Thursday, September 11, 2008

खात्री

विज्ञान- तंत्रज्ञानातील प्रगतीने जीवन गतिमान, सुविधामय झाले आहे. नवनव्या उपकरणांनी जीवनाचा ताबा घेतला आहे. इतका, की रोजच्या व्यवहाराचा ती अविभाज्य भाग बनली आहेत. आपल्या दिनचर्येत ती बेमालूमपणे सामावून गेली आहेत आणि आपणही त्यांच्यात समरसून गेलो आहोत.नवी जीवनशैली तशी सुखावणारी आहे.पण या साऱ्या व्यवहारात तंत्रज्ञानालाही खात्रीशीरपणे खात्रीची खात्री देता आली आहे का,असा बारीकसा प्रश्‍न माझ्या मनाला काल पडला.(तसा तो वेगवेगळ्या संदर्भात अनेकदा पडत असतो, म्हणा.)

एका मित्राला काही माहिती पाठवायची होती. सकाळी घरी बसून माहितीचे टिपण तयार करीत बसलो.ते पूर्ण व्हायच्या आत ऑफिसला जायची वेळ झाली. एखादे काम एका ठिकाणाहून दुसरीकडे जाऊन पूर्ण करायचे असले, किंवा कधी दूरच्या ठिकाणच्या बैठकीसाठी प्रेझेंटेशन करायचे असले, की मी नेहमी ती सर्व माहिती पेनड्राईव्हमध्ये उतरून घेतो. अधिकची खबरदारी म्हणून माझ्याच ई-मेलवरही सोडून ठेवतो.त्या सवयीने कालही वागलो. कॉम्प्युटरचा ड्राईव्ह बिघडलेला असल्याने रीरायटेबल सीडीवर माहिती उतरून घेतली. माझ्या एका ई-मेलवरून माझ्याच दुसऱ्या दोन ई-मेलवरही ती टाकून दिली. म्हणजे चार ठिकाणी माहिती ठेवून मी बाहेर पडलो.संध्याकाळी ऑफिसचे काम आटोपल्यावर सीडी उघडायला गेलो,तर तिच्यात ईरर यायला लागला. ई-मेलवर गेलो,तर नेमका त्यावेळी सर्व्हर बंद पडला होता. चारपैकी एकही स्त्रोत माझ्या कामी आला नाही. माझी एवढी सारी तयारी आणि सावधगिरी कुचकामी ठरली. म्हणून पुढेमागे कधी या यंत्रणेवर मी विश्‍वास ठेवणार नाही, अशातला भाग नाही. पण,हे सारे नवे तंत्रज्ञान दिमतीला असूनही आपण अडू शकतो, याचा हा एक अनुभव.

मनात आले,शंभर टक्के खात्रीचे असे काही नसतेच!

तंत्रज्ञानाने शंभर नव्या गोष्टी निर्माण केल्या आहेत.पुढे हजार गोष्टी तयार करेल."खात्री' ही चीज तयार करण्याचे तंत्रज्ञान कधी अस्तित्वात येऊ शकेल का?

Monday, September 8, 2008

सावली ः व्यथेची, दुःखाची

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरुमे देवं सर्व कार्येषू सर्वदा

विघ्नहर्त्या, बुद्धिदेवता श्री गणेशाचा उत्सव भक्तिभावाने साजरा झाला.दीड आणि पाच दिवसांच्या उत्सवाची सांगता झाली आहे. अकरा किंवा अधिक दिवसांचा, विशेषतः सार्वजनिक स्वरूपातील उत्सव नेहमीच्या उत्साहाने सुरू आहे.गणेशभक्तांचा भक्तिभाव आणि उत्साह चलनवाढ, महागाई यांना पुरून उरला आहे.अकस्मात कोसळलेला धुवांधार पाऊसही त्यांना नामोहरम करू शकला नाही. मनामनांत वसलेल्या भक्तीची, श्रद्धेची ही शक्ती आहे. तिने माणसाला कायमच कार्यप्रवृत्त राखावे, अशी प्रार्थना श्री गणरायाकडे करतो.

मीही श्री गणेशपूजन केले. श्री गणरायाचा उत्सव साजरा करताना दुःखाच्या दोन सावल्या मात्र मनाला स्पर्शत राहिल्या.चतुर्थीच्या आधीचा महिनाभराचा कालावधी बिहारमधील नैसर्गिक आपत्ती आणि हिंसाचाराने रक्तरंजित बनून गेला होता. बिहारमध्ये पुराने थैमान घातले. त्याचा फटका लाखो लोकांना बसला. पुराने अर्धा बिहार उद्‌ध्वस्त झाला. त्याला सावरण्यासाठी अजून बराच काळ जावा लागेल.नैसर्गिक आपत्तीवर माणसाचे नियंत्रण नाही, हे खरे. ज्या कोसी नदीने प्रलय माजविला, तिच्या बंधाऱ्याची देखभाल आणि वेळीच डागडुजी करणे तर आपल्या नियंत्रणात होते!त्याही पलीकडे हजारो माणसे पुरामुळे आपत्तीत सापडली असताना त्यांचे ऐवज लांबविण्याचे, त्यांच्यासाठी आलेल्या मदतीवर डल्ला मारण्याचे, विशिष्ट राजकीय पक्षाशी संबंधित असलेले व नसलेले लोक असा भेद करून अनेकांच्या अडचणीत आणखी भर घालण्याचे हिडीस प्रकार सर्रास घडले.ते टाळणेही माणसांच्या नियंत्रणातील गोष्ट होती.अनेकांनी ताळतंत्र सोडल्याने कोसी नदीने जेवढे अश्रू असहाय लोकांच्या डोळ्यांतून वाहायला लावले, त्याहून अधिक दुःख हीन प्रवृत्तीच्या माणसांनी त्यांना दिले. त्यांनी माणुसकीचे हृदय घायाळ केले! घरदार उद्‌ध्वस्त झालेल्या, उपासमारीने, भुकेने जर्जर झालेल्या हजारो लोकांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता.

