,कस यांवर भर देण्याचे वक्‍त्यांना सुचविण्यात आले होते. गोमंतकात खूप दर्जेदार साहित्य निर्माण झाले आहे, होत आहे. मात्र त्याची पुरेशी गंभीर दखल एकूण साहित्यविश्‍वात घेतली जात नाही. त्याकडे लक्ष वेधले जावे आणि त्यासाठी काय करता येईल याचे दिशादिग्दर्शन व्हावे, असे उद्देश त्यामागे होते. वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींच्या अनुभवकथनाचा "वेगळ्या वाटेने जाताना" कार्यक्रम होता. पंढरीची वारी (डॉ. सुरेश जोशी) अंटार्क्‍टिकावरचे जग (डॉ. देवयानी बोरुले) पर्यावरणीय चळवळ (राजेंद्र केरकर) संगीत साधना (सुमेधा देसाई) अशा विविध अनुभवविश्‍वांचे प्रत्ययकारी दर्शन वक्‍त्यांनी घडविले. श्रोत्यांनी त्याची खूपच वाखाणणी केली.पहिल्या दिवशीचा तो सर्वात यशस्वी कार्यक्रम. दुसऱ्या दिवशी विविध महाविद्यालयांतील चिन्मय घैसास, कौस्तुभ नाईक, केदार तोटेकर, वैष्णवी हेगडे, तृप्ती केरकर या विद्यार्थ्यांशी संगीता अभ्यंकर आणि रवींद्र पवार यांनी मुक्त संवाद साधला. आपल्या प्रज्ञा आणि प्रतिभेने या विद्यार्थ्यांनी सर्वांनाच थक्क करून सोडले. त्यांचा अभिव्यक्तीतला धीटपणा सलाम करावा असा होता. विविध विषयांवरील त्यांची मते,विचार अंतर्मुख करणारे होते. एखाद्या संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर विद्यार्थ्यांना स्थान देण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. तो कमालीचा यशस्वी झाला. सर्वच विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. या संमेलनाची ही सर्वांत मोठी उपलब्धी किंवा फलश्रुती होय.

हे संमेलन क्रियाशील होते. गोमंतकातील मराठी भाषा आणि साहित्याची चळवळ पुढे नेण्यासाठी, ती व्यापक आणि बळकट करण्यासाठी कृती कार्यक्रम या संमेलनातून मिळावा,असा विचार माशेलकर मंडळीचा सुरवातीपासून होता. नियोजनात त्याच्या खुणा दिसतात. कृती कार्यक्रम सिद्ध करण्यास संमेलनाने बरीच सामग्री दिली आहे. त्याची आखणी व्हायला अजून काही अवधी जाणार आहे. कृती कार्यक्रमासंबंधी त्यांची तळमळ इतकी खोल आणि सचोटीची आहे, की दुसऱ्या बाजूने त्यांनी कृतीचा आरंभ करून टाकलेला आहे. संमेलन सुरू व्हायच्या दोन दिवस आधी मराठीच्या विषयावर जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आल्या. त्यात कोपरा सभा झाल्या. काणकोण आणि पेडणे या गोव्याच्या दोन टोकांकडून सुरू झालेल्या या जनजागृती यात्रांमध्ये स्थानिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन मराठी गोमंतकीयांच्या मनीमानसी अढळ असल्याची ग्वाही दिली.

नवीन पिढीविषयी प्रतिकूल टिपणी करायचीही प्रथा पडून गेली आहे. ही पिढी काही वाचत नसल्यापासून ती वाह्यात झाली आहे,इथपर्यंत अनेक प्रकारची शेरेबाजी चाललेली असते. ती खरे तर नव्या पिढीवर अन्यायकारक असते. नव्या पिढीला समजून न घेता किंवा तिला आपली बाजू मांडण्याची संधी न देता, अभिव्यक्तीचे माध्यम उपलब्ध करून न देता तिच्याविषयी काही मते बनवायची आणि प्रसंग असो वा नसो, तिच्याविषयी प्रतिकूल बोलत राहायचे,असे घडताना दिसते. संमेलनाने या तरुणाईला पेश केले. त्या तरुणांनी आपण काय आहोत याची दणदणीत चुणूक दाखवून दिली. youths are useless असे म्हटले जाते, खरे तर youths are used less असे आपल्या बाबतीत घडते असे सांगून त्यांनी आपल्या टीकाकारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.नेतृत्वाची, एखाद्या कार्याची धुरा वाहण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, अशी मानभावी आवाहने कधी कधी केली जातात. प्रत्यक्षात त्यांना कधी संधी दिली जात नाही. या संमेलनाने ती संधी तरुणांना देऊन एका कृतीची सुरवात केली आहे. चर्चा आणि कृती या दोन्ही अंगांनी म्हणूनच हे संमेलन एक आशय देणारे, एक अवकाश दाखवणारे ठरले आहे.