त्या व्यथेची सावली अधूनमधून मनाला टोचत राहिली!

त्यांना छळणाऱ्या लोकांचा बंदोबस्त कोण करणार?कसा करणार?

आपत्ती, विघ्ने, संकटे टाळावी आणि सुख, शांती समाधानाचे वरदान लाभावे, अशी प्रार्थना आपण श्री गणरायाकडे करतो. ही विघ्ने. संकटे बाहेरून येणारी जाणारी असतात.त्याची वासलात श्रीगणेश लावील ही आमची श्रद्धा असते.माणसाच्या क्रूर मनोवृत्तीतून प्रकटणाऱ्या संकटाचा नाश आणि मुकाबला कसा करायचा? बाह्योपचारांनी त्यांच्या वृत्तीत फरक पडेल याची कसलीच खात्री नसते.

त्या माणसांच्या मनातला श्री गणेश जागावा एवढीच प्रार्थना मी केली!

********

माझ्या कुटुंबातील कुणी वडील माणूस नसताना केलेली यंदाची माझी पहिली गणेश चतुर्थी. नसताना याचा अर्थ ती यापुढेही कधीच असणार नाहीत!गेल्या वर्षी माझ्या वडलांचे वयाच्या 94 वर्षी निधन झाले.सोळा वर्षापूर्वी आई गेली, आठ वर्षापूर्वी थोरल्या भावाचे निधन झाले. आता माझ्या कुटुंबात मीच सर्वांत वडील माणूस. माझे वडील गेले,तेव्हा लांबच्या काकीने म्हटले होते, "तुलाच वडील करून गेला ना रे बाबा.' तेव्हा गलबलून आले, त्याचा एक कढ परवाही जाणवला.

बाबांचे वय झाले होते.हिंडते फिरते होते. या वयातही आंघोळीसाठी पाणी तापवण्यापासून आपले कपडे स्वतः धुण्यापर्यंत स्वतःची कामे स्वतःच करायचे.दिवसभर काहींना काही कामात गुंतलेले असायचे. वय झाले असले,तरी आई-वडील आपल्याला हवीशीच असतात.आपण कर्तेसवरते झालो, कमावते झालो, कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर पेलू लागलो, तरी आपण आपल्या आईवडलाचे लहानगे मूलच असतो. आईवडील आपल्यासोबत असण्यात आपल्या जगण्याला एक भरलेपण असते.त्यांच्या मायेच्या उबेत साऱ्या दुनियेशी टक्कर देण्याइतपत अदम्य ऊर्जा छातीत भरून राहिलेली असते.सुरक्षिततेचा असेल किंवा नसेल, पण निर्भयतेचा कोष आपल्याभोवती विणल्याची अनुभूती जागती असते.या अनुभूतीचा माझ्याबाबतीत बाबा हा शेवटचा दुवा होता. तो निखळला.

वडाच्या पारंबीला मागे वडाच्या मुळाचा, खोडाचा आधार असतो,वरून पर्णसंभाराचे गडद आच्छादन असते. हे सारे त्या पारंबीला भवतालचे वातावरण आणि डोक्‍यावरचे आभाळ पेलण्याचे सामर्थ्य देत असते.मागचे खोड मुळासकट उन्मळून पडले आणि वरचा आच्छादक पर्णसंभार गळून पडला, की संपूर्ण भवतालात, अथांग आकाशाखाली ती पारंबी एकटी, उघडीबोडकी आणि पोरकी बनून उभी उरते.भवतालाचा रेटून दूर ठेवलेला दाब वळून चहूबाजूंनी पारंबीवर कोसळतो.

पारंबीलाही नवी मुळे फुटतात, नवा पर्णसंभारही उगवतो.पण, तोवर एकाकीपण तिला झेलावे लागतेच! गेलेले कायमचेच गमावलेले असते, त्याची भरपाई नव्या निर्मितीने होत नसतेच!

बाबांच्या जाण्याने खुल्या अवकाशात मी असा पारंबीसारखा एकाकी उभा आहे, छातीत कळ सोसून.

दुःखाची ही सावली ऐन सणात मनाला टोचत राहिली!