Friday, February 6, 2009

बहुजन संघटनाचे स्वप्न

गेल्या रविवारी पर्वरी (गोवा) येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या गोवा शाखेतर्फे समता परिषद कार्यकर्त्यांचा मेळावा भरविण्यात आला.बहुजन समाजाची लोकसंख्या अधिक असूनही तो मागे का पडला, याविषयीचे विवेचन काही वक्‍त्यांनी केले. स्वाभाविकपणे उच्चवर्णीयांनी शोषणाच्या व्यवस्था कशा निर्माण केल्या आणि त्या कशा राबविल्या, शतकानुशतके बहुसंख्येने असलेल्या अठरा पगड जातीजमातीचा बनलेल्या बहुजन समाजाचे कसे दमन करण्यात आले, याविषयी, विशेषतः हरी नरके पोटतिडिकेने बोलले. बहुजन समाज संघटित होण्याची गरज का आणि कशासाठी आहे, यावरही त्यांच्या विवेचनात भर होता. या मेळाव्यात मांडले गेलेले अनेक मुद्दे नवे नाहीत. ते सतत मांडले जातात.ते पटवून देण्याचा प्रयत्न होतो. पण बहुजन समाजाच्या ते अजूनही गळी उतरत नाही.त्याची प्रत्यक्षात तामिली होत नाही.बहुजन समाज संघटित होत नाही आणि काही शतकापूर्वीसारखी दमनकारी परिस्थिती आज नसली, स्वातंत्र्याचे मुक्त वारे सर्वत्र पसरलेले असले, तरीही राजकीय, आर्थिक सत्ता या अल्पसंख्येने असलेल्या उच्चवर्णीयांकडेच आहेत. तिथे बहुजन समाजाची अधिसत्ता यायला अजून काही वर्षे आणि काही पिढ्या जाव्या लागतील. केवळ परिषदांतून आणि मेळाव्यातून उद्‌घोष करून ते साध्य होणार नाही. उद्‌घोषात असलेले कृतीच्या वेळी प्रत्यक्षात अवतरेल, असे आश्‍वासक वातावरण मेळाव्यातून निर्माण होत नाही, तशी ग्वाही त्यातून मिळत नाही. त्यामुळे उद्‌घोषाचा प्रभाव आणि परिणाम काही मर्यादेच्या पलीकडे जात नाही.

पर्वरीत मेळावा आयोजित करण्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष शिरोडकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निळकंठ हळर्णकर यांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आणखी एक कार्यकर्ते उल्हास नाईक यांचाही आयोजनात मोठा वाटा होता. ही सर्वच माणसे बहुजन समाजातील आहेत. हळर्णकर आधी कॉंग्रेसमध्ये होते. थिवी मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत त्या पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. मेळाव्याला उपस्थित असलेल्यांपैकी बरेचजण या पक्षांचे कार्यकर्ते होते. मेळावा नेमका कुठे होणार याविषयी नीट माहिती प्रसिद्ध झाली नव्हती. प्रत्यक्षात मेळावा एक तास उशिरा सुरू झाला. सुरवातीला पूर्ण भरलेले संत गाडगे महाराज सभागृह साडेसात वाजल्यानंतर ओस पडत गेले. नरके यांचे भाषण शेवटच्या टप्प्यात आले असताना मागच्या रांगेत चाललेल्या कुजबुजीने गोंगाटाचे रूप धारण केले होते आणि एक जण "कधी संपणार हे' म्हणून वैतागून बोलत होता. या गोष्टींचा उल्लेख आयोजनात त्रुटी होत्या हे सांगण्यासाठी करीत नाही. आयोजन विशिष्ट हेतूबद्‌द्‌लच्या तळमळीने झाले होते. या बाबींचा उल्लेख प्रतिसादाची प्रत ठरविण्यासाठी करीत आहे. त्या वैतागलेल्या माणसाचे उद्‌गार ऐकल्यावर तो आणि त्यांच्यासारखी अन्य काही माणसे तिथे असण्याची शक्‍यता गृहीत धरली, तर ही माणसे मेळाव्यात होणारे प्रबोधन ऐकण्यासाठी आली होती, की आपल्या राजकीय नेत्यांनी सांगितले म्हणून गर्दी दाखविण्यासाठी जमली होती, असा प्रश्‍न पडतो. दुसरे, जे लोक कार्यक्रम पूर्ण संपेपर्यंत थांबू शकत नाहीत, ते खरोखर संघटित होऊ शकतील का ? ज्या तऱ्हेचे संघटन समता परिषदेला किंवा सामाजिक न्यायाची भूमिका मांडणाऱ्या, समता-बंधुतेचा उद्‌घोष करणाऱ्या विचारवंतांना आणि नेत्यांना अभिप्रेत आहे, ते होण्यास निकराच्या प्रयत्नांची गरज आहे, आणि त्याला खूप अवधीही लागू शकतो, तोवर चालण्याची क्षमता आणि थांबण्याचा संयम या लोकांमध्ये आहे का ?

बहुजनांच्या संघटनातून बहुजनांच्या कल्याणाचे ध्येय गाठायचा समतेच्या पुरस्कर्त्यांचा उद्देश आहे. त्यासाठी अनेक गोष्टीबरोबर राजकीय सत्तेवर बहुजनांची पक्की पकड होणे आवश्‍यक आहे. अनेक कल्याणकारी कार्यक्रमांचे, उन्नती- विकासाचे महामार्ग राजकीय सत्तेच्या प्रवेशद्वारातून प्रशस्त होत जातात. आताच्या युगाची ती खूणच आहे. परिवर्तनासाठी ओबामाचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणे हा त्याचा दाखला आहे. बहुजनांच्या संघटनामागे आणि त्याद्वारे गाठायच्या ध्येयामागे राजकीय सत्ता, अधिकार बहुजनांच्या हाती येणे, राहणे हे पहिले अटळ पाऊल ठरते. ते प्रत्यक्षात अवतरण्यात व्यक्तीच्या राजकीय आकांक्षाच अडथळा म्हणून उभ्या ठाकल्या तर त्यातून मार्ग कसा काढला जाईल, हा प्रश्‍नही मेळावा बघितल्यावर ठळक झाला.

राजकीय सत्ता मिळविण्यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेतून जावे लागते. मेळाव्याची धुरा वाहणारे नेते राजकीय क्षेत्रातील होते. उद्या जेव्हा निवडणुकीचा प्रसंग येईल, तेव्हा या राजकीय नेत्यांची भूमिका काय असेल ? सुभाष शिरोडकर बहुजन समाजातले आहेत म्हणून दुसरा बहुजन समाजातील कुणी त्यांच्याविरोधात उभा राहणार नाही का ? हळर्णकरचा पाडाव करण्यासाठी कॉंग्रेसमधली कुणी बहुजन समाजातील व्यक्ती दंड थोपटणार नाही का ? त्यावेळी हे नेते प्रतिस्पर्धी बहुजन समाजातला आहे, आपसांत लढणे नको म्हणून माघार घेतील का? प्रतिस्पर्ध्याला विजयी होण्यासाठी मदत करतील का ? किंवा प्रतिस्पर्धी या जुन्याजाणत्या नेत्यांना पाठिंबा देतील ? या प्रश्‍नांची प्रथमदर्शनी उत्तरे नाही अशीच येतील. निवडणुकांत बहुजन समाजाचे कार्ड आपली मते वाढविण्यासाठी, दुसऱ्याची आपल्याकडे वळविण्यासाठी वापरले जाते. त्यावेळी संघटनाचा उद्‌घोष सोईस्कर विसरला जातो. जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी बहुजन समाजातील असला तरी त्याची उणीदुणी काढून आपण कसे उजवे आहोत हे मतदारांवर ठसविण्याचा प्रयत्न केला जातो.बहुजनांच्या संघटनापेक्षा पक्ष, पक्षशिस्त हे परवलीचे शब्द बनतात. त्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी बहुजनच बहुजनांवर आघात करायलाही कचरत नाही. बहुजन समाजाच्या संघटनाचे तीनतेरा वाजतात. हे वास्तव कसे बदलणार ? त्यावर उपाय काय, हे जोवर सांगितले जाणार नाही, तोवर बहुजनांचे संघटन व्यापक स्तरावर कधीच साकारणार नाही